Mahatma Jyotiba Phule : सत्यकर्तव्यधारक महापुरुष

Article by Arun Chavhal : आपल्या विचारांना कामांची जोड देणारे ते खरे सत्यशोधक आणि सत्यकर्तव्यधारक महापुरुष आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
Mahatma Jyotiba Phule
Mahatma Jyotiba PhuleAgrowon

Mahatma Jyotiba Phule Jayanti : ‘विद्येविना मति गेली; मतीविना नीति गेली; नीतीविना गति गेली! गतीविना वित्त गेले; वित्ताविना शूद्र खचले; इतके अनर्थ एका अविद्येने केले’, हे महात्मा जोतीराव फुले यांनी लिहून ठेवलेले सत्य समाजोद्धारक आहे. यात केवळ ‘शूद्र’ म्हणजे न शिकणारे हे सूचक असून, यात समाजातील सामाजिकदृष्ट्या सर्वच कमी दर्जाचे समजल्या जाणाऱ्या सर्वांचाच समावेश होतो;

यात शेतकरीही आले. एकीकडे जगाचा अन्नदाता म्हणून शेतकऱ्यांचा उदो उदो केला जातो. दुसरीकडे फक्त ‘रानगठ्ठे’ समजून त्यांना ‘अडाणी’ नसतानाही ‘अडाणी’ म्हटले जाते, ही वस्तुस्थिती जाणून शेतकऱ्यांचे शिक्षण जीवनोद्धारक केले, ते महात्मा फुलेंनी. महत्त्वाचे म्हणजे महात्मा फुले यांचा ‘शेतकऱ्याचा असूड’ हा ग्रंथ कालातीत आहे.

या ग्रंथाची एक आठवण सांगताना महात्मा फुलेंनी स्वतः लिहून ठेवलेले आहे, की श्रीमंत सरकार गायकवाड सेनाखासखेल समशेर बहादूर सयाजीराव महाराज यांनी मी बडोद्यास गेलो होतो, त्या वेळी आपल्या सर्व राजकीय कामातील अमूल्य वेळात काटकसर करून अप्रतिम उल्हासाने व सप्रेम भावाने मजकडून हा ग्रंथ वाचवून साग्र लक्षपूर्वक ऐकिला.

दुसरी गोष्ट अशी, की पुणे, मुंबई, ठाणे, जुन्नर, ओतूर, हडपसर, वंगणी, माळ्याचे कुरूळ येथील माणसांनी या ग्रंथात लिहिलेला मजकूर खरा आहे, अशाविषयी त्यांनी आपल्या सह्या मजकडे पाठविल्या आहेत, हेही स्वतः महात्मा फुले यांनी लिहून पारदर्शक सत्य अधोरेखित केलेले आहे. त्यामुळे बोलक्या किंवा कल्पना रम्यतेत अडकलेल्या लेखन गदारोळापेक्षा त्यांची लेखणी कष्टकऱ्यांच्या बाबतीत इमान राखणारी होती आणि आहे, हे सिद्ध झालेले आहे.

समाजातील वंचित माणसांना आणि स्त्रियांना न्याय देणारे लेखन महात्मा फुले यांनी केले. त्यांच्या लेखनामुळे जाती-धर्माच्या रचनेमुळे होणारी आर्थिक कोंडी आणि त्यामुळे गरिबांची होणारी सामाजिक कुचंबणा प्रकर्षाने जगासमोर आलेली आहे. आपल्या विचारांना प्रत्यक्ष स्वतःच्या कामांची जोड देऊन विचार आणि आचार साध्य करणारे ते खरे सत्यशोधक आणि सत्यकर्तव्यधारक महापुरुष आहेत.

Mahatma Jyotiba Phule
Animal Market : जातिवंत जनावरांसाठी प्रसिद्ध परभणीचा बाजार

आपल्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये शोषक आणि शोषण ठरलेले होते आणि आहे. परंपरागत आणि परिवर्तनीय जीवन यात सातत्याने संघर्ष सुरूच आहे. तो इथल्या मानसिकतेचा एक भाग आहे. महात्मा फुले यांनी पहिल्यापासून ‘सार्वजनिक सत्यधर्माची’ स्थापना करून उपेक्षितांचे अंतरंग साधार उघडून दाखवलेले आहेत. उपेक्षितांच्या समस्या आणि त्यावरील उपाय त्यांनी सांगितलेले आहेत,

हे विशेष! त्यांच्या समकालीन जीवनाचा भेदक वेध घेत असताना, इतिहासाचा दाखला देत त्या काळातील वेदना, अभाव, गरिबी आणि मागासलेपणा दूर करण्यासाठी वर्तमान आणि भविष्यकाळाचा समृद्ध आलेख त्यांनी स्वतः कोरला. स्वतःच्या धर्मपत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पहिल्या शिक्षिका आणि मुलींसाठी पहिली शाळा १ जानेवारी १८४८ रोजी भिडे वाड्यात सुरू करून त्यांनी समाजात स्त्री समानतेचा दिव्य संदेश दिलेला आहे.

‘शेतकरी आणि सुधारणा’, ‘शिक्षण आणि प्रगती’, याबाबतीत तर त्यांच्या विचार-कार्याला तोडच नाही. खेडे, शेतकरी, शेतीतील प्रश्‍न आणि शेतकऱ्यांची दुःखं आणि त्यांचा निपटारा करून ग्रामीण भारताचा विकास करण्यासाठी त्यांनी केलेले लेखन सर्वप्रथम तोलामोलाचे ठरलेले आहे. शेतीमध्ये पहिल्यापासून अनेक संकटे आहेत. त्या काळीही नव्या सारापद्धतीमुळे व दुष्काळामुळे शेती तोट्याची झालेली होती.

शेतकरी कर्जबाजारी झाले होते. शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे जात होत्या. सहजपणे सावकार शेतकऱ्यांच्या जमिनी हडपू लागले. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत होते. या प्रश्नाची दखल घेऊन-विचारविनिमय करून १८७९ मध्ये जमिनीचे हे हस्तांतर थांबविण्यासाठी तत्कालीन इंग्रज सरकारने ‘डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ अॅक्ट’ पास केला. हा कायदा अनेकांना उपयोगाचा होता.

Mahatma Jyotiba Phule
Nanded APMC : हळदीसाठी प्रसिद्ध नांदेडची बाजार समिती

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा होता. पण त्या काळातील पुढाऱ्यांनी सावकारांचीच बाजू घेतली. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. कर्जबाजारी शेतकरी भूमिहीन होऊ नयेत म्हणून त्यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ ओढला. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था शिक्षणाच्या अनार्थाने आणि आर्थिक अप्राप्तीमुळे झालेली आहे,

हे महात्मा फुलेंनी स्पष्ट केलेले आहे. ते लिहितात, ‘‘सांप्रत लक्ष्मी आपल्या ज्ञान व वस्त्रहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या घरांत पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळेना, म्हणून कंटाळून उघड दिवसा आपल्या समुद्र पित्याचे घरी गेली व समुद्राचे पलीकडील तिच्या इंग्रज सख्या-बांधवांनी तिच्या मर्जीप्रमाणे आळस टाकून उद्योगधंद्याचा पाठलाग करून आपल्या घरांतील आबालवृद्ध, स्त्रीजातीस बरोबरीचा मान देऊन त्यांचा इतमाम नीट ठेवू लागल्यामुळे ती त्यांची बंदी बटीक झाल्यावरून, त्यांजबरोबर वरकांती गोड गोड बोलतात खरे,

परंतु त्यास मनापासून विद्या देण्याकरिता चुकवाचुकव करितात. याचे मुख्य कारण हेच असावे, की शेतकरी विद्वान झाल्याबरोबर ते आपल्या खांद्यावर असूड टाकून लक्ष्मीस पुढे घालून आपल्या घरी आणून नांदावयास लावण्याकरिता कधी मागेपुढे पाहणार नाहीत, या भयास्तव ते शेतकऱ्यांस विद्वान करीत नाहीत.’’

या त्यांच्या धारदार आणि टोकदार विचारांनी समाज बदलला. शोषणाचे कडे तुटले. ज्यांनी ‘मतलबी धर्माचे लिगाड’ शेतकऱ्यांच्या मागे लावून त्यांच्या शोषणाचा मार्ग अवलंबिला होता तो मार्ग महात्मा फुले यांच्या विचारांमुळे बंद झाला. एका अभद्रकाळाचा अंत झाला. इंग्रजांची सत्ता आणि अधिकारी त्या काळातील नोकरशाहीवर भाळून बेबंदशाहीने वागत होते.

तेव्हा महात्मा फुल्यांनी ‘उंटावरून शेळ्या हाकी सरकार शहाणे’ हे सुनावले होते. ही परिस्थिती बदलण्याची आजही गरज आहे. बैल आणि गाई मांसाहारासाठी मोठ्या प्रमाणावर मारल्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणारी जनावरेही उरत नव्हती. त्यामुळे उत्तम जनावरांची पैदास आणि जपणूक शेतकऱ्यांनी करावी, याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष महात्मा फुले यांनी वेधले होते. याबरोबरच ‘बहुजन समाजातून शिक्षक निर्माण करून त्यांना शिक्षण द्यावे.

सरकारातील जागांवर बहुजन समाजातून माणसे घ्यावीत. व्यापाऱ्याच्या कुजक्या मालावर नजर ठेवावी. शेतीत सुधारणा करण्यासाठी शेतीसंबंधीचे अत्याधुनिक ज्ञान शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. त्यासंबंधीचे ग्रंथ शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. उत्तम बैल शेतकऱ्यांना असावेत. जनावरांसाठी जंगले मोकळी राहिली पाहिजेत.

वाहणाऱ्या पाण्याला पोलिस आणि सैन्यमार्फत बंधारे घातले पाहिजेत. ठिकठिकाणी असणाऱ्या पाण्याचा शोध घेतला पाहिजे. पिकांचे संरक्षण होण्यासाठी पिकांवर पहारे बसविले पाहिजेत. योग्य श्रममूल्य मिळाले पाहिजे’, अशा समाजदक्ष त्यांनी केलेल्या अनेक सूचना आजही उपयुक्तच आहेत. त्यांच्या ‘इशारा’ या पुस्तकात सुरुवातीलाच एक दोहा आहे.

तो असा, ‘‘जिस तन लागे वहि तन जाने। बीज्या क्या जाने गव्हारा रे।’’, म्हणजेच पोळलेले अंत:करणच वेदना व्यक्त करू शकते, पोटतिडकीने बोलू शकते. शेतकऱ्यांना सगळेच पोळवतात. व्यवस्थेने आणि सरकारने शेतकऱ्यांप्रति तिऱ्हाइताची भाषा न बोलता पोटतिडकीने जाणून समभावाने वागावे, हीच मानवता आहे. मानवता जपणाऱ्या महात्मा फुले या महामानवास आज (११ एप्रिल) जयंतीनिमित्त विचारकृतीने अभिवादन करूयात!


(लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com