
Nashik News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात राजकीय वादामध्ये कर्मचारी नाहक भरडले जात आहेत. बाजार समितीकडे पुरेसा निधी उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांचे गत मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असून त्यांच्यात असंतोष पाहायला मिळत आहे.
बाजार समितीच्या पर्यवेक्षक व प्रभारी सचिव यांसह इतर २८ कर्मचाऱ्यांनी १३ मे रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फैयाज मुलाणी यांच्याकडे वेतनप्रश्नी अर्ज सादर केला होता. एकीकडे वेळेवर पगार नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबना होत असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मात्र तरीही बाजार समिती सभापती याबाबत गांभीर्याने दखल घेत नाहीत, ते बाजार समितीत येतात कर्मचाऱ्यांना धमकावतात. त्यांना कर्मचाऱ्यांच्या निलंबन आदेशावर स्वाक्षरी करण्यासाठी वेळ आहे, मात्र वेतन पत्रकावर स्वाक्षरीसाठी वेळ नाही. यासह नियमबाह्य पद्धतीने कर्मचाऱ्यांचे निलंबन होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पगार नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे घराचे हप्ते, मुलांचा शैक्षणिक खर्च, औषध उपचाराचा खर्च व आवश्यक खर्च भागवणे शक्य नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात म्हणणे मांडले आहे. ही बाब जिल्हा उपनिबंधकानी गांभीर्याने घेत बाजार समितीला तत्काळ वेतन करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र यावर कारवाई झालेली दिसत नाही.
जिल्हा उपनिबंधकांच्या पत्राला केराची टोपली?
बाजार समितीने दोन महिन्यांचे थकित वेतन अदा करण्याबाबत कार्यवाही तत्काळ करण्यात यावी व तसा अहवाल बाजार समितीने सादर करावा. पुढे बाजार समितीची वेतन प्रक्रिया थकित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, याबाबत जिल्हा उपनिबंधकांनी पत्राद्वारे सभापती व सचिवांना लेखी कळविले आहे.
मात्र तरीही सभापतींनी गेल्या पाच दिवसांत कुठली कार्यवाही केलेली नाही. कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात आमदार सुहास कांदे यांनी याप्रकरणी चर्चा करून यावर तोडगा काढण्याबाबत भूमिका घेतली आहे; मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना पगार कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.