Automation Mechanism : पाणी, खते देण्यासाठी कमी खर्चात तयार केली ‘ऑटोमेशन’ यंत्रणा

पाणी व खतांचा वापर काटेकोर होण्यासह त्यांची कार्यक्षमता वाढून उत्पादन खर्च व श्रम याच बचत होऊन उसाची एकरी उत्पादकता वाढू लागल्याची निरीक्षणे ताकवणे यांनी नोंदवली आहेत.अलीकडील काळात शेतीसाठीच्या पाण्याची प्रत अनेक ठिकाणी बिघडल्याचे दिसून येते.
Automation Mechanism
Automation MechanismAgrowon

Automation’ Mechanism : पुणे जिल्ह्यात पारगाव (ता. दौंड) येथील राजेंद्र ताकवणे यांनी ऊसशेतीला काटेकोरपणे पाणी व विद्राव्य खते (Fertilizer) देणारे कमी खर्चातील ‘इरिगेशन ऑटोमेशन युनिट’ स्वकौशल्यातून विकसित केले आहे. सुमारे दीड लाख रुपये खर्च त्यासाठी आल्याचा त्यांचा दावा आहे.

पाणी व खतांचा वापर काटेकोर होण्यासह त्यांची कार्यक्षमता वाढून उत्पादन खर्च व श्रम याच बचत होऊन उसाची एकरी उत्पादकता (Sugarcane Production) वाढू लागल्याची निरीक्षणे ताकवणे यांनी नोंदवली आहेत.अलीकडील काळात शेतीसाठीच्या पाण्याची प्रत अनेक ठिकाणी बिघडल्याचे दिसून येते.

पाण्याचा सामू वा क्षारता जास्त झाल्याने तसेच खतांचा अनियंत्रित वापर झाल्याने जमिनी क्षारपड झाल्या आहेत. चिबड रानांमुळे जमिनीची व पिकांची उत्पादकता घटू लागली आहे.

पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील पारगाव येथील राजेंद्र ताकवणे यांच्याकडेही ही समस्या आहे. त्यांचा भाग म्हणजे ऊसशेतीचा पट्टा असून काहीसे क्षारयुक्त पाणी आहे.

वडिलोपार्जित पाच एकरांत ते पूर्वी ऊस, कांदा, टोमॅटो, कलिंगड अशी विविध पिके घ्यायचे. पूर्वी पाण्याच्या फारशा अडचणी येत नव्हत्या.

जमीन चांगली असल्याने पिकांना पाटपाण्याने मुबलक पाणी दिले जायचे. उत्पादनही एकरी ९० टनांच्या आसपास असायचे. परंतु समस्या वाढत गेल्या तसे उत्पादनावर परिणाम जाणवू लागले.

खतांचा अनियंत्रित वापरामुळे होणाऱ्या खर्चातही भरमसाट वाढ होत गेली. उसाचे एकरी उत्पादन ४० टनांपर्यंतच मिळू लागले. क्षारयुक्त पाण्यामुळे पिकांची वाढ खुंटून शेंडे करपायचे.

Automation Mechanism
Fertilizer Linking : आजपासून साताऱ्यातील खत विक्रेत्यांचा बंद

उपाय शोधण्याचा प्रयत्न

या समस्यांमधून बाहेर येण्याचे राजेंद्र यांचे प्रयत्न सुरू होते. त्यांनी पिकांना पाणी कमी देण्याचा निर्णय घेतला. ठिबक सिंचनाचा अवलंब सुरू केला. दरम्यान इंटरनेट व कृषी प्रदर्शनातून पाणी व खते स्वयंचलित पद्धतीने देणारे तंत्रज्ञान पाहण्यात आले.

शेती सांभाळण्याबरोबरच राजेंद्र काही वर्षांपासून ‘केबल नेटवर्क व इंटरनेट’ या क्षेत्रात ‘वायरिंग’चे काम करतात. त्या निमित्ताने अनेकांशी त्यांचा संपर्क आला होता. एकूण परिस्थिती पाहून व प्रेरणा घेऊन आपणही असे तंत्र वा यंत्रणा स्वतः विकसित करावी असे त्यांनी ठरवले

स्वतः केली तंत्रनिर्मिती

राजेंद्र यांनी ‘सिंचन ऑटोमेशन’ यंत्रणा ‘डिझाइन’ करण्यास सुरुवात केली. बाजारपेठेत जाऊन कंट्रोलर, पॉवर सप्लाय, पंप सुरू करण्यासाठी ‘कॉन्टक्टर’, चार सेन्सर्स, जीएसएम सिम कार्ड अशा साहित्याची खरेदी केली.

स्वकौशल्य व अभ्यास करून साहित्याची योग्य रीतीने जोडणी (असेंब्लिंग) केली. लोखंडी पॅनेल तयार करून ही यंत्रणा त्यात बसविली. सन २०१८ मध्ये आपल्या दोन एकर उसात या यंत्रणेची चाचणी घेण्यास सुरुवात केली.

पूर्वीची ठिबक सिंचन यंत्रणा होती. त्याचा ‘मोटर स्टार्टर पॅनेल काढून त्या जागेवर नवा ‘पॅनेल बॉक्स’ बसविला. खते देण्यासाठीचा ‘इंजेक्टर’ची जोडणीही स्वतःच केली.

यंत्रणा सुरू होण्यासाठी ‘थ्री फेज कनेक्शन’ जोडले. पूर्वी पाण्याचे ‘व्हॉल्व्ह’ चालू, बंद करण्यासाठी शेतात जावे लागे. आता शेतात पाणी देण्याच्या जुन्या पाइपलाइनमध्ये कोणते बदल न करता ‘सोलेनॉइड व्हॉल्व्ह’ बसविले.

यंत्रणा झाली कार्यान्वित

आता यंत्रणेला दिलेल्या संगणकीय प्रोग्रॅमनुसार मोटर पंप सुरू होतो. फिल्टर ‘ऑटो फ्लश’ होण्याची सुविधा आहे. दिलेल्या वेळेनुसार त्या त्या प्लॉटला पाणी व खते देता येतात. राजेंद्र यांनी आपल्या गरजेनुसार ‘मोबाईल ॲप’ विकसित करून घेतले आहे.

त्यानुसार देशात कुठूनही संबंधित यंत्रणा कार्यान्वित करता येते. एखाद्या प्लॉटला दिलेले पाणी वा खत यांचे स्टेटस काय आहे, त्याचा कालावधी ही माहिती ॲपच्या माध्यमातून समजते. टाकीतील खत संपले असल्यास तसाही संदेश त्याचबरोबर ‘पॉवर फेल’, ‘ड्राय रन’, ‘ओव्हरलोड ’ आदींचेही संदेश येतात.

या यंत्रणेत प्रथमच ‘सिंगल वायर मल्टी व्हॉल्व्ह’ पध्दतीचा वापर केल्याचा दावा राजेंद्र यांनी केला आहे.त्यामुळे यंत्रणेतील व पर्यायाने शेतकऱ्यांचा खर्च कमी झाल्याचे ते सांगतात.

यंत्रणेची वैशिष्ट्ये व फायदे

राजेंद्र सांगतात, की एक ते साडेसात एचपी क्षमतेच्या मीटरला ही यंत्रणा जोडता येते. ‘सिम कार्ड’ असल्याने कोणत्याही ठिकाणाहून ती नियंत्रित करता येते. यंत्रणेत अजून सुधारणा केल्यास खते आणि पाण्याचा ईसी, पीएच यांचेही मोजमाप घेता येऊ शकते.

यंत्रणेच्या वापरामुळे खते व पाणी यांच्या वापरात ३० ते ४० टक्क्यांनी व पर्यायाने त्यावरील खर्चात बचत झाली आहे. खताची कार्यक्षमता वाढल्याने ऊसपीक वाढीस मदत मिळाली आहे. मजुरी खर्च व श्रमही कमी झाले आहेत.

Automation Mechanism
Sugar Factory Election : ‘चोसाका’च्या २१ जागांसाठी १७१ अर्ज दाखल ः बिडवाई

पूर्वी उसाचे एकरी ४० टन उत्पादन मिळायचे. गेल्या दोन वर्षांत आडसाली उसाचे एकरी ८० ते ९० टनांच्या दरम्यान उत्पादन मिळू लागल्याचे राजेंद्र सांगतात. मोकळ्या जागेतही हे उपकरण बसवता येते. सध्या त्यांनी दोन एकरांसाठी त्याचा वापर सुरू केला आहे. सुमारे एक ते दोन किलोमीटर परिघात त्याचे कार्य चालते. त्याची देखभाल करणेही सुलभ असल्याचे ते सांगतात.

गुंतवणूक

कोणतीही यंत्रणा तयार करण्यासाठी प्रामुख्याने भांडवलाची आवश्यकता असते. राजेंद्र यांनी कमी खर्चात म्हणजे दीड लाख रुपये खर्चात आपली यंत्रणा तयार केल्याचा दावा केला आहे. येत्या काळात यंत्रणेत अजून सुधारणा व विस्तार केला जाणार आहे.

आगामी काळात या तंत्रज्ञानाचा प्रसार होण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या ‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमांतर्गत बारामती येथील केंद्रात त्याची नुकतीच नोंदणी केल्याचे राजेंद्र सांगतात.

राजेंद्र ताकवणे, ८८३००६२१२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com