Snails Management : नुकसानकारक गोगलगायींचे व्यवस्थापन

Snails Update : गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला आहे. केवळ खरीपातच नव्हे, मॉन्सुनोत्तर पावसाच्या अनियमिततेमुळे रब्बी हंगामातही दीर्घकाळापर्यंत अनेक पिकांवर गोगलगायचा प्रादुर्भाव आढळून येतो.
Snails
SnailsAgrowon
Published on
Updated on

डॉ. अमोल काकडे, डॉ. प्रशांत भोसले

Agriculture Update : गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला आहे. केवळ खरीपातच नव्हे, मॉन्सुनोत्तर पावसाच्या अनियमिततेमुळे रब्बी हंगामातही दीर्घकाळापर्यंत अनेक पिकांवर गोगलगायचा प्रादुर्भाव आढळून येतो. गोगलगाय ही एक निशाचर अशी बहूभक्षी कीड असून, ती रात्रीच्या वेळी पिकांच्या कोवळ्या रोपांची पाने खाऊन टाकते.

दिवसा आडोशाला, पालापाचोळ्याखाली लपत असल्याने त्या पिकांवर फारशा आढळत नाहीत. जून ते सप्टेंबर या काळात गोगलगायी अत्यंत सक्रिय असतात. त्यापुढील काळामध्ये नाले, ओढ्यालगतच्या शेतांमध्ये त्यांचा प्रादुर्भाव अधिक दिसतो. गोगलगाईंचा समावेश मृदूकाय (मोलुस्का ) वर्गात होतो. त्यांचे शंखी (स्नेल) आणि शेंबी (स्लग) असे दोन प्रकार पडतात. शंखी म्हणजे कवच असलेल्या गोगलगाय, तर शेंबी म्हणजे कवच नसलेल्या गोगलगाय होय. शंकूसारख्या दिसणाऱ्या गोगलगायी विषारी असतात.

Snails
Snails Infestations Control : सामूहिकरीत्या रोखा गोगलगायींचा प्रादुर्भाव

जीवनक्रम

गोगलगायी मिलनानंतर ८ ते २० दिवसांनी २ ते ३ सें.मी. खोलीवर ओलसर ठिकाणी जमिनीत पुंजक्यात सुमारे २०० अंडी घालतात. वयाच्या पहिल्या वर्षी एक गोगलगाय साधारणत: १०० तर दुसऱ्या वर्षापासून साधारणतः ५०० पर्यंत अंडी घालते. गोगलगायी उभयलिंगी एकमेकांसोबत मिलन करतात. त्यांची संख्या झपाट्याने वाढते. गोगलगाय अन्नपाण्याशिवाय ४ ते ६ महिने जिवंत राहू शकते.

पोषक वातावरण

पाऊस, ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता व कमी तापमान (२० ते ३२ अंश सेल्सिअस).

शंखी गोगलगायी अतिथंड व अतिउष्ण हवामानात आपल्या कवचाचे तोंड पातळ पापुद्रयाने बंद करतात. त्या झाडाला, भिंतीला चिटकून सुप्तावस्थेत जातात. सध्या अनेक ठिकाणी ही अवस्था दिसून येते.

Snails
Snail Control : सामूहिकरीत्या करा शंखी गोगलगायींचे नियंत्रण

प्रतिबंधात्मक उपाय

सध्या नदी, नाले, ओढे, पांदण, कालवा, किंवा पाणी साठलेल्या ठिकाणी गोगलगायी सुप्तावस्थेत असतात. सामुहिकरित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा कराव्यात. प्लॅस्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून नष्ट कराव्यात.

शेत किंवा बागेच्या सभोवती बांधापासून आत चुन्याचा १० सेंमी रुंदीचा पट्टा (८ किलो चुना प्रति एकर) टाकून घ्यावा. त्यामुळे गोगलगाईंना शेतात येण्यापासून प्रतिबंध होतो.

फळबागेमध्ये झाडाच्या खोडास बोर्डोपेस्ट १ टक्के (१ किलो मोरचूद + १ किलो चुना प्रति १० लिटर पाणी) लावावी.त्यामुळे गोगलगायी झाडावर चढत नाहीत. याशिवाय बोरीक पावडर, कोरडी राख यांचाही वापर गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी करता येतो.

नियंत्रणात्मक उपाय

सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी हातमोजे व तोंडावर मास्क घालून गोळा कराव्यात. त्या सांगितलेल्या सूचनेप्रमाणे नष्ट कराव्यात.

फळबागेत गोगलगायी नियंत्रणासाठी कॉपर सल्फेट (३०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) यांच्या जमिनीवरील फवारण्या परिणामकारक आहेत. (लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस.)

शेतात लहान शंखी गोगलगायी असल्यास, त्यांच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची (१०० ग्रॅम प्रति एक लिटर पाणी) फवारणी फायदेशीर ठरते.

दाणेदार मेटाल्डीहाईड २ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरवून द्यावे. फळबागेमध्ये प्रति झाड २०० ग्रॅम झाडाखाली पसरून टाकावे. (लेबल क्लेम.)

विषारी आमिष

दहा लिटर पाण्यामध्ये २ किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या कोंड्यात चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामेथोक्झाम (२५ टक्के) ५० ग्रॅम या प्रमाणे चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये पिठाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे. आमिष खाऊन मृत झालेल्या गोगलगायींना पाळीव प्राणी, पक्षी किंवा कोंबड्या खाणार नाहीत, यांची काळजी घ्यावी.

- डॉ. अमोल काकडे, ९४०४१४४५६५ (विषय विशेषज्ञ,पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र, परभणी.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com