डॉ. योगेश मात्रे, डॉ. अनंत लाड, डॉ. पी. एस. नेहरकर
Management of Black Fly :
लिंबूवर्गीय फळपीक सल्ला
सध्या संत्रा, मोसंबी व लिंबू या फळबागांमध्ये काळ्या माशीचे प्रौढ मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. साधारणतः एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबर महिन्यामध्ये काळी माशी अधिक सक्रिय असते. पुढील १० व १५ दिवसांत प्रौढ माश्या कोवळ्या पानातील रस शोषण करून पानांच्या खालील भागात अंडी घालतील. लिंबूवर्गीय फळपिकाला वर्षातून तीन म्हणजे मृग, हस्त आणि आंबिया असे तीन बहर येतात. काळ्या माशीच्या प्रत्येक बहरावर एक याप्रमाणे तीन पिढ्या होतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.
ओळख
संत्र्यावरील काळी माशी आकाराने लहान असून १.० ते १.५ मि.मी. लांब असते.
प्रौढ माशीचे पंख काळसर असून, तिच्या पोटाचा भाग लाल रंगाचा असतो. (तुलनेसाठी पांढऱ्या माशीचे पंख पांढरे असतात.)
प्रौढ मादी माशी संत्र्याच्या नवतीच्या कोवळ्या पानांच्या खालील भागास वर्तुळात अंडी घालते.
ही अंडी सूक्ष्म व सुरुवातीला पिवळसर रंगाची असतात. साधारणपणे चार ते पाच दिवसानंतर अंड्यांचा रंग करडा होतो.
जीवनक्रम
उन्हाळ्यात अंडी १५ ते २० दिवसात, तर हिवाळ्यात २५-३० दिवसात उबतात.
अंड्यातून बाहेर पडलेली पिल्ले अतिशय लहान, चप्पट व फिक्कट पिवळसर रंगाची असतात. त्यामुळे ती सहजपणे दिसत नाहीत. पिल्ले पानावर फिरून योग्य जागेचा शोध घेऊन स्थिरावतात. पानातील अन्नरस शोषतात.
काही दिवसानंतर ही पिल्ले काळी पडतात. त्यामुळे काळ्या माशीचा प्रादुर्भाव लक्षात येतो. पिल्लांच्या तीन अवस्था असतात. त्या पूर्ण होण्यास चार ते सहा आठवड्याचा कालावधी लागतो. त्यानंतर पिल्ले कोषावस्थेत जातात. ही कोषावस्था सहा ते दहा आठवड्यांची असते. कोष पूर्ण काळे व टणक असतात.
प्रादुर्भावाची लक्षणे
प्रौढ माशी व पिल्ले कोवळ्या पानातील रस शोषतात. त्यांच्या अंगातून मधासारखा चिकट गोड पदार्थ उत्सर्जित होतो. या चिकट पदार्थामुळे पानांवर काळी बुरशी (कॅप्नोडिअम सिट्री) झपाट्याने वाढते. या बुरशीमुळे पूर्ण बाग काळी पडलेली दिसते. शेतकरी याला ‘कोळशी’ या नावाने ओळखतात. या कोळशीमुळे प्रकाश संश्लेषणाची किया मंदावते.
आर्थिक नुकसानीची पातळी
५ ते १० पिल्ले प्रति पान.
एकात्मिक व्यवस्थापन
बागेमध्ये झाडांची दाट लागवड करू नये. कॅनोपीमध्ये जास्त गर्दी राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
अधिक मात्रेत नत्रयुक्त खते देण्याचे टाळावे.
बागेमध्ये पाणी साचू देऊ नये. यासाठी उतारास आडवे चर काढावेत. काळ्या पांढऱ्या माशीमुळे प्रादुर्भावयुक्त फांद्या छाटून त्या जाळून नष्ट कराव्यात.
मृग, हस्त आणि आंबिया बहरातील नवती आल्यानंतर कोषातून माश्या बाहेर पडतात. नवतीच्या कोवळ्या पानांवर अंडी घालायला सुरुवात करतात.
अंड्यातून बाहेर निघालेली पिल्ले सुरवातीला अतिशय लहान व नाजूक असतात. त्यामुळे ही अवस्था किडीच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची असते.
नवतीच्या हंगामात मलाडा डेसजारडेन्सी या मित्रकिटकाचे ३० अळ्या प्रति झाड याप्रमाणे दोन वेळा प्रसारण करावे. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
पन्नास टक्के अंडी उबवण्याचा कालावधी आंबिया बहर (एप्रिलचा पहिला पंधरवडा), मृग बहर (जुलैचा दुसरा पंधरवडा), आणि हस्त बहर (डिसेंबरचा पहिला पंधरवडा) किडीच्या नियंत्रणासाठी योग्य ठरविण्यात आल्या आहेत. कीड पेरू, चिकू व डाळिंब अशा फळझाडांवरही येते. त्यामुळे शक्यतो अशी फळझाडे संत्रा बागेशेजारी लावू नयेत.
प्रौढ उत्पत्ती व पन्नास टक्के अंडी उबण्याची स्थिती ही फवारणीकरिता योग्य वेळ असते. कारण या अवधीत किडींच्या प्रथमावस्था झाडांवर उपलब्ध असतात.
किडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी फवारणी प्रती लिटर पाणी
निमतेल १० मि.लि. किंवा ॲझाडिरॅक्टीन (१ टक्के) ३ मि.लि. किंवा निम सोप किंवा करंज सोप ५ ग्रॅम (वनस्पतिजन्य घटक**)
इमिडाक्लोप्रीड* (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. किंवा थायामेथोक्झाम* (२५ डब्ल्यूजी) ०.३ ग्रॅम किंवा डायमेथोएट* २ मि.लि.
(टीप : *लेबल क्लेम व **मोसंबी संशोधन केंद्राची शिफारस.)
डॉ. योगेश मात्रे, (संशोधन सहयोगी), ७३८७५२१९५७,
(कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.