डॉ. भरत पाटील, डॉ. कल्पना दहातोंडे, डॉ. शर्मिला शिंदे
Vegetable Crop Management : उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकांचे दर्जेदार व अधिक उत्पादन मिळविण्यासाठी तांत्रिक बाबी विचारात घेऊन सुयोग्य नियोजन करणे आवश्यक असते. जेणेकरून दर्जेदार उत्पादन मिळून चांगला बाजारभाव मिळेल.
उन्हाळी हंगामामध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. त्यात प्रामुख्याने काकडी, कलिंगड, खरबूज, कारली, दोडका, दुधी भोपळा, तांबडा भोपळा, घोसाळी, भेंडी, गवार, मिरची आणि टोमॅटो इत्यादी भाजीपाला पिकांचा समावेश असतो. उन्हाळी हंगामातील भाजीपाला पिकांना बाजारात चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी अधिक प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते. पाण्याची कमतरतेमुळे उत्पादन कमी मिळते, परंतु बाजारभाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा भाजीपाला लागवडीकडे विशेष कल असतो.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच या हंगामातील लागवडीमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने अधिक असतो. त्यामुळे उत्पादनात घट येते. तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास फूलगळ होते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड करताना योग्य नियोजन आणि व्यवस्थापण करणे अत्यंत आवश्यक आहे.
उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या बाबी ः
- लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड
- कीड-रोग प्रतिकारक तसेच दर्जेदार उत्पादन आणि अधिक तापमानास सहनशील वाणांची निवड.
- बियाणे प्रमाण व बीजप्रक्रिया.
- दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर.
- आच्छादनाचा वापर.
- ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब.
- शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलित वापर.
- वाढीच्या अवस्थेनुसार योग्य संजीवकांचा वापर.
- योग्यवेळी आंतरमशागतीची कामे.
- टोमॅटो व वेलवर्गीय भाज्यांसाठी आधार देणे.
- रोपवाटिका ते फळधारणा अवस्थेपर्यंत एकात्मिक कीड-रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब.
- उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी सच्छिद्र प्लॅस्टिक जाळीचा (शेडनेट) वापर.
वेलवर्गीय पिकांसाठी आधार व्यवस्थापन ः
- वेलवर्गीय भाज्या उदा. कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी, पडवळ या पिकांना वाढीच्या काळात आधार दिल्यास त्यांचा वाढ चांगल्याप्रकारे होते. त्यासाठी मंडप किंवा ताटी पद्धती वापरून वेलींना आधार दिला जातो.
- दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविण्याकरिता वेलींना मंडप किंवा तारेच्या साह्याने वाढविणे गरजेचे असते. आधार दिल्यामुळे नवीन येणाऱ्या फुटींना वाढीसाठी सतत चांगला वाव मिळत राहतो. त्यामुळे फळधारणा चांगली होते. याउलट जमिनीवर पहिले काही फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाहीत आणि वेली केवळ एकदाच फळे देतात.
- मंडपावर चढविलेल्या वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात, तर जमिनीवर केवळ ३ ते ४ महिनेच चांगले राहतात.
- मंडपावर किंवा ताटीवर फळे लोंबकळत राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश एकसारखा मिळत असल्यामुळे फळांचा रंग एकसारखा आणि चांगला राहतो. फळांचा जमिनीसोबत संपर्क होत नाही. त्यामुळे ओलावा लागून फळ सडण्याचा धोका टाळला जातो. शिवाय कीड व रोगांचे प्रमाणही कमी राहते.
- फळांची तोडणी, रासायनिक फवारणी ही कामे करणे सुलभ होते. आंतरमशागतीवरील खर्च कमी होतो.
- वेल मंडपावर पोहोचेपर्यंत दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जातो. या काळात या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.
पीक नियोजन ः
१) भेंडी, गवार ः
- भेंडी व गवार या भाज्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर मागणी असते.
- लागवडीसाठी रोगप्रतिकारक्षम व भरपूर उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करावी.
- भेंडी व गवार पिकांना शेणखत व वरखतांच्या मात्रा वेळीच द्याव्यात. शिवाय मातीची भर द्यावी. म्हणजे फळांच्या वजनामुळे झाडे कोलमडणार नाहीत.
- उन्हाळ्याच्या दिवसांत सिंचनाचे काटेकोर नियोजन करावे.
- पीक परिपक्व झाल्यावर एक दिवसाआड तोडणी करावी. म्हणजे कोवळा माल बाजारात विक्रीस नेता येतील. कोवळ्या परंतु पक्व झालेल्या मालास चांगला बाजारभाव मिळतो.
टोमॅटो ः
- लागवडीसाठी वाण निवडताना प्रामुख्याने अधिक पाने येणारा, उष्ण तापमानात फळधारणा होणारा तसेच बोकड्या रोगास सहनशील व फळांना तडे न जाणारा या बाबी विचारात घ्याव्यात.
- चांगल्या उत्पादनाच्या दृष्टीने झाडांना आधार देणे महत्त्वाचे असते. फळांच्या वजनामुळे झाडे कोलमडण्याची शक्यता असते. त्यासाठी टोमॅटो झाडांना बांबू व तारांच्या साह्याने आधार द्यावा. झाडांना आधार न दिल्यास फळांची प्रत खराब होते. फळांचा जमिनीशी संपर्क आल्यामुळे ती सडतात. कीड व रोगांचे प्रमाण वाढते. तसेच वरील बाजूची फळे उघडी पडून त्यांचा रंग फिक्कट होतो. त्यासाठी झाडांना आधार द्यावा.
कीड-रोग व्यवस्थापन ः
- भाजीपाला पिकांमध्ये सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, पांढरी माशी, फुलकिडे, तुडतुडे तसेच कोळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- रोपांपासून पुनर्लागवड करावयाची असलेल्या भाजीपाला पिकांची उदा. मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर इत्यादींची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण या पिकांमध्ये सुरुवातीच्या काळात रस शोषणाऱ्या किडींचे योग्यप्रकारे नियंत्रण न झाल्यास पुढे विषाणूजन्य, जिवाणूजन्य रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी रोपवाटिकेमध्ये रोपे असल्यापासून रस शोषणाऱ्या किडींचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- भाजीपाला पिकांमध्ये पाने पोखरणारी अळी (नागअळी), शेंडा व फळ पोखरणारी अळी, मेलान वर्म, रोपे, देठ कुरतडणारी अळी, फळमाशी इत्यादी किडींचा देखील प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तसेच करपा, भुरी, मर रोग, पर्णगुच्छ किंवा बोकड्या, पाने, फांद्यावर, फळांवर रोगामुळे पडणारे ठिपके, फळसड, केवडा, डिंक्या इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो. या कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा.
- कीड-रोग नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशके किंवा बुरशीनाशकांची फवारणी करावी. तसेच बुरशीनाशकांसोबत कीटकनाशकांची सुसंगतता जाणून घेणे आवश्यक आहे. भाजीपाला पिके फुलोरा अवस्थेत असताना त्यांचा समंजसपणे वापर करावा.
खत व्यवस्थापन ः
- भाजीपाला पिकांसाठी रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा वापर करणे योग्य ठरते. सेंद्रिय खतांमध्ये शेणखताचा किंवा गांडूळ खताचा जास्तीत जास्त वापर करणे जमिनीच्या दृष्टीने हिताचे असते.
- भाजीपाला पिकांना शिफारशीनुसार पीकनिहाय रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. लागवडीपूर्वी माती परीक्षण करून त्यानुसार खत व्यवस्थापन करावे.
- सर्व भाजीपाला पिकांना शिफारशीनुसार नत्र, स्फुरद, पालाश व चांगले कुजलेले शेणखत प्रति हेक्टरी प्रमाणात द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या अगोदर जमिनीत मिसळावे. उरलेली नत्राची मात्रा लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी द्यावी.
पाणी व्यवस्थापन ः
- उन्हाळी हंगामात भाजीपाला लागवडीमध्ये सिंचनाचे काटेकोर नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते.
- सिंचन व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर, पिकाची वाढीची अवस्था या गोष्टी विचारात घ्याव्यात.
- उन्हाळी हंगामात पाणी व्यवस्थापन करताना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास कमी पाण्यात चांगले उत्पादन मिळू शकते. तसेच प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. पाण्याची बचत करणे शक्य होते.
- विशेषतः फुलधारणा ते फळे काढणीच्या काळात एकसारखा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.
- शक्यतो सकाळी, संध्याकाळी अथवा रात्रीच्या वेळी सिंचन करावे. भर उन्हात दुपारी सिंचन करणे टाळावे.
प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर ः
- उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते. अशा वेळी आच्छादन केल्यास झाडांजवळील जमिनीचा पृष्ठभाग झाकून ठेवला जातो. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन पाण्याची देखील बचत होते. जमिनीत ओलावा टिकवून ठेवला जातो.
- आच्छादनासाठी पॉलिथिन मल्च, गवत, पालापाचोळा इत्यादींचा वापर करता येतो. आच्छादन केल्यामुळे फळ धारणा झाल्यानंतर फळांचा जमिनीशी संपर्क येत नाही. त्यामुळे फळाची प्रत खराब होण्याचा धोका टाळला जातो. शिवाय जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. तणांचा बंदोबस्त होतो.
- वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये काकडी, कलिंगड, ढेमसे आणि खरबूज तसेच मिरची, वांगी, टोमॅटो या पिकांमध्ये आच्छादनाचा वापर फायदेशीर ठरतो.
- मुळांच्या भोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन मुळांची वाढ चांगली होण्यास मदत होते. बीज उगवणक्षमतेत वाढ होते.
- प्लॅस्टिक आच्छादनामुळे कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढून प्रकाश संश्लेषणाला मदत होते. गादीवाफ्यावर पाणी साचून राहात नाही. रोपांची वाढ व्यवस्थित होते. आंतरमशागतीची कामे कमी होतात. आणि एकंदरीत उत्पादन खर्चात बचत होते.
भाजीपाला काढणी ः
- भाजीपाला पिकांची काढणी करताना बाजारपेठेचा अंदाज घेऊन करावी. दूरच्या बाजारपेठेत विक्री करण्याचे नियोजन असल्यास फळांची तोडणी शक्यतो सायंकाळी करावी.
- फळाची तोडणी केल्यानंतर त्यांची रंगानुसार, आकारानुसार प्रतवारी करून नंतरच पॅकिंग करावे. पॅकिंग करताना फळांची चकाकी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- सर्वसाधारणपणे दुधी भोपळा, भेंडी, गवार, काकडी या पिकांची फळांची तोडणी एक दिवसाआड तर कारली फळांची तोडणी ७ ते ८ दिवसांनंतर करावी. दोडका, घोसाळी या फळांची तोडणी २ ते ३ दिवसांनी करावी. वांग्याची तोडणी ४ दिवसांच्या, तर मिरची तोडणी ८ ते १० दिवसांच्या अंतराने करावी.
- डॉ. भरत पाटील, ९४२०९ ५१८४०
(अखिल भारतीय भाजीपाला संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. जि. नगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.