

Prakash Autade : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याची महाराष्ट्राला ओळख आहे ती सातासमुद्रापार गेलेल्या द्राक्षांमुळे. शेतीतील प्रयोगशीलता उद्योगात आणत कौलगे (ता. तासगाव) येथील प्रकाश औताडे यांनी आपल्या आयडियल उद्योग समूहाची उभारणी केली आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका कृषी पदविकाधारक तरुणाने घेतलेली ही भरारी मराठी माणसाला संधी मिळाली, तर तो कुठेही कमी नाही हे सिद्ध करणारी. कृषी निविष्ठा, पशुखाद्य निर्मिती आणि आता शेतीमाल ब्रॅण्डिंग - विक्रीतील या समूहाचा झपाटा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रकाश रघुनाथ औताडे... ऊस तोडीमध्ये काम करणारा ते आयडियल ॲग्री सर्च प्रा. लि. या उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक. सन २०१० मध्ये या उद्योगाचा श्रीगणेशा झाला. अवघ्या तपभरात महाराष्ट्रासह देशातील सर्व प्रमुख राज्यात उद्योग विस्तार झाला आहे. सुमारे साडेतीनशे कर्मचारी आणि साडेचार लाख शेतकऱ्यांच्या जगण्यात सकारात्मक बदल घडविणारा हा उद्योग समूह आहे. अवघ्या बारा-तेरा वर्षांतील या वाटचालीमागे प्रकाश यांचा पाव शतकांचा संघर्ष आहे. कोरडवाहू शेतकरी कुटुंबातून आलेल्या, जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या बेस्ट बसचालकाच्या मुलाने आर्थिक विवंचना, दुष्काळ अशा अनेक संकटांवर मात करीत हा संघर्ष केला आहे. एकत्र कुटुंबात वडिलांच्या वाटणीला ट्रॅक्टर आला. त्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करताना ऊसतोडीसाठी टोळी तयार केली. व्यवस्थापनाचे कोणतेही पुस्तकी शिक्षण शक्य नसलेल्या त्यांनी जगाच्या शाळेत, रस्त्यावरील विद्यापीठामध्ये शिकताना येणाऱ्या प्रसंगातून स्वतःच हातपाय मारत मार्ग काढला. म्हणूनच आज एका उंचीवर पोहोचल्यानंतरही त्यांचे ‘आपण कोठून आलो’ याचं भान कधीच सुटत नाही. परिस्थिती कोणतीही असो, आपल्याला ती बदलता येते, याची धडाडी अन्य शेकडो तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
शून्यातून प्रारंभ ः
प्रकाश यांचे वडील रघुनाथ हे औताडे कुटुंबातले थोरले. चार भाऊ, तीन बहिणी, आई-वडील असे मोठे कुटुंब. त्यामुळे सातवी पास झाल्यानंतर त्यांनी तरुणपणातच मुंबई गाठली. कामगार, क्लीनर ते ‘बेस्ट’चालक अशा वीस वर्षांच्या संघर्ष करत कुटुंबाचे पालनपोषण केले. दरम्यान, गावाकडे सिंचनासाठी पाण्याची सोय होतेय हे कळल्यावर त्यांना शेतीने हाक दिली. १९८० मध्ये गावाकडे येऊन द्राक्ष बाग टाकली. नोकरी असो की शेती, संघर्ष कधीच संपत नाही, हेच खरे. या संघर्षात त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटलेले असल्याने मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले. १९९५ मध्ये प्रकाश यांनी दहावीनंतर पदविकेसाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यानंतर सांगलीमध्ये ‘कृष्णा व्हॅली ॲग्रो’ या कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरीही सुरू केली. त्या काळातच त्यांनी गावात कृषी निविष्ठांचे कृषी सेवा केंद्र काढले. दरम्यान, सन २००० पासून दुष्काळी वर्षे सुरू झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांची उधारी प्रचंड थकली. दुकानाला टाळे लावावे लागले. हार न मानता त्यांनी पुन्हा नोकरीसाठी सांगली गाठली.
उद्योगाचा श्रीगणेशा
नोकरीपेक्षा स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न प्रकाश पाहत होते. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही माणसाला भेडसाविणारा भांडवलाचा यक्षप्रश्न होताच. कुटुंबच शेतीची जबाबदारी पाहायचे. २०१० मध्ये पत्नी सौ. उज्ज्वला यांनी बचत गटाकडून कर्ज घेत थोडा मदतीचा हात दिला. हे बीज भांडवल आणि थोडेसे क्रेडिट यावर मशिनरी खरेदीचे धाडस केले. द्राक्ष आणि भाजीपाल्यासाठी उपयोगी ठरणारे ‘NH 4 ड्रीप’ आणि ‘NH 4 ग्रॅन्यूएल्स’ अशी पहिली दोन उत्पादने तयार झाली. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात त्याची विक्री सुरू केली. त्यानंतर आयरेस, पायलट, आयलॉक अशी चाळीसवर अधिक उत्पादने बाजारात आणली. त्याच्या विक्रीसाठी पायाला भिंगरी बांधून ते बांधाबांधापर्यंत फिरत होते. एखादा पायलट प्रोजेक्ट करायचा, त्याचे रिझल्ट दाखवायचे आणि त्यातून शेतकऱ्यांचा विश्वास मिळवायचा. त्यासाठी मार्केटिंगची टीम आली. स्वतःच खेडोपाड्यातील मुलांना प्रशिक्षित केले. सुरुवातीची पंचवीस एक मुलांची टीम, त्यानंतर नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांसह खानदेश, विदर्भात विस्तारली आणि राज्य पादाक्रांत झाले.
मायक्रो न्यूट्रियंट व बायो फर्टिलायझर
२०१३ मध्ये कंपनीने मायक्रो न्यूट्रियंट व बायो फर्टिलायझर निर्मितीचा परवाना मिळवला. खरीप व रब्बी पिकांसाठी कॅचमिक्स एस, कॅचमिक्स एफ, कॅच झिंक, कॅच फेर, कॅच मॅग्नेशिअम यांसह बायो व्हेजी, बनाना, जेटी, ग्रेप, शुगर आणि अनार बूम अशी मालिकाच बाजारात आणली. या श्रेणीतील ४० हून अधिक उत्पादने राज्याराज्यांत गेली. शक्य त्या राज्यात कार्यालय, मग टीमबांधणी आणि त्यांच्यासोबत वर्षभर काम अशी पद्धती राबवली. केवळ शेती निविष्ठा निर्मितीवर विसंबून चालणार नव्हते. यानंतर नवनवी उत्पादनांच्या निर्मितीवर भर देण्यात आला.
आयडियल ‘पशुखाद्य’
शेतकऱ्यासाठी दूध व्यवसाय हा पूरक उद्योग कायमच राहिला आहे. त्यात प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच जनावरांसाठी पूरक खाद्यनिर्मितीची गरज वाढत होती. ‘आयडियल ॲग्रोव्हेट’ या ब्रँडने रिच, रेस, सपोर्ट, गहू, भुसा, मका चुणी, सरकी पेंड अशा पशुखाद्याचे ब्रॅण्डिंग करीत महाराष्ट्र, कर्नाटकात वितरण सुरू झाले.
शेतीमालाचे ‘ब्रॅण्डिंग’
बाजारपेठ असेल तरच शेतीमालाला किंमत. हे ओळखून त्यांनी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील हळद, बेदाणा आणि गूळ पावडर, गूळ कॅण्डी, कोकणातून काजू आणि उत्तरेकडून बदाम अशा शेतीमालाचे ब्रॅण्डिंग सुरू केले आहे. याची आता देशभर वितरण व्यवस्था उभी राहते आहे. निर्यातीसाठीही प्रयत्न आहेत.
आयडियल पेस्टिसाइड्स
अलीकडेच ‘आयडियल पेस्टिसाइड्स नावाने कीटकनाशके, बुरशीनाशके आणि अन्य अशी सुमारे ६० कृषी रसायन उत्पादने आणली आहेत. वॉश या ब्रॅण्डअंतर्गत ट्रायअझोल, कॉपर, कार्बामेट गटातील बुरशीनाशके आहेत. ॲक्टिव्ह या बॅण्डअंतर्गत निओनिकोटीनाइड गटातील कीटकनाशके बाजारात आणली आहेत. ही सर्व उत्पादने द्राक्ष, भाजीपाला पिकांमधील डाऊनी, भुरी, करपा या रोग आणि रसशोषक किडी, अळी व मिली बग्ज यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत. त्यांना सेंट्रल इन्सेक्टिसाइड्स ब्युरो (सीआयबी ॲण्ड आरसी) यांची मान्यता मिळवलेली आहे.
आयडियल फाउंडेशन
२०१२ पासून ‘आयडियल फाउंडेशन’तर्फे विविध समाजपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. महापूर आणि कोरोनामध्ये प्रसंगपरत्वे गरजूंना मदत तर दिलीच, पण दरवर्षी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी थेट मदत दिली जाते. ‘आयडियल सन्मान’ सोहळ्याच्या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गौरवाची परंपरा सुरू केली आहे. त्या अंतर्गत सांगली, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, जालना, संगमनेर आदी ठिकाणी चार-साडेचार हजारांच्या उपस्थितीत मोठे कार्यक्रम झाले. द्राक्ष पिकाबद्दल गैरसमज दूर करण्यासाठी ‘द्राक्षे खा’ अशी मोहीमच राबविण्यात आली.
सोशल कनेक्ट
आधुनिक युगाची गरज म्हणून आता कंपनीने यू-ट्यूब - फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून साडेचार लाख शेतकऱ्यांशी थेट संवाद सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या माती, पाणी, पाने, देठ यांच्या परीक्षणासाठी पवाड एमआयडीसी येथे शासन मान्यता प्राप्त अद्ययावत प्रयोगशाळा उभारली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून पिकाविषयी सल्ला दिला जातो.
आयडियल महापरिवार
कुटुंबाला कोणताही उद्योगाचा वारसा नसताना प्रकाश यांनी कृषी निविष्ठा उद्योगात उतरण्याचे मोठे धाडस केले. अवघ्या तपभरात उद्योगाचा विस्तार करत आजच्या स्थितीमध्ये पोहोचले आहेत. त्यामध्ये शेतकरी, ग्रामस्थ, कंपनीचे वितरक यांसह अनेक ज्ञात-अज्ञातांचे पाठबळ असल्याची कृतज्ञ भावना प्रकाश औताडे यांची आहे. व्यवसायात पाऊल टाकल्यापासून आई लक्ष्मी, वडील रघुनाथ, पत्नी उज्ज्वला आणि बहीण सौ. सुरेखा पाटील यांनी एखाद्या पहाडाप्रमाणे पाठीशी राहत पाठिंबा दिला. थोरली बहीण नंदा याही खंबीरपणे भावाचा व्यवसाय हाच आपला संसार मानत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या आहेत. कंपनीच्या मार्केटिंगची जबाबदारी पाहणारे वैभव जाधव, प्रशासन आणि उत्पादन सांभाळणारे रवींद्र पाटील हे या कुटुंबाचाच भाग आहेत. आपण सारे एकाच कुटुंबाचे सदस्य असल्याची भावना कंपनीतील प्रत्येकाची आहे, हेच ‘आयडियल’चे यश असल्याचे ते सांगतात.
कौतुकाची थाप
केंद्र सरकारच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने प्रकाश औताडे यांना ‘बेस्ट ॲग्री बिझनेसमन’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. झी माध्यम समूहाच्या ‘बेस्ट ॲग्री आंत्रप्रेन्युअर्स या पुरस्कारासह अन्य १० हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. सध्या ते ‘ॲग्री इनपुट्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडिया’चे संचालक तर मराठा समाज उद्योजक कक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.