Mango Season : सातपुड्यात आंबा बागांना मोहर कमी

Mango Blossom : खानदेशात सातपुड्यातील आंबा बागा यंदा नैसर्गिक समस्या व ढगाळ वातावरण यामुळे संकटात आहेत.
Mango Season
Mango SeasonAgrowon
Published on
Updated on

Nandurbar Jalgaon News : खानदेशात सातपुड्यातील आंबा बागा यंदा नैसर्गिक समस्या व ढगाळ वातावरण यामुळे संकटात आहेत. पिकातील मोहोर गळून पडत आहे. यामुळे पुढे उत्पादन कमी येईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही ठिकाणी तसेच सातपुडा पायथा परिसरातील आंबा बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बुरशीनाशकांची फवारणी केली जात असून, पुनःपुन्हा होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे हा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, धुळ्यात शिरपूर, नंदुरबारात शहादा, अक्कलकुवा, नवापूर व तळोदा भागात आंबा बागा आहेत.

तसेच सातपुड्यातही अनेक वर्षे आंबा बागा वाढल्या आहेत. नंदुरबारातील तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, गोपाळपूर, रोझवा पुनर्वसन भागातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक पिकांकडे वळला आहे. या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पन्न घेत आहेत. सतत ढगाळ वातावरण असल्याने आंबा बागांत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ हवामान तसेच वातावरणात गारठा कमी-जास्त होत आहे.

Mango Season
Mango Orchard : केसर आंबा बागेतील मोहोर संरक्षण

यामुळे आंब्यांना तुडतुडे, फुलकिडे या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषितज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. काही आंबा बागांवर भुरी या बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत असून, ढगाळ व दमट हवामानामुळे झपाट्याने प्रसार होऊन आंबा मोहराचे देठ, फुले यावर कृषी जाळी तयार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सहकारी बुरशीनाशकाचे फवारणी करण्यात येत आहे.

दरम्यान, परिसरात आंबा बागांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, सातपुडा पायथ्यालगत आपापल्या घरांच्या अवतीभवती ग्रामस्थांनी आंब्यांची लागवड केली असून, त्याला यंदा चांगला मोहर आल्याचे चित्र असून, यंदा चांगले उत्पन्न मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आंब्याच्या झाडाची फांदी वाकू नये म्हणून शेतकऱ्यांकडून आतापासून झाडांना लाकडाच्या साह्याने आधार देण्यात आला आहे.

Mango Season
Hapus Mango : पहिल्या टप्प्यातील हापूस फेब्रुवारीअखेरीस बाजारात

शेतकरी आंबा पिकाच्या संरक्षणावर विशेष मेहनत घेत असून, गेल्या दोन महिन्यांपासून ढगाळ वातावरण व गारठ्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. एकदाचे निरभ्र व पुरेसा सूर्यप्रकाश असलेले वातावरण राहिल्यास बुरशीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लिंबावरही फवारणी

तळोदा तालुक्यात विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लिंबाची झाडे आहेत. काही परिसरात त्याच्यावरही काही प्रमाणात बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही बुरशीनाशकाची फवारणी करण्यात असून, त्यांचीही निगा राखली जात आहे.

सातपुड्यात आंब्याचे जुने वृक्ष आहेत. हे पारंपरिक वाण आहेत. ते प्रतिकारक्षम आहेत. परंतु यंदा थंडी कमी व ढगाळ, पावसाळी स्थिती अधिक असे वातावरण अनेक दिवस राहिले आहे. यामुळे आंबा व इतर फळ बागांत बुरशीजन्य रोग आले आहेत. यामुळे उत्पादनासही फटका बसू शकतो.
- महेश महाजन, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, पाल (ता. रावेर, जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com