डॉ. सचिन दडस, डॉ. सचिन टेकाडेIndigenous Sheep: माडग्याळ मेंढ्या उंच, मजबूत बांध्याच्या, काटक, माळरानावर फिरून चराई करणाऱ्या, स्थलांतरासाठी व अर्धबंदिस्त मेंढीपालनास उपयुक्त आहेत. उष्ण व समशीतोष्ण हवामानामध्ये तसेच प्रतिकूल हवामानामध्ये तग धरून उच्च उत्पादन देण्याची क्षमता आहे. माडग्याळ मेंढ्यांची कोकरे ही इतर जातीच्या मेंढ्याच्या कोकरांच्या तुलनेत सशक्त व निरोगी असतात..राष्ट्रीय पशू अनुवांशिक संसाधन ब्युरो (कर्नाल, हरियाना) या संस्थेतील तज्ज्ज्ञांनी महाराष्ट्रातील मेंढ्यांच्या जातींचा अभ्यास करून दख्खनी जातीच्या लोणंद दख्खनी, सोलापूर/सांगोला दख्खनी, कोल्हापूर दख्खनी, माडग्याळ आणि संगमनेरी अशा पाच उपजाती आहेत असे स्पष्ट केले होते. या पाच उपजातींपैकी माडग्याळ ही जात तिच्या गुणवैशिष्ठ्यांमुळे मेंढपाळांमध्ये मोठ्या प्रमाणत स्वीकारली गेली असून, ती स्थानिक मेंढ्याच्या संकराकरिता वापरण्यात येत आहे. त्यामुळे माडग्याळ मेंढीला राज्यभर व शेजारील राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. .Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण.७ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय पशू अनुवांशिक संसाधन ब्युरो, कर्नाल (हरियाना) येथे पार पडलेल्या जात नोंदणी समितीच्या १४ व्या बैठकीत माडग्याळ मेंढीला स्वतंत्र देशी मेंढी म्हणून नोंदणीला मान्यता देण्यात आली. माडग्याळ मेंढीचे मूळ क्षेत्र हे महाराष्ट्र व कर्नाटक राज्य घोषित केले असून तिला INDIA_SHEEP_११०८_MADGYAL_१४०४९ असा अधिकृत नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे. निवड पद्धतीचा अवलंब करून मागील तीन दशकांच्या प्रयत्नातून ही जात मेंढपाळांच्या दारात विकसित झाली. ही मेंढी मांस उत्पादनाकरिता अग्रेसर आहे..गुणवैशिष्ट्ये मूळस्थान व व्याप्तीमहाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत, कावाठेमहांकळ, आटपाडी तालुका, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा तालुका, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण तालुका, पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या मेंढ्या आढळतात. कर्नाटक राज्यात विजापूर, बागलकोट, अथणी, इंडी या भागात माडग्याळ मेंढ्या आढळतात..रंगशरीरावर पांढऱ्या मूळ रंगावर काळे किंवा तपकिरी रंगाचे लहान मोठ्या आकाराचे ठिपके किंवा पट्टे असतात. कानावर खालच्या बाजूला काळ्या किंवा तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात. डोळ्याभोवती काळ्या किंवा तपकिरी रंगाची वर्तुळे असतात. जर मेंढीला पांढऱ्या रंगावर काळ्या रंगांचे ठिपके किंवा पट्टे असतील तर अशा मेंढ्यांना ‘डफळ्या मेंढ्या’ म्हणून संबोधले जाते..डोकेडोके हे बहिर्वक्र असून नर आणि मादी यांना शिंगे नसतात. डोळे पाणीदार असून बुब्बुळ काळ्या रंगाचे असते..नाकनाकाच्या आकारामुळे या मेंढीच्या सौंदर्यात भर पडते. नाक हे रोमन प्रकारचे म्हणजेच पोपटाच्या/ गरुडाच्या चोचीप्रमाणे किंवा विळ्याप्रमाणे वक्र असते. बाजारामध्ये मेंढीची किंमत ही नाकाच्या वक्रतेनुसार ठरते. जेवढे नाक जास्त वक्र तेवढी त्या मेंढीची किंमत जास्त असते..कानकान हे पांढऱ्या रंगाचे असून त्यावर खालच्या बाजूला काळ्या किंवा तपकिरी रंगाचे चट्टे असतात. कान मध्यम आकाराचे व जमिनीच्या दिशेने लोंबलेले असतात. प्रौढ नराच्या व मादीच्या कानाची लांबी १८ ते २५ सें.मी. असते. .कासकास ही आकाराने गोलाकार असून, सड २.५ ते ३.५ सें.मी. लांबीचे असतात.शेपटीशेपटी आखूड, सडपातळ असून ती कासेकडील बाजूस वळलेली असते. नराची शेपटी ही मादीच्या शेपटीपेक्षा किंचितशी लांब असते. शेपटीचा रंग हा पूर्ण पांढरा/ काळा/तपकिरी असतो. काही मेंढ्यामध्ये शेपटीचा रंग पांढरा-काळा/पांढरा-तपकिरी असा मिश्र असतो. प्रौढ नराच्या शेपटीची लांबी १५ ते ३१ सें.मी. व प्रौढ मादीच्या शेपटीची लांबी १२ ते १८ सें.मी. असते..Livestock Biodiversity Conservation: महाराष्ट्रातील पशुधनाचे जैवविविधता संवर्धन.शारीरिक रचनामेंढ्या उंच, मजबूत बांध्याच्या, काटक, माळरानावर फिरून चराई करणाऱ्या, स्थलांतरासाठी व अर्धबंदिस्त मेंढीपालनास उपयुक्त, उष्ण व समशीतोष्ण हवामानामध्ये तसेच प्रतिकूल हवामानामध्ये तग धरून उच्च उत्पन्न देण्याची क्षमता आहेत. प्रौढ नर व मादीचे सरासरी वजन अनुक्रमे ५७ किलो आणि ५० किलो असते. प्रौढ नर व मादीची सरासरी लांबी ही अनुक्रमे ८७ सेंमी. व ८२ सेंमी असते. प्रौढ नर व मादीची उंची अनुक्रमे ८८ व ८३ सेंमी असून, छातीचा घेर अनुक्रमे ९२ व ८८ सेंमी असते..पुनरुत्पादनया मेंढ्यामध्ये उत्तम प्रकारची मातृत्व क्षमता असून, कोकरांना संगोपन करण्याची क्षमता इतर जातींपेक्षाअति उत्तम आहे. या मेंढ्या २१० ते ३३० दिवस या वयात प्रथम माजावर येतात. २८० ते ३३० दिवस यावयात प्रथम रेतन केल्या जातात. वयाच्या ३९० ते ५१० दिवसांत प्रथम वितात. या मेंढ्याच्या दोन माजांमधीलअंतर १७ ते २२ दिवस, दोन वेतांमधील अंतर २१० ते २७० दिवस व विल्यानंतर पुन्हा गाभ जाण्याचा कालावधी ६० ते ११० दिवस आहे. या मेंढ्याची जनन टक्केवारी ८५ ते १५० टक्के आणि जुळी पिले देण्याचे प्रमाण १ ते २ टक्के इतके आहे..दूध उत्पादनमेंढ्या विल्यानंतर ९० ते १५० दिवस दूध देतात. या मेंढ्यांचे सरासरी प्रति दिन प्रति मेंढी दूध उत्पादन ४०० ते १२०० ग्रॅम इतके असते. एका वेतातील दूध उत्पादन प्रति मेंढी ४८ ते १५० किलो असते..सशक्त निरोगी कोकरेमाडग्याळ मेंढ्यांची कोकरे ही इतर जातीच्या मेंढ्याच्या कोकरांच्या तुलनेत सशक्त व निरोगी असतात. कोकारांमध्ये नर कोकाराचे जन्मतः वजन ३ ते ५ किलो, तर मादी कोकराचे वजन २.५ ते ४.५ किलो असते. तीन महिन्यांच्या नर कोकराचे वजन १९ ते ३२ किलो व मादी कोकराचे वजन १६ ते ३० किलो होते. सहा महिन्यांच्या नर कोकराचे वजन ३० ते ४९ किलो, तर मादी कोकराचे वजन २० ते ४८ किलो आणि एक वर्ष वयोगटातील नराचे वजन ४४ ते ६० किलो ते मादीचे वजन ३० ते ५१ किलो होतो. या जातीपासून उत्पादित होणाऱ्या कोकरांचा वजन वाढीचा दर इतर जातीच्या कोकरांपेक्षा जास्त आहे त्यामुळे कोकरे जन्मापासून ७५ ते १५० दिवसांत विक्रीस येतात. विक्रीच्या वेळेस त्यांचे वजन १९ ते ३८ किलो होते. मांसाचा उतारा ५४ ते ६० टक्के इतका आहे..लोकर उत्पादनमाडग्याळ मेंढी ही मांस उत्पादनामध्ये अग्रेसर असून, तिच्यापासून लोकर उत्पादन खूप कमी प्रमाणात उपलब्ध होते. लोकरीची प्रत जाडी भरडी असून, तिच्या धाग्याची लांबी २८ ते ४५ मिमी इतकी असून, धाग्याचाव्यास हा ३७ मायक्रोन असतो. सहा महिन्याच्या वयात प्रथम लोकर कातरणी करण्यात येते. त्यानंतर प्रत्येक सहा महिन्यांनी लोकर कातरणी करावी लागते. एकामाडग्याळ मेंढीपासून प्रति कातरणी ३०० ते ४०० ग्रॅम लोकर मिळते. उत्पादित लोकरीपासून जेन आणि उषा बनविण्यात येतात..संशोधन प्रक्षेत्रपुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाअंतर्गत असलेले प्रक्षेत्र रांजणी (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली), प्रक्षेत्र महूद (ता. सांगोला, जि. सोलापूर) व प्रक्षेत्र दहिवडी (ता. माण, जि. सातारा) येथे शुद्ध, जातिवंत माडग्याळ जातीच्या मेंढ्याचे पैदास, जतन, संगोपन व संवर्धन करण्याचे काम चालू आहे. त्याचबरोबर माडग्याळ मेंढ्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी राजमाता माडग्याळ मेंढी पैदासकार संघटना, अंकले (ता. जत, जि. सांगली) येथे कार्यरत आहे. महामंडळाच्या प्रक्षेत्रांवरून तसेच माडग्याळ मेंढी पैदासकार संघटनेमार्फत शुद्ध, जातिवंत माडग्याळ मेंढ्यांची विक्री करण्यात यते.- डॉ. सचिन दडस, प्रक्षेत्र व्यवस्थापक,८३२९३९८३६९- डॉ. सचिन टेकाडे, सहायक संचालक,८८८८८९०२७०(पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र, रांजणी, जि. सांगली).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.