Mango Price : यंदा आंबा भाव खाणार? ५ डझन आंब्याला तब्बल २५ हजार रुपयांचा सौदा

Kolhapur Market Yard : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतर्फे येथील शाहू मार्केट यार्डात घाऊक फळ बाजारात यंदाच्या हंगामातील हापूस व पायरी आंबा मुहूर्ताचे सौदे करण्यात आले.
Mango Price
Mango Priceagrowon

Mango Prices Dozen : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतर्फे येथील शाहू मार्केट यार्डात घाऊक फळ बाजारात यंदाच्या हंगामातील हापूस व पायरी आंबा मुहूर्ताचे सौदे करण्यात आले. यामध्ये हापूसला २५ हजार रुपये पेटी, तर पायरी १६ हजार ५०० असा उच्चांकी भाव मिळाला.

बाजार समितीचे सभापती भारत पाटील-भूयेकर यांच्या हस्ते मुहूर्ताची सौदे काढण्यात आले. दरवर्षीपेक्षा यंदा आंब्याच्या पेटीला चांगला भाव मिळाला आहे.

मार्केट यार्डातील फळ बाजारात दस्तगीर मकबूल बागवान यांच्या अडत दुकानात सलीम काझी (रा. रत्नागिरी) यांच्या आंबा बागेतील हापूस, तर परवेज हाजी बादशाह बागवान यांच्या आडत दुकानात रायबा तांबे (रा. रत्नागिरी) यांच्या बागेतील पायरी आंब्याची आवक झाली. त्याचे येथे मुहुर्ताचे सौदेही झाले, दोन्ही पेट्यामध्ये प्रत्येकी पाच डझन आंबे होते.

जावेद बागवान यांनी हापूस, तर आफान बागवान यांनी पायरी आंब्यांची उच्चांकी भावात खरेदी केली. याशिवाय सहा डझन कच्या आंबा पेटीचेही यंदा प्रथमच सौदे झाले. यात ११ हजार ७११ या किमतीस कुमार आहुजा यांनी पेटी खरेदी केली, तर दोन डझनाचा एक बॉक्स तीन हजार ६०० रुपये किमतीस सोहेल बागवान यांनी खरेदी केला.

या मुहूर्ताच्या सौद्यास प्रकाश देसाई, राजाराम चव्हाण, शेखर देसाई, बाळासाहेब पाटील, सूर्यकांत पाटील, संदीप वरंडेकर, सुयोग चौगुले, शिवाजी पाटील, नानासो कांबळे आदी उपस्थित होते.

मुहूर्ताचे सौदेच उच्चांकी

दरवर्षी मुहूर्ताचे सौदे होतात तेंव्हा सरासरी पाच हजार ते दहा हजारांचा भाव मिळतो. यंदा मात्र हापूस आंब्याला २५ हजारांचा भाव मिळाला आहे. मुहुर्ताच्या सौद्यात खरेदी करणे मानाचे प्रतीक मानले जाते. त्यासाठी पहिल्याच सौद्याचे भाव उच्चांकी असते.

त्यानंतर जसजशी आवक वाढते तसे आंबा पेटीचे भाव कमी होतात. सर्वसामान्यांना परवडेल अशा भावात यंदाही हापूस व पायरी आंब्यांची चव चाखता येणार आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com