Pune News : पुणे जिल्ह्यात पाऊसमान चांगले असल्यामुळे रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकरी ज्वारी, गहू पिकांवर भर देत आहेत. त्यामुळे यंदा ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने अनेक शेतकऱ्यांनी रब्बीचे नियोजन करण्यास सुरुवात केली असली तरी आर्थिक अडचणी असल्याने पीककर्ज काढून रब्बीसाठी निविष्ठा खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती दौंड तालुक्यातील राजेगाव येथील शेतकरी धनंजय आटोळे यांनी दिली.
शिरूर तालुक्यातील कर्डे येथील भाऊसाहेब पळसकर म्हणाले, की तालुक्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरीच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झालेली आहे. माझ्याकडे एकूण २२ एकर शेती आहे. सध्या खरिपातील चार एकरांवर कांदा पीक केले होते. तो वाढीच्या अवस्थेत आहे. मूग सहा एकरांवर केला होता. आता काढणी झाली असून शेत खाली आहे. तर अर्धा एकरावर रब्बीत कांदा लावण्यासाठी रोपे टाकलेली आहेत.
मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रब्बीत कांदा, कलिंगड ही केली जाणार आहे. याशिवाय काही क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जाणार आहे. त्यासाठी नांगरट करून पाळी घालून पेरणीसाठी शेत तयार केले आहे. रब्बीत सहा एकरांवर ज्वारीची पेरणी केली जाणार आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे घरचे आहे. याशिवाय कृषी विभागाकडूनही बियाणे घेतले जाणार आहे. याशिवाय खते अजून घेतलेले नाही. त्यामुळे पाऊस झाल्यावर खतांची खरेदी केली जाणार आहे. सर्व पेरणीचे नियोजन हे स्वखर्चावर केले जाणार आहे. त्यासाठी कोणतेही कर्ज घेतले जाणार नाही. याशिवाय कांद्याची चार एकरांवर लागवड केली जाणार आहे.
भोर तालुक्यातील संगमनेर येथील किरण यादव म्हणाले, ‘‘पावसाळ्यात आमच्या भागात जोरदार पाऊस झाला आहे. माझ्याकडे एकूण तीन एकर शेती आहे. त्यातील एक एकरांवर खरिपात सोयाबीन पीक घेतले होते. तर पाऊण एकरांवर भुईमूग पीक घेतले होते. तर दहा गुंठे क्षेत्रावर कडधान्य, एक एकरांवर भात पीक घेतले होते. यापैकी अतिपावसामुळे कडधान्य हाताला लागली नाही. बाकी पिकांची स्थिती चांगली आहे. त्यातून अपेक्षित चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर रब्बीत कांदा, ज्वारी, गहू, हरभरा अशी पिके घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी निविष्ठा अद्याप खरेदी केलेल्या नसल्या तरी लवकरच त्या खरेदी केल्या जाणार आहे. त्यासाठी कर्ज घेतले जात नाही. गेल्या वर्षी रब्बीत टोमॅटो, कांदा, गहू, ज्वारी अशी पिके घेतली होती. त्यातूनही चांगले उत्पन्न मिळाले होते. त्याच धर्तीवर चालू वर्षीही रब्बीचे केले आहे.
पुणे जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक सरासरी क्षेत्र
रब्बी ज्वारी १,३०,०००
गहू ४५,०००
मका २५,०००
इतर रब्बी तृणधान्य ५५०
हरभरा ३५०००
इतर रब्बी कडधान्य ३२७०
करडई ४०
तीळ ४०
सूर्यफूल १००
इतर गळीतधान्य २०००
भाजीपाला ८०००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.