Sugarcane Management : अवर्षणग्रस्त परिस्थितीत उसाचे व्यवस्थापन

Article by Arun Deshmukh : सध्याच्या पाणीटंचाईमुळे अनिष्ट परिणाम होऊन आडसाली व पूर्वहंगामी उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. हे लक्षात घेऊन पीकवाढीच्या अवस्थेनुसार ठिबक सिंचनातून पाणी व खतांचे योग्य नियंत्रण करावे. यामुळे जमिनीमध्ये पिकाच्या मुळांशी अन्न, पाणी व हवा यांचे संतुलित प्रमाण पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये ठेवता येते.
Sugarcane
SugarcaneAgrowon

Sugarcane Under Drought Prone Condition Farming Management : सध्याच्या वाढत्या तापमानात पाण्याचे काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. शेतामध्ये ऊस १२ ते १८ महिने उभा असतो. वाढीच्या काळात या पिकास बदलत्या हवामानाला तोंड द्यावे लागते, त्यामुळे ऊस उत्पादनात चढ-उतार आढळून येतात.

मार्च ते जून या कालावधीत ऊस पिकास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ताण बसतो, यामुळे पीकवाढ आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

मार्च ते जून या चार महिन्यात संपूर्ण वर्षातील बाष्पीभवनातील ४० ते ४५ टक्के म्हणजे जवळपास निम्मे बाष्पीभवन होते, तर जुलै ते ऑक्टोबर महिन्यात ३० ते ३५ टक्के आणि उरलेले ३० ते ३५ टक्के नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात होते.

वाढलेल्या तापमानाचा परिणाम

सध्या हवा, जमिनीतील तापमान वाढत आहे. एप्रिल, मेमध्ये राज्यातील काही भागांत हवेतील तापमान ४५ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, त्यामुळे ऊस पिकाचे तापमान खूपच वाढेल.

वेगवान व शुष्क हवेमुळे जमीन तसेच ऊस पिकाच्या शरीरातील ओलाव्यात झपाट्याने घट होत आहे.

बाष्पीभवनाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे.

उन्हाळ्यात दिवसाचा कालावधी जास्त असून, दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो. रात्रीचे तापमान वाढत असते.

मुळांभोवती तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होत आहे, परिणामी मुळांद्वारे पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणात घट होत आहे.

उसाच्या पानावरील पर्णरंध्राद्वारे होणारे बाष्पीभवन वाढत आहे.

पाण्याचा ताण बसत असून पिकाची समाधानकारक वाढ होत नाही. पाणीटंचाईमुळे अनिष्ट परिणाम होऊन आडसाली व पूर्वहंगामी उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होईल.

पाण्याच्या ताणामुळे होणारे दुष्परिणाम

पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.

मुळांची कार्यक्षमता घटते, त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाशसंश्‍लेषणाची क्रिया मंदावते.

अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होऊन पानातील हरितद्रव्याचे प्रमाण घटते.

तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात धशीचे प्रमाण वाढते.

पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. वजन घटते.

सुरू हंगामात लागण केलेल्या तसेच खोडवा पिकात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्याने उत्पादन कमी येते.

Sugarcane
Sugarcane Production : साखर उत्पादनात कोल्हापूर आघाडीवर, यंदाच्या गळीत हंगामात उताऱ्याची टक्केवारी वाढली

उपाययोजना

प्रवाही सिंचन पद्धतीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणेसाठी लांब सरी, एका आड एक सरी किंवा जोड ओळ पट्टा पद्धतीचा वापर करावा.

प्रवाही सिंचनाचे पाट व दांड स्वच्छ ठेवावेत.

मे महिन्यातील उपलब्ध पाणी विचारात घेऊन उसाचे क्षेत्र मर्यादित ठेवावे.

लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाळ्यातील अंतर कमी ठेवावे.

जास्त खोलीच्या भारी, मध्यम आणि हलक्या जमिनीत प्रत्येक सरीतून उपलब्ध पाण्याचा प्रवाह अनुक्रमे १ ते १.५, २ ते २.५ आणि २.५ ते ३ लिटर. प्रति सेकंद याप्रमाणे विभागून द्यावा.

पिकाची खालची वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. पाचट आच्छादनाने पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येते. पाण्याच्या ३ ते ५ पाळींत बचत होते.

शेताच्या बाहेरील बाजूस साधारणपणे एक मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये.

पीक नेहमी तणविरहित ठेवावे. सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करावा. पाण्याची उपलब्धता पाहूनच रासायनिक खतांचा वापर करावा.

पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पोटॅश खताची २५ टक्के मात्रा अधिक द्यावी.

दर २१ दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश अधिक दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.

पाण्याचा ताण असताना रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी मल्टिन्यूट्रियंट (मॅक्रो आणि मायक्रो) द्रवरूप खतांच्या एक टक्का या प्रमाणात एक महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात.

पट्टा किंवा जास्त अंतरावरील लागण पद्धतीत मधल्या पट्ट्यात हलकी कुळवणी करावी.

काणी व गवती वाढ या रोगांचा तसेच खोडकीड, कांडीकीड, वाळवी इत्यादी किडींचा प्रादुर्भाव वाढतो. हे लक्षात घेऊन नियंत्रणाची उपाययोजना करावी.

मार्चच्या पुढे उसाची नवीन लागवड करू नये.

खोडव्याचे योग्य व्यवस्थापन करावे. पाचट आच्छादन, पाचट कुजवणे, बुडख्यांची जमिनीलगत छाटणी, नांग्या भरणे आणि शिफारशीनुसार मल्टिन्यूट्रियंट द्रवरूप खतांची फवारणी करावी.

प्रवाही सिंचन पद्धतीऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. अन्न आणि पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.

योग्य ठिबक सिंचन

शक्यतो १६ मी.मी. व्यासाची इनलाइन ड्रीप वापरणे फायदेशीर असते.

मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी १.५० मीटर (५ फूट) असावे. जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर १.८० मीटर (६ फूट) असावे.

दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी तर ड्रीपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा.

पृष्ठगाखालील ठिबक सिंचनासाठी दाब नियंत्रित इनलाइन ड्रीप वापरणे फायदेशीर आहे. दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी आणि ड्रीपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा. एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ताशी १ लिटर प्रवाह देणारे ड्रीपर असणारी इनलाईन वापरणे फायदेशीर आहे.

ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कमी अंतराने म्हणजेच दरदिवशी किंवा एक दिवसाआड कमी प्रवाहाने परंतु जास्त कालावधीसाठी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पिकांच्या मुळांशी पाण्याचे अपेक्षित व योग्य प्रकारे उभे आडवे प्रसरण होते. मुळांची वाढ चांगली खोलवर होते. पिकाची जोमदार वाढ होऊन भरीव उत्पादन मिळते. यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड करणे, दोन ठिबक नळ्यामधील योग्य अंतर व ड्रीपरचा प्रवाह निश्‍चित करणे महत्त्वाचे आहे.

कमी कालावधीमध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रीपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो, परंतु हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे.

Sugarcane
Sugarcane Production : साखरेच्या सरासरी उताऱ्यात ०.२० टक्क्यांनी वाढ, उसाचा दर वाढणार का?

योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड

जमिनीचा प्रकार शिफारशीत ठिबक सिंचन प्रणाली दोन ठिबक नळ्यातील अंतर (मी.) दोन ड्रीपरमधील अंतर (मी.) ड्रीपरचा प्रवाह (लिटर/तास)

उथळ कमी खोलीची जमीन पृष्ठभागावरील ठिबक १.३५ ०.३० १

मध्यम खोलीची जमीन पृष्ठभागावरील / पृष्ठभागाखालील ठिबक १.५० ०.४० १ / १.६ /२

जास्त खोलीची काळी जमीन पृष्ठभागावरील / पृष्ठभागाखालील ठिबक १.८० ०.५० १.६ / २

चढ-उताराची जमीन पृष्ठभागावरील दाबनियंत्रित ड्रीपर असणारी इनलाइन ठिबक १.५० ०.४० १ / १.६

ठिबक सिंचन पद्धतीचा वापर

पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी व खतांचे योग्य नियंत्रण करावे. जमिनीमध्ये पिकाच्या मुळांशी अन्न, पाणी व हवा यांचे संतुलित प्रमाण पीकवाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये ठेवता येते.

प्रचलित सरी-वरंबा पद्धतीने पाणी देण्याशी तुलना करता ४५ ते ५० टक्के पाण्यात बचत होते.

पाणी वापर कार्यक्षमता दुपटीने ते अडीच पटीने वाढते.

पाण्यामध्ये विरघळणारी अथवा द्रवरूप खते ठिबक सिंचनातून दिल्याने खत वापर कार्यक्षमता वाढते. प्रचलित सरी-वरंबा पद्धतीशी तुलना करता खतांमध्ये ३० टक्के बचत होते.

ऊस लागवड खर्चामध्ये २० टक्क्यांपर्यंत बचत होते.

पीक जोमदारपणे वाढल्याने रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. ऊस उत्पादनात ३० टक्के वाढ होते. साखर उताऱ्यात ०.५ युनिटने वाढ होते.

जमिनीची सुपीकता व उत्पादनक्षमता कायमस्वरूपी टिकवून ठेवली जाते.

- अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com