

Choundi Cabinet Meeting : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी ६८१ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी (ता.६) मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त चौंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली.
या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी आडाखे बांधण्यात येत होते. परंतु राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीबद्दल निर्णय घेतला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. "अष्टविनायक मंदिरासाठी १४७ कोटी रुपये, तुळजापूर मंदिरासाठी १६५ कोटी रुपये, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर विकास आराखड्यासाठी २७५ कोटी रुपये, विदर्भातील माहूरगड विकास आराखड्यासाठी ८२९ कोटी रुपये, असे एकूण ५ हजार ५२० कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे." अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली.
मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त
१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार
- महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार
- व्यवसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करुन देणार
२) राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार/आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार
- राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार
- कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाजनिर्मिती, अनिष्ठ रुढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास
- हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणार्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार
- हे अभियान राबविण्यासाठी १०.५० कोटी रुपये खर्च करणार
३) धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव.
‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविणार
- दरवर्षी १० हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण
- आतापर्यंत यासाठी २८८.९२ कोटी रुपये वितरित
- राजे यशवंतराव होळकर यांनी १७९७ ते १८११ या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे ही योजना
४) धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव
- राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह
- प्रत्येकी २०० क्षमतेची ही वसतीगृह असणार. यात मुलांसाठी १०० क्षमतेचे तर, मुलींसाठी १०० क्षमतेचे.
- नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह
- नाशिक येथे काम सुरु, पुणे , नागपूर येथे लवकरच सुरु होणार
- या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव
५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार
- राज्यात असे ३ ऐतिहासिक तलाव (चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी)
- राज्यात अशा १९ विहिरी
- राज्यात असे एकूण ६ घाट
- राज्यात असे एकूण ६ कुंड
- अशा एकूण ३४ जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभिकरण इत्यादी कामे करणार
- यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करणार
६) अहिल्यानगर जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार
- या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल.
- यासाठी ४८५.८० कोटी खर्च करणार
- जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा, मनुष्यबळासह यासाठी देणार
७) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून ५ हजार ५०३ कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे
- चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : ६८१.३२ कोटी
- अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार: १४७.८१ कोटी
- श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा : १८६५ कोटी
- श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा : २५९.५९ कोटी
- श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा: २७५ कोटी
- श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा : १४४५.९७ कोटी
- श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा : ८२९ कोटी
- ८) अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरु करणार
- ९) राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय
- १०) ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी २०२२-२५ ऐवजी २०२८ पर्यंत वाढविण्याचा निर्णय
- ११) नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-२०२५ जारी करण्याचा निर्णय
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.