Turmeric Crop Management : वाढीच्या अवस्थेतील हळद पिकाचे व्यवस्थापन

Turmeric Crop Farming : सध्या हळद लागवड होऊन १२० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हळद पिकाची शाखीय वाढ पूर्ण होण्यासाठी ४६ ते १५० दिवसांचा कालावधी महत्त्वाचा असतो.
Turmeric Crop Management
Turmeric Crop Management Agrowon
Published on
Updated on

डॉ. मनोज माळी

Turmeric Crop Irrigation : सध्या हळद लागवड होऊन १२० दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. हळद पिकाची शाखीय वाढ पूर्ण होण्यासाठी ४६ ते १५० दिवसांचा कालावधी महत्त्वाचा असतो. या काळात पिकाला फुटवे येऊन नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये येणाऱ्या एकूण पानांची संख्या आणि उंची निश्चित होते.

पावसाळी हंगामात हळदीच्या खोडांची तसेच फुटव्यांची भरपूर वाढ होते. या काळात वातावरणात असलेले २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान पिकाच्या वाढीसाठी पूरक ठरते. हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी खत, सिंचन व्यवस्थापन तसेच तण नियंत्रण इ. महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देणे आवश्यक असते.

याशिवाय तापमानात चढउतार झाल्यास पिकावर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्याचा गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यासाठी खत, सिंचन, तण व्यवस्थापनासह कीड-रोग नियंत्रणावर भर देणे गरजेचे आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खत व्यवस्थापन ः
- हळद पिकास सर्वच अन्नद्रव्यांची कमी अधिक प्रमाणात गरज असते. हळद पिकाला नत्र २०० किलो, स्फुरद १०० किलो आणि पालाश १०० किलो प्रति हेक्टर प्रमाणे रासायनिक खत मात्रा देण्याची शिफारस आहे.

- संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीवेळी आणि नत्राची मात्रा दोन समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी तर दुसरा हप्ता भरणीवेळी (लागवडीनंतर १०५ दिवसांनी) द्यावा.

- ज्या ठिकाणी अद्याप भरणी राहिली असेल तेथे तत्काळ पिकास मातीची भर देऊन घ्यावी. यावेळी हेक्टरी २१५ किलो युरीया तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये १२.५० किलो फेरस सल्फेट (हिराकस) आणि १० किलो झिंक सल्फेट तसेच निंबोळी किंवा करंजी पेंड २ टन याप्रमाणे वापर करावा.

- भरणी करताना खतमात्रा दिल्यामुळे खते योग्यरित्या मातीत मिसळली जातात. भरणी केल्यामुळे उत्पादनामध्ये साधारणपणे १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.

Turmeric Crop Management
Grape Crop Management : द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेच्या अवस्थेतील व्यवस्थापन

फर्टिगेशन ः
हळदीचे जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर फायदेशीर ठरतो. त्यामुळे पिकाच्या गरजेनुसार खत व्यवस्थापन करणे शक्य होते. माती परिक्षण केल्यानंतरच विद्राव्य खतांचा वापर करावा. कारण, एखादा अन्नघटक शिफारशीत प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पडल्यास त्याचा विपरित परिणाम त्वरित पिकाच्या वाढीवर दिसून येतो.

जसे की अन्नघटक जास्त झाल्यास पिकाची शाकीय वाढ जास्त होते आणि हळद काडावरती जाते. हळद कंदवर्गीय पीक असल्यामुळे जेवढे जास्त फुटवे येतील तितके कंदाचे वजन वाढते. मोठ्या कंदामुळे उत्पादनात चांगली वाढ मिळण्यास मदत होते. फर्टिगेशद्वारे द्यावयाची मात्रा आणि जमिनीद्वारे द्यावयाची मात्रा ही पूर्णपणे वेगळी असते. त्यामुळे योग्य मात्रेचा योग्य कालावधीत वापर करावा.

Turmeric Crop Management
Grape Crop Management : द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेच्या अवस्थेतील व्यवस्थापन

पीक वाढीची अवस्था---लागवडीपासूनचा कालावधी---अन्नद्रव्यांची मात्रा
००---००---किलो प्रति हेक्टर---किलो प्रति आठवडा
००---००---नत्र---स्फुरद---पालाश---नत्र---स्फुरद---पालाश
लागवड ते उगवण अवस्था---३ ते ४ आठवडे (२ समान हप्ते)---१५---१५---७.५०---७.५०---७.५०---३.७५०
शाखीय वाढ---५ ते १४ आठवडे (१० समान्न हप्ते)---७५---२२.५---१५---७.५०---२.२५०---१.५००
कंद वाढीची सुरुवात---१५ ते २६ आठवडे (१२ समान हप्ते)---३७.५---२२.५---२२.५---३.१२५---१.८७५---१.८७५
कंद तयार होण्याची अवस्था---२७ ते ३२ आठवडे (६ समान हप्ते)---२२.५---१५---३०---३.७५०---२.५००---५
एकूण---००---१५०---७५---७५---००---००---००

सिंचन व्यवस्थापन ः
हळद पिकामध्ये उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत हा जमिनीत वाढणारे कंद आहेत. त्यामुळे जमिनीतील चार प्रमुख घटक जसे की मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीत केवळ मातीचे कण राहिले तर जमीन कोरडी होते. परिणामी मुळांच्या वाढीला वाव मिळत नाही.

जमिनीत पाणी जास्त झाले तर आवश्यकतेपेक्षा जास्त ओलावा (चिखल) तयार होतो. त्यामुळे कंद कुजण्याचे प्रमाण वाढते. ज्या जमिनीत मातीचे प्रमाण ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के तसेच हवा आणि पाणी यांचे प्रमाण प्रत्येकी २५ टक्के असते, अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते.

- पावसाळ्याच्या कालावधीत जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन करावे. हळद पिकामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे मुळांना ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल होतात. कंदकूज दिसून येते. अशावेळी शेतात साचलेल्या पाण्याचा तत्काळ निचरा करावा.

- रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीर ठरतो. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करावा.

- जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अभ्यास करूनच सिंचन करावे. सतत पाणी सोडू नये. जमिनीत सतत ओलावा राहिल्यामुळे हळकुंडे कुजण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी पाण्याचा प्रमाणशीर वापर करावा.

- हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. पाऊस समाधानकारक असेल तर हलक्या ते मध्यम जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्या लागतात.

- शिफारशीत मात्रेपेक्षा पाण्याचे प्रमाण कमी पडल्यास कंदांची योग्य वाढ होत नाही. प्रक्रियेनंतर अशा हळकुंडाचा रंग फिका पडतो. परिणामी विक्रीवेळी अपेक्षित दर मिळत नाहीत.

फायदे ः
- ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो.

- जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.

- मुळांजवळ कायम वाफसा स्थिती राखली जाते. त्यामुळे सूक्ष्म जीवांच्या क्रिया सुधारते.

- मुळांद्वारे अन्नद्रव्यांचा शोषण अधिक होऊन सूक्ष्म पाने लवकर मोठा होतात. त्यामुळे हळदीचा मुख्य गुणवत्ता घटक असलेल्या कुरकुमीनचे (रंजकद्रव्य) प्रमाण वाढण्यास मदत होते.

तण नियंत्रण ः
- हळद पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. शेणखतातून तणांचे बी शेतात येते. शेतात वाढलेली विविध तणे ही यजमान वनस्पती म्हणून कार्य करतात. त्यामुळे पिकावर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी तणांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे.

- लागवडीपासून ६०, ९० आणि १२० दिवसांच्या अंतराने तणांच्या तीव्रतेनुसार निंदणी करून घ्यावी. विशेषतः हळद उगवणीनंतर तणनाशकाचा वापर टाळावा. तणनाशकाच्या फवारणीमुळे पिकाच्या शारिरीक क्रियांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत
हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com