मशागत लेख
मशागत लेखAgrowon

मनाचे पान हलते चार शब्दांनी

एकदा झाडाच्या मुळाशी गेलेले पाणी परत कधीही परतून येत नाही. ते समर्पित झालेलं असतं. पुन्हा आलंच परत तर ते हिरव्यागार पानाफुलांच्या माध्यमातून येतं. त्यांचा जिवंत रसरशीतपणा होऊन, चकाकी होऊन, ऊर्जा होऊन.

एकदा झाडाच्या मुळाशी गेलेले पाणी परत कधीही परतून येत नाही. ते समर्पित झालेलं असतं. पुन्हा आलंच परत तर ते हिरव्यागार पानाफुलांच्या माध्यमातून येतं. त्यांचा जिवंत रसरशीतपणा होऊन, चकाकी होऊन, ऊर्जा होऊन. ऊर्जा नष्ट होत नसते कधीच, तिचे फक्त रूप बदलते ती निर्माणही करता येत नाही.

डोहाची ऊर्जा त्याच्या स्थितीमुळे असते, स्थिर असण्यामुळे असते. तर प्रवाहाची ऊर्जा त्याच्या गतीमुळे असते. प्रेम ही माणसाची ऊर्जा, जीवनाला मोहक गती देणारी. संवादाचे पाणी थेट मुळाशी म्हणजे आत्म्याशी पोचत असते. त्याचे भरणपोषण करत असते. हनन ही करत असते. प्रेमात अफाट ताकद असते बदल घडविण्याची. तिरस्कारातही ती असते, परंतु विध्वंसाची, स्वतःसहित इतरांच्याही. दुसऱ्याच्या घराला आग लावली म्हणजे धग लागणारच. आपण परस्परांशी बोलतो, त्यात आत्मियता किती असते? आस्था किती असते? की निव्वळ तोंडदेखलेपणा? हा संशोधनाचा भाग आहे.अस्सल काळजातून आलेले शब्द आणि वरवर उपचार म्हणून आलेले कोरडे शब्द यातील फरक सुस्पष्ट असतो. संतांचे सहज बोलणेही इतरांच्या कल्याणासाठी असते, कारण ते मुळात प्रेमातून आलेले असते, विश्‍वची माझे घर या भावनेतून आलेले असते.

‘मनाचे पान हलते चार शब्दांनी, उगा ती बोलते का बोलण्यासाठी.’

शबरीच्या बोरांचा आणि सुदाम्याच्या पोह्यांचा तर देवही भुकेला असतो. भौतिक गोष्टी मिळवणे सोपे आंतरिक शुद्ध भाव असलेली नाती अलौकिकतेचा भास देतात. काही लोकांशी साधलेला अगदी थोडाही संवाद मनाला उभारी देणारा असतो. त्यासाठी अशी माणसे आजूबाजूला असणं ही खरी श्रीमंती. हा संवाद दहा पुस्तकांच्या वाचनापेक्षाही प्रभावी असू शकतो. कायिक हिंसेप्रमाणेच वाचिक हिंसाही असते. ती तितकंच नुकसान करते, वेदनादायी असते, म्हणून शब्दांचे शस्त्र जपून वापरायचे असते. सुरी होऊन तोडण्यापेक्षा सुई होऊन जोडता येते. फक्त थोडा लहानपणा घेण्याची तयारी हवी. माघार घेणं म्हणजे दरवेळी हरणं नसतं. इथे जिंकणारा जिंकून ही हरलेला असतो.

लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असे उगाच म्हटले असेल का?

कठीण कातळात ही शुद्ध पाण्याचे शुभ्र झरे असतात तशी वरवर काहीशी कठोर वाटणारी माणसे ही आतून हळवी असतात. शेख महंमद म्हणतात तसे ‘काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा’ पावसासाठी जशी ढग भरून येण्याची गरज असते तसेच एकदा भरून आले, की भरभरून बोलते होतात ते. तोवर वाट मात्र पाहायला हवी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com