
Akola News : केंद्र शासनाच्या ‘साथी’ प्रणालीशी जोडलेल्या क्यूआर कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्याचा पुरवठा करण्यासाठी महाबीजने आघाडी घेतली आहे. आगामी खरीप हंगामात महाबीजचे सर्व बियाणे ‘साथी’ पोर्टलवर नोंदणीकृत असणार असून, प्रत्येक बॅगेवर क्यूआर कोड राहील.
हा कोड स्कॅन केल्यावर शेतकऱ्यांना त्या बियाण्याची उत्पत्ती, प्रक्रिया केंद्र, लॅब चाचणी अहवाल आदी माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांना १०० टक्के शुद्ध बियाण्याची खात्री मिळणार आहे. गेले काही दिवस सतत पाऊस होत असल्याने खरिपाचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच मॉन्सूनने महाराष्ट्रात धडक दिली आहे.
त्यामुळे बाजारपेठेत बियाणे पुरवठ्याचे काम जोमाने सुरू आहे. काही वाणांच्या बियाण्याची अतिरिक्त मागणी झाल्यास ती पूर्ण करण्यासाठी महाबीज यंत्रणा सक्रिय झालेली आहे. हंगामासाठी ‘महाबीज’ने अडीच लाख क्विंटल बियाणे पुरवठ्याची तयारी केली.
यापैकी ७१ हजार क्विंटल बियाण्याची मात्रा ही विद्यापीठांद्वारे नव्याने संशोधित केलेल्या वाणांची राहणार आहे. या शिवाय महाबीज हे केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांमध्येही बियाणे पुरवठा करणार आहे. राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध पिकातील नवीन वाणांचे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून दिले जात आहे.
यात तूर १३० रुपये प्रति किलो, मूग १४० रुपये, उडीद १३५ रुपये, धान वाणांनुसार ३० ते ४० रुपये प्रतिकिलो, संकरित बाजरा १५० रुपये प्रतिकिलो, सुधारित बाजरा ७० रुपये, नाचणी १०० रुपये किलो या अनुदानित दरात उपलब्ध राहील. सोयाबीनच्या वाणांचे बियाणे १०० टक्के अनुदानावर दिले जाईल. सुवर्णा सोया, फुले दुर्वा, पीडीकेव्ही अंबा, एनआरसी १३०, फुले किमया, MACS-१४६०, MACS ७२५ या वाणांचे बियाणे दिले जाईल. महाबीजने २८ एप्रिल २०२५ ला सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे.
‘महाबीज’चे बियाणे
साठा (क्विंटलमध्ये)
सोयाबीन : २ लाख क्विंटल, १८ वाण
धान : ३९००० क्विंटल, २३ वाण
तूर : ९१०० क्विंटल, ८ वाण
उडीद : ७००० क्विंटल, ५ वाण
मूग : १२०० क्विंटल, ५ वाण
ज्वारी (संकरित) : ११०० क्विंटल
मका (संकरित) : ५०० क्विंटल
नाचणी : ३९० क्विंटल
सूर्यफूल (संकरित) : ५० क्विंटल
बाजरी (संकरित) : ५० क्विंटल
वरई : १० क्विंटल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.