Marathi Identity Politics : महाराष्ट्रधर्म आणि ‘महाराष्ट्रकारणा‘चे राजकारण

Maharashtra Cultural Resistance : सध्या उत्तरेतून एक कृत्रिम घडवलेला धर्म ‘सनातन,’ ‘अपौरुषेय’ वगैरे म्हणून आमच्याकडे पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे. या धर्मात वर्चस्ववाद आहे.
Maharashtra
Maharashtra Agrowon
Published on
Updated on

Maharashtra Cultural Politics : सध्या उत्तरेतून एक कृत्रिम घडवलेला धर्म ‘सनातन,’ ‘अपौरुषेय’ वगैरे म्हणून आमच्याकडे पसरवण्याचा प्रयत्न होतो आहे. या धर्मात वर्चस्ववाद आहे. राम भद्राचार्य, बागेश्‍वर धाम बाबा उघड उघड जातीयवादाचा पुरस्कार करतात. देवबंदी कडवा इस्लामसुद्धा जुनाट परंपरावादी, वर्चस्ववादी आहे. दोन्ही ‘धर्मांत’ पुरोहित वर्गाचे वर्चस्व आहे आणि म्हणून हा वर्ग या धर्माचे स्वागत करतो आहे.

खरे तर आमची भक्ती परंपरा पुरोहितशाही नाकारते. पण आमच्या इतिहासाला जातीय, धार्मिक वळण देऊन ‘सनातन’ धर्म इथल्या बहुजनांच्या गळी उतरवल्या जात आहे. त्यासाठी आम्हाला प्राणप्रिय असलेल्या शिवाजी महाराजांचा सुद्धा वापर करून घ्यायला ही मंडळी कचरत नाहीत. रयतेचा राजा असलेल्या महाराजांना धर्मरक्षक, गोब्राह्मण प्रतिपालक वगैरे सांगून हा सनातनी अजेंडा लोकांच्या गळी उतरवला जात आहे.

आपल्या धार्मिक मूल्यांत आणि उत्तर भारतातील धर्मात फरक समजून घ्यायचा असेल तर वारीत लोक कसे वागतात आणि कावड यात्रेत काय होते याची तुलना करा. रस्त्यातील हॉटेल लुटणे, पैसे न देणे, दादागिरी करणे, अमली पदार्थांचा धुमाकूळ हे प्रकार आता कावड यात्रेत दुर्दैवाने खूप आहेत. याला सनातन म्हणायचे का? हे आपल्याला हवे आहे का?

आम्ही ‘जय जगत’वाले आहोत. जगातील सर्व चराचराचे कल्याण होवो, अशी आमची भावना आणि कामना. आम्ही कमी कुणालाच लेखत नाही; पण आमचे म्हणून जे चांगले, उत्तम आहे, ते आम्ही जपणार. त्यावर कोणी घाला घालणार असेल तर ते चालणार नाही. त्यासाठी आवश्यक ते ‘महाराष्ट्रकारणा’चे राजकारण करणार.

Maharashtra
Maharashtra Economy : मराठीकारणाचा आर्थिक पाया मजबूत हवा

आमचा महाराष्ट्र धर्म आहे. तो आदिवासी जमाती, भटके, विमुक्त, अलुतेदार, बलुतेदार, शेतकरी, पुरोहित, व्यापारी, इथे पिढ्यान् पिढ्या राहत असलेले सगळे लोक समूह, इथले विविध धर्म या सगळ्या समुच्चयाचे हित साधणारा धर्म आहे. तो या सगळ्या वैविध्याचा आदर राखतो. सपाटीकरणाला विरोध करतो. इथली जगण्याची संसाधने मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्यास विरोध करतो. इथल्या संसाधनांचे इथल्या लोकांसाठी समन्यायी पद्धतीने वापर करण्याचा पुरस्कार करतो. हा शिवधर्म सुद्धा आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात होतो. रोज पांढरा रस्सा, तांबडा रस्सा चापत होतो. कोल्हापुरी चप्पला बनविणाऱ्या कारागिरांबरोबर काम करत होतो. उत्तरेचे सांस्कृतिक राजकारण थांबवले नाही तर हे काहीच उरणार नाही. कोल्हापुरात पालक पनीर खायला लागेल. नकोय

आपल्याला ते. उत्तरेच्या सांस्कृतिक आक्रमणाचा विरोध केलाच पाहिजे. उत्तरेतील सांस्कृतिक प्रतीके ठामपणे नाकारणारे ‘महाराष्ट्रकारण’ उभे केले पाहिजे.

Maharashtra
Kolhapuri Chappal GI Tag : कोल्हापुरी चपलांचे पाऊल अडते कुठे?

अस्मितेचे राजकारण ः

अस्मितेचे राजकारण वाईटच असते असे नाही. साठच्या दशकात तमिळनाडूमध्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त दारिद्र्य होते. पण तिथल्या राजकीय नेतृत्वाने मध्यम व तळाच्या जात समूहांची आणि मध्यम व गरीब वर्गांची द्रविडियन-तमीळ अस्मितेचे सिमेंट जोडून पक्की मोट बांधली. यातून एक तमीळ एकतेची भावना निर्माण झाली.

आणि या समूहांना विकासासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण-आरोग्य आदी सुविधा पुरविण्याबाबत अधिक संवेदनशील असलेली शासन व्यवस्था तयार झाली. आज दरडोई उत्पन्नातच नव्हे तर दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण, आरोग्य या सर्वांत तमिळनाडू आपल्या पुढे आहे.

अर्थकारणाचा राजकीय पाया असतो. अधिक समावेशक अर्थकारण करायचे असेल तर राजकीय पाया सुद्धा अधिक समावेशक हवा. आजचा महाराष्ट्र या बाबतीत ‘एकीकडे आग दुसरीकडे फुफाटा’ असा चालला आहे. एकीकडे विविध जातींचा स्पर्धात्मक अस्मितावाद व्यापक समावेशक अस्मिता निर्माण होऊ देत नाही. दुसरीकडे उत्तरेकडून येऊ पाहणारी सांस्कृतिक लाट एक वर्ण वर्चस्ववादी, पितृ सत्तेवर आधारलेली सपाट संस्कृती रेटते आहे.

सत्ताधारी भाजपच्या मातृसत्तेला महाराष्ट्रात हे सांस्कृतिक परिवर्तन घडवून महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तरेसारखे करणे अत्यावश्यक वाटते आहे. ही दोन्ही टोके आपल्यासाठी धोकादायक आहेत. महाराष्ट्रातील विविध लोकसमूहांना सामावून घेऊन, सगळ्यांना बांधून घेणारी मराठी अस्मिता ठामपणे पुढे आणायला हवी. यासाठी विचारी सांस्कृतिक राजकारणाची गरज आहे. एकीकडे उत्तरेकडून येणाऱ्या सपाटीकरणाला ठाम विरोध करायचा आणि दुसरीकडे जातींच्या सुट्या सुट्या अस्मितांच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र, समावेशक अशी महाराष्ट्रीय अस्मिता निर्माण करायची. हे जेवढ्या लवकर करू तितके आपण सुरक्षित राहू.

आर्थिक पाया ः

आज महाराष्ट्राच्या अर्थकारणाची स्थिती काय आहे? अर्थव्यवस्थेचे सक्षम भाग आणि तेथील व्यवसाय आणि राज्य शासनाच्या आर्थिक धोरणाने ज्यांना थेट फायदा मिळतो ती क्षेत्रे अमराठी लोकांच्या हातात आहेत. उदा. संघटित बांधकाम, व्यापार. या उलट मागास, गरीब भागांशी मराठी जनांची नाळ जास्त जोडलेली आहे. उदा. असंघटित क्षेत्र, कोरडवाहू शेती. याचाच अर्थ सक्षमांना अधिक सक्षम करताना अर्थव्यवस्थेच्या नाड्यासुद्धा मराठी माणसाच्या हातून सुटून जात आहेत.

म्हणून हे धोरण बदलले पाहिजे. दुर्बलांना सक्षम करणे सुद्धा महत्त्वाचे आहे, हे राज्य सरकारच्या नजरेत भरवले पाहिजे. हे त्यांना स्वतःला उमगण्याची शक्यता कमी आहे. लहान शेतकरी, असंघटित उद्योग, सार्वजनिक वाहतूक सोई, गावातील पायाभूत सुविधा, सार्वजनिक शिक्षण आणि आरोग्य सेवा यांचे सक्षमीकरण झाले पाहिजे, याचा आग्रह धरायला हवा. मराठीकारणाचा हा आर्थिक पाया आहे. पाया कच्चा असला तर इमला ढासळतो.

आपल्याला जो महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे तो गडचिरोली ते सिंधुदुर्ग, नंदुरबार ते कोल्हापूर असा उभा-आडवा पसरलेला आहे. त्यात ४७ वेगवेगळे आदिवासी समूह आहेत. अनेक भटके समाज आहेत. विमुक्त आहेत. कृषक समाज आहेत. नागरी समाज आहेत. विविध धर्मीय आहेत. परराज्यातून महाराष्ट्रात पिढ्यान् पिढ्या स्थायिक झालेले समूह आहेत. हे सगळे एकच एक भाषा बोलत नाहीत, एकच धर्म पाळत नाहीत. त्यांच्या सामाजिक धारणा, सांस्कृतिक धारणा वेगवेगळ्या आहेत.

‘मराठीकारणा’ला या सगळ्या लोकसमूहांना सामावून घेऊन पुढील वाटचाल करावी लागेल. मराठीकारण जोडणारे आहे, तोडणारे नाही. म्हणून मराठीकारण म्हणजे फक्त मराठी भाषेचा आग्रह एवढाच संकुचित अर्थ असूच शकत नाही. ‘मराठीकारणा’चा अर्थ या विविध लोकसमूहांतील वैविध्याचा, फरकांचा, अस्मितांचा पुरेसा सन्मान राखून या समुच्चयाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विकास लोकांच्या विस्तृत सहभागातून साधणे हा आहे.

स्वतंत्र सांस्कृतिक राजकारण ः

महाराष्ट्रातील भाजपची दोन प्रमुख धोरणे आहेत. एक तर मातृसंस्थेचा सांस्कृतिक सपाटीकरणाचा अजेंडा राबवायचा आणि दुसरे म्हणजे विकासाच्या नावाखाली ज्यांच्याकडे आधीच भांडवल आहे, शक्ती आहे, त्यांना अधिक सक्षम करायचे. यातून ताकदवान, सांस्कृतिक अधिसत्ता हातात असलेली मतपेढी (व्होट बँक) बांधायची. पण यात महाराष्ट्राचे नुकसान होते आहे. समाजाचा मोठा भाग दुर्बलच राहतो आहे.

त्याची भौतिक संसाधने, सांस्कृतिक संसाधने त्याच्या हातातून सुटून जात आहेत. ‘अपवर्ड मोबिलिटी’ जवळ जवळ नसलेला हा समाज याच धोरणातून तयार होतो. म्हणून मग मराठे आरक्षण मागतात, एमपीएससी ग्रस्त तरुणांच्या फौजा तयार होतात, शेतकरी आत्महत्या करतात आणि लाडकी बहीण योजना इतकी लोकप्रिय होते.

हे सगळे बदलायला हवे. त्यासाठी महाराष्ट्राचे स्वतंत्र सांस्कृतिक राजकारण करावे लागेल. आपली भूमी त्याला पोषक आहे. तुकोबा ते गाडगे बाबा, ज्ञानेश्‍वर आणि शिवाजी महाराजांच्या भूमीत हे सहज शक्य आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com