Solapur News : वाढत्या उन्हाची तीव्रता व नीरा उजवा कालव्याचे आवर्तन येऊन दीड महिन्याचा कालावधी उलटून गेल्याने माळीनगर भागातील विहिरी, बोअरसारखे पाण्याचे स्रोत आटले आहेत. परिणामी, उष्णतेमुळे ऊस, केळी आदी पिके होरपळून निघाली आहेत.
दरम्यान, पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असली, तरी यंदा दुष्काळामुळे नीरा कालव्याचे उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची सारी भिस्त आता पावसावरच अवलंबून आहे.
माळीनगरसह परिसरातील गट नंबर दोन, सवतगव्हाण, बिजवडी, तांबवे, महाळुंग या गावांमध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. या भागात प्रामुख्याने ऊस, केळी ही पिके सध्या शेतात उभी आहेत. तथापि, पाण्याअभावी या पिकांची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बोअर, विहिरी पूर्णतः आटल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे बोअरची पाणीपातळी खूपच खालावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
काहींची बोअर दोन-तीन तासांवर आली असून तीही गुळण्या मारत आहेत. एवढे दिवस कर्जपाणी काढून जपलेले उसाचे मळे व केळीच्या बागा आता डोळ्यादेखत करपत चालल्याने शेतकरी कासावीस झाले आहेत. पिके वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून नवीन बोअर घेण्याचे धाडस केले आहे. त्यापैकी काहींना पाणी लागले आहे, तर काही बोअर ‘फेल’ गेली आहेत. बोअरवेलचे दरही वाढले आहेत.
अस्तरीकरणामुळे पाझर बंद
गेल्या दोन वर्षांपूर्वी नीरा कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले. ते होण्यापूर्वी कालव्यात पाणी असताना पाझर होऊन विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत चांगली वाढ होऊन ती टिकून राहायची. त्यामुळे कालव्याच्या पाण्याच्या दोन आवर्तनाच्या दरम्यान बोअरवेलच्या पाण्याचा पिकांना चांगला आधार मिळायचा, पण आता पाझर होत नसल्याने बोअर, विहिरी ‘रिचार्ज’ होत नसल्याने तो आधार तुटला आहे. त्यामुळे पिके लवकर पाण्यावर येत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.