Maharashtra Politics : दुपारचा शपथविधी!

NCP, BJP, Shivsena Party Update : शिवसेनेत वर्षभरापूर्वी मोठी फूट पाडल्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्यात भाजपनेत्यांना यश मिळालेले दिसते. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर इतकी अनागोंदी तसेच बेदिली कधीही माजली नव्हती. राजकारणाचे ‘दरबारीकरण’ या थराला गेले नव्हते.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon
Published on
Updated on

Ajit Pawar : साडेतीन वर्षांपूर्वी ‘पहाटेच्या शपथविधी’ सोहळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार यांना जे राजकारण जमवता आले नव्हते, ते अखेर त्यांनी ‘करून दाखवलं’ आहे! अजित पवार यांनी भल्या पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्याबरोबर गेलेले आमदार परत आणून शरद पवार यांनी बाजी उलटवली होती.

मात्र, रविवारी दुपारी त्यांनी परत एकदा उपमुख्यमंत्रिपदाचीच शपथ घेतली ती छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आदी बडे नेते आणि काही आमदारांना सोबत घेऊनच.

एका अर्थाने ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभी फूट आहे आणि शिवसेनेत वर्षभरापूर्वी अशाच तऱ्हेने मोठी फूट पाडण्यात यश मिळवणारे देवेंद्र फडणवीस यांच्या हिकमती राजकारणाची ही फलनिष्पत्ती आहे.

शिवसेना तसेच भारतीय जनता पक्ष यांची युती, ही ‘युती’च्या रौप्यमहोत्सवी वर्षांतच तुटली होती. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केल्यानंतर लगेचच पक्षात ही मोठी फूट पडली आहे. मात्र, त्यामुळे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात आणखी एक उपमुख्यमंत्री तसेच आठ मंत्र्यांचा समावेश झाला आहे.

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून साडेतीन वर्षांतील हा तिसरा शपथविधी. फडणवीस यांच्यासमवेत पहाटेचा शपथविधी पार पाडल्यानंतर दुसरी शपथ त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समवेत सायंकाळी घेतली होती. तर या दुपारच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राचे अवघे राजकीय नेपथ्यच पुनश्च एकवार आरपार बदलून गेले आहे.

चारच दिवसांपूर्वी ‘शरद पवार यांच्या गुगलीवर क्लीन बोल्ड झाले ते अजित पवारच,’ असा निर्णय पंचांच्या भूमिकेत जाऊन देणाऱ्या फडणवीस यांनीच अखेर अजित पवार यांना पुनश्च सत्तेच्या खेळपट्टीवर आणून उभे करण्यात यश मिळवले आहे.

Maharashtra Politics
Ajit Pawar Live : आम्ही फुटलो नाही, संपूर्ण राष्ट्रवादी पक्षच सरकारमध्ये सहभागीः अजित पवार

त्यामुळे आता ‘पहाटेच्या शपथविधी’चा खेळखंडोबा झाल्यानंतर, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या उद्देशातून स्थापन झालेल्या ‘महाविकास आघाडी’चे नेमके भवितव्य काय, असाही प्रश्न उभा ठाकला आहे. अर्थात, अजित पवार हे कधीही काही एक विशिष्ट विचारधारा वा तत्त्वप्रणाली यांच्या आधारे राजकारण नेते नव्हतेच.

सत्तेच्या जवळ राहून जनतेच्या हिताची तसेच विकासाची कामे करण्यात त्यांना असलेला रस हा सर्वज्ञात आहे. त्यामुळेच अखेर त्यांनी एकनाथ शिंदे या राज्याच्या राजकारणात त्यांच्यापेक्षा ‘ज्युनिअर’ असलेल्या नेत्याच्या हाताखालील उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयास गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या अनेक वादळी घटनांची पार्श्वभूमी आहे.

शरद पवार यांच्या राजीनामानाट्यानंतर सुप्रिया सुळे तसेच प्रफुल्ल पटेल यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर काही दिवसांतच अजित पवार यांनी पक्षाच्या रौप्यमहोत्सवी वर्षसोहळ्याच्या कार्यक्रमातच ‘बस्स झाले विरोधीपक्ष नेतेपद!’ असे उद्‍गार काढून प्रदेशाध्यक्षपदावर आपला डोळा असल्याचे दाखवून दिले होते.

मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाकरी फिरवण्याचे टाळल्यानंतर आता अजित पवार यांनी हे धाडसी पाऊल उचलले आहे आणि त्यामुळे आगामी निवडणुकांचे सारे हिशोब आणि ताळेबंदही बदलून गेले आहेत.

अजित पवार यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगळता, बाकी पक्षाच्या बहुतेक बड्या नेत्यांना भाजपच्या गोटात नेण्यात यश मिळवल्याने खऱ्या अर्थाने बळ वाढले आहे ते भाजपचेच! आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून ४०-४५ जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ भाजपच्या नेत्यांनी ठरवले आहे.

केवळ एकनाथ शिंदे यांच्या ‘शिवसेने’ला सोबत घेऊन भाजपला हे लक्ष्य गाठणे कठीण असल्याचे विविध पाहणी अहवाल सांगत असल्यामुळे फडणवीस आणखी एखाद्या बलदंड मित्राच्या शोधात होते. मात्र, हा शोध पूर्ण करताना त्यांनी आपल्या विरोधातील उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ ‘राष्ट्रवादी’चेही कंबरडे मोडले आहे.

त्यामुळे सहा महिन्यांत होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रणनीतीच भाजपच्या या हिकमती राजकारणामागे आहे, हेही स्पष्ट झाले आहे. विरोधी पक्षांच्या देशपातळीवरील ऐक्याच्या प्रक्रियेस वेग येत असताना, फडणवीस यांनी पार पाडलेली ही कामगिरी भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींसाठी भलतीच आनंददायी ठरली असणार आणि त्याची उचित ‘बक्षिसी’ फडणवीस यांना नजिकच्या भविष्यात मिळाली, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

Maharashtra Politics
Ajit Pawar News : आता डबल इंजिन नाही ट्रिपल इंजिन सरकार; आता बुलेट ट्रेनच्या वेगाने सरकार धावेल

मात्र, अजित पवारांबरोबर गेलेल्या सहकाऱ्यांच्या यादीवर एक नजर टाकली तर त्यातील बरेच जण हे ‘ईडी’च्या सावटाखाली वावरत होते, हे दिसून येते. त्यामुळे त्यांच्या या ‘बंडा’चे रहस्यही स्पष्ट होते. शरद पवार यांनी स्वत:च याचा उल्लेख केला आहे; तसेच भुजबळ यांनी याची कल्पना आपणास दिली होती, हेही सांगून टाकले आहे.

अर्थात, आता शिवसेनेतील बंड वा उठाव यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयाची दारे ठोठावली होती. तोच मार्ग राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व अनुसरणार काय हे बघावे लागणार आहे. पक्षाचे नाव तसेच निवडणूक चिन्ह याबाबतही आता वादंग माजू शकतो. पण कायदेशीर तसेच तांत्रिक बाबींपेक्षा लोकांमध्ये जाऊनच लढाई लढणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

या बंडामागे ‘राष्ट्रवादी’च्या दुसऱ्या फळीतील नेतृत्वाचे व्यवस्थापन करण्यात आलेले त्यांचे अपयशही कारणीभूत आहे, असे म्हणता येईल. आजवर पवार यांनी अनेक बंडे पचवली आहेत;परंतु घरातूनच झालेले बंड ते कसे हाताळतात, हे पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

अर्थात, अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या नेत्यांवर आज भाजप घणाघाती आरोप भाजप करत होता, तेच आता फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसणार आहेत. सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना हे पचणे अवघड आहे.

मुख्यमंत्री शिंदे सातत्याने आपले सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जाणारे सरकार आहे, असे सांगत आले आहेत. अजित पवार आणि भुजबळ यांना हे पसंत आहे काय? भुजबळ यांची राजकीय मते सर्वांना माहिती आहेत. ते आता या ‘हिंदुत्ववादी सरकार’शी कसे जुळवून घेणार आणि आपल्या याआधी घेतलेल्या विविध जाहीर भूमिकांच्या बाबतीत आता काय पवित्रा घेणार हा प्रश्न आहेच.

त्यांच्याशी मतभेद असलेला भाजपही आता आपल्या पूर्वीच्या भूमिकेला मुरड घालणार का, हे विचारावे लागेल. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतीलही. मात्र, रविवारच्या या वेगवान राजकीय हालचालींमुळे एक बाब स्पष्ट झाली आहे आणि ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर इतकी अनागोंदी तसेच बेदिली कधीही माजली नव्हती. राजकारणाचे ‘दरबारीकरण’ या थराला गेले नव्हते. त्यामुळेच ‘अरे! कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?’ असाच प्रश्न आज राज्यातील जनता या सर्वपक्षीय नेत्यांना विचारत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com