Pune Rain News : सोमवारी सायंकाळी आणि रात्री राज्यातील अनेक भागांत वादळी पाऊस (Rain) आणि गारपीटीने दाणादाण केली. धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, नागपूर, बीड, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये पिकांना तडाखा बसला.
तर रब्बी पिकांसह कांदा (onion), भाजीपाला (Vegetable) आणि फळबागांनचे (Fruit orchard) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने पूर्वसुचना देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
काल सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाल्यानं शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, हवेली तालुक्यांमध्ये काल सायंकाळी मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली.
तर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या सरीही पडल्या. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, भाजीपाला आणि फळ पिकांचे नुकसान झाले.
मराठवाड्यातही अनेक भागांमध्ये दोन दिवसांपासून विजांचा कडकडाट व वादळासह पाऊस झाला. गहू, हरभरा, मका, ज्वारी, या पिकांसह आंबा आणि इतरही फळ पिकांना मोठा दणका बसला. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक होती.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यातील परळी, बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव, शिरूर कासार आणि वडवणी मंडळात पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, शिरूर अनंतमाळ व चाकूर तालुक्यांतील मंडळांमध्ये पिकांना तडाखा बसला.
खानदेशात पिकांचे नुकसान अधिक
खानदेशात शनिवारपासूनच ठिकठिकाणी वादळ, पाऊस व गारपीट सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात टिटाणे गावात सोमवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. साक्री, धुळे, शिरपूर, शिंदखेडा भागात पाऊस आणि वादळाने कहर केला. धुळे जिल्ह्यात सुमारे १६ ते १७ हजार हेक्टरवरील पिके हातची गेल्याची माहिती आहे.
नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांतही जोरदार फटका बसला. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे चार हजार हेक्टरवरील पिकांचे ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव, अमळनेर, जळगाव, पारोळा, जामनेर, यावल आदी भागांत वादळ व पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात सुमारे १५ ते १६ हजार हेक्टरवरील पिकांचे वादळी पावसात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
नाशिक जिल्ह्यात तडाखा
नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा व मालेगाव तालुक्यात मोठा फटका बसला. त्यामुळे टोमॅटो व हिरव्या मिरची लागवडी आडव्या झाल्या. गहू, द्राक्ष, कांदा पिकाला मोठा तडाखा बसला. इगतपुरी व नाशिक तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली.
नाशिक जिल्ह्यात २६८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली. मात्र सोमवार मध्यरात्रीनंतर अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने नुकसानीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन सुगीच्या काळात वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात शिमगा केला.
गहू पिकात सर्वाधिक नुकसान निफाड, नाशिक, येवला, नांदगांव तालुक्यात गहू पिकाचे नुकसान जास्त आहे. तर नाशिक, कळवण व त्र्यंबकेश्र्वर तालुक्यात भाजीपाला पिकाला फटका बसला. द्राक्षासारख्या बहुवार्षिक पिकात निफाड व नाशिक तालुक्यात मोठे नुकसान आहे. तर आंबा पिकाच नाशिक,त्र्यंबकेश्र्वर व चांदवड तालुक्यात नुकसान झाले.
या पिकांचे झाले नुकसान
गहू, मका, हरभरा, दादर ज्वारी, रबी ज्वारी, द्राक्ष, डाळींब, संत्रा, मोसंबी, केळी, आंबा, हळद, काजू आणि भाजीपाला पिके.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.