Livestock Census : पशुगणना ठरविणार विकासाचे धोरण

Development Policy : पशुगणना नेमकी कशासाठी केली जाते, त्याचे पशुपालक आणि शासकीय धोरणांसाठी कोणते दूरगामी फायदे आहेत, त्यामध्ये पशुपालकांचा सहभाग कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे, याचा घेतलेला हा आढावा...
Livestock Census
Livestock CensusAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे, अमित गद्रे

Planning and Strategy of Animal Census : ग्रामीण भागातील कुटुंबांना, शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगाने बऱ्यापैकी आर्थिक आधार दिला आहे. याचबरोबरीने दूध, अंडी आणि मांस यांच्या स्वरूपात पोषक आहार पुरविण्यासाठी पशुपालन हा महत्त्वाचा स्रोत आहे. हवामान बदलाच्या काळात शेती व्यतिरिक्त पशुपालन हाच महत्त्वाचा आर्थिक प्रगतीचा मार्ग राहणार असल्याने पशुसंगोपनाकडे बऱ्याच जणांचा ओढा वाढला आहे.

पशुधन क्षेत्राचा विकास आणि संवर्धन याचबरोबरीने गाव ते आंतरराष्ट्रीय पातळीवरील ध्येय धोरणे निश्‍चिती करण्यासाठी बिनचूक आकडेवारीची आवश्‍यकता असते. पशुधनाची स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील मागणीबाबतची दीर्घकालीन ध्येय धोरणांच्या विश्‍लेषणासाठी पशुगणना महत्त्वाची भूमिका निभावते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर देश आणि राज्याच्या मूल्यांकनासाठी पशुगणना हा मोठा आधार आहे. यासाठी देशभरात सुरू असलेल्या पशुगणनेमध्ये पशुपालकांनी गांभीर्याने सहभागी होणे आवश्यक आहे. पशुधन विकासातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे याबरोबरीने ध्येय धोरणे, उद्दिष्टे ठरविण्यासाठी पशुधनाची अचूक आकडेवारी आवश्‍यक आहे.

देशाची अर्थव्यवस्था ही शेती, पशुधन आणि पशुपालनावर अवलंबून.

अन्न सुरक्षेसाठी दूध, अंडी, मांसापासून प्रथिनांची उपलब्धता.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना पशुपालन मोठा आधार.

Livestock Census
Livestock Census : पशुगणनेनंतर पुढे काय?

दूध, मासे, लोकर, अंडी, मांस आदींच्या निर्यातीमधून परकीय चलनाची उपलब्धता. निर्यात धोरण ठरविण्यासाठी पशुगणना महत्त्वाची.

राज्य उत्पन्नातील २.४ टक्के असणारा वाटा वाढीसाठीच्या धोरण निर्मितीसाठी पशुगणना महत्त्वाची.

देशात महाराष्ट्र पशुधनामध्ये सातव्या आणि कुक्कुटपालनामध्ये पाचव्या क्रमांकावर.

गणनेमध्ये पशुधनाचा समावेश

राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागातील कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर कौटुंबिक उपक्रम, संस्था, गोशाळा यांच्याकडे असणाऱ्या आणि राज्यात आढळणाऱ्या पशुधनाच्या १६ प्रजातींची गणना केली जाणार आहे. यामध्ये गायवर्गीय, म्हैसवर्गीय पशूंसह मिथुन, मेंढी, शेळी, वराह (डुक्कर), घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती यांची नोंद होणार आहे. याबरोबरीने कुक्कुट पक्ष्यांमध्ये कोंबडा, कोंबड्या, बदक, टर्की, इमू, क्वेल, गिनी, शहामृग यांची जातनिहाय, वयोगट आणि लिंगनिहाय गणना केली जाणार आहे.

देशातील नोंदणीकृत पशुधनाच्या जाती

देशी गोवंश ४०

म्हशी १३

मेंढी ४१

शेळी २६

घोडा ६

गाढव ९

वराह ६

कोंबडी १६

देश विकासाच्या दृष्टीने जनगणनेच्या सोबत पशुगणना देखील आवश्यक आहे. देश आणि आंतरराष्‍ट्रीय पातळीवर कृषी आणि पशुधन, पशुपालन ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांवर अवलंबून आहेत. देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न आणि प्रथिनांची वाढती गरज ध्यानात घेता पशुसंगोपन आणि त्यांची गणना महत्त्वाची आहे. गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पशुपालन, पशुसंवर्धन आणि पूरकउद्योगाचे धोरण निश्‍चितीसाठी पशुगणना फायदेशीर ठरणार आहे. यासाठी सर्व पशुपालकांनी प्रगणकांना बिनचूक माहिती द्यावी.
डॉ. प्रवीणकुमार देवरे, आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य
Summary

संशोधन, विस्तारासाठी पशूगणना महत्त्वाची

केंद्र शासनाच्या पशुविज्ञानाशी संबंधी विविध संस्था आणि राष्ट्रीय पशू अनुवंशिकीय संसाधन ब्यूरो माध्यमातून पशुप्रगणकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे यावेळी पशूजातीनुसार पशुगणना होणार आहे. त्याआधारे राज्यात नेमक्‍या कोणत्या जातीच्या पशूंची संख्या अधिक आहे हे कळण्यास मदत होईल. त्यासोबतच उत्पादनक्षम जनावरे, त्यांचे वय देखील कळणार आहे. यामुळे वंशावळ सुधारणांसोबतच राज्यात दुग्धोत्पादनात वाढीसाठी नेमक्‍या कोणत्या बाबींवर भर देण्याची गरज आहे, हे संशोधनात्मक, धोरणात्मक पातळीवर ठरविण्यासाठी ‘माफसू‘ला मदत होणार आहे. यंदा पहिल्यांदाच पशुगणनेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याने अचूकता साधली जाणार आहे. दुसऱ्या राज्यातून आलेल्या जनावरांची नोंद स्वतंत्रपणे घेण्याबाबत स्पष्टता आहे. त्यामुळे अतिरिक्‍त नोंद टाळली जाईल. बेरारी, नागपुरी त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील बेलोना म्हैस दूध उत्पादनक्षम असल्याचे समोर आले आहे. त्यावरही ‘माफसू‘मध्ये संशोधन सुरु आहे. निश्चितपणे पशुगणनेतून देश आणि राज्याला दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
डॉ. नितीन पाटील, कुलगुरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
Livestock Census
Livestock Census : पशुपालकांनो जनावरांची खरी माहिती द्या

ठोस उपाययोजनांची गरज

मी गेल्या अनेक वर्षांपासून दूध व्यवसाय करतो. माझ्याकडे सध्या दोन दुधाळ म्हशी आहेत. सध्या चाऱ्याची टंचाई, पशुखाद्याच्या वाढत्या किमती तसेच दूध खरेदी दरात होणारी घट पशुपालकांना तोट्यात आणत आहे. पशुगणनेनंतर यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. पशुगणनेतून राज्यातील जनावरांची योग्य संख्या समजणार असल्याने शासनाला पशुपालनासंबंधी नवी योजना जाहीर करणे शक्य होणार आहे. केवळ कागदोपत्री माहिती न जमवता पशुपालनाच्यावाढीसाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. पशुगणनेच्या आधारावर शासनाकडून विविध धोरण, योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्य‌कीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यानुसार लसीकरण, औषधांचा पुरवठा केला जाण्याची शक्यता असल्याने प्रत्येक शेतकऱ्यासाठी पशुगणना महत्त्वाची आहे.
संदीप खामकर, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
Chart
ChartAgrowon

पशुगणना का महत्त्वाची?

पशुगणना हा पशुधनाची सद्यःस्थितीदर्शविणारा आरसा असतो. म्हणूनच वर्तमान आणि भविष्यकालीन नियोजनासाठी पशुगणनेची आकडेवारी अत्यंत उपयुक्त ठरते. प्रगणकांच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने पशुगणना होत असून, अचूक माहितीचे संकलन होणार आहे.

पशुगणनेमध्ये पाळीव पशुपक्ष्यांची जात, वय, लिंग, नर मादी, लहान मोठी जनावरांची संख्या इत्यादी घटकनिहाय पद्धतशीरपणे शास्त्रोक्त नोंद घेतली जाते. यावरून आपल्याला स्थानिक पशुधनाचा परिचय होतो. अनेक भागांतील पशुधन हे वैशिष्ट्यपूर्ण असून, एखाद्या प्रदेशाची ओळख (उदा. उस्मानाबादी शेळी) संबंधित पशुधनावरून केली जाते. याचबरोबर काही दुर्मीळ, दुर्लक्षित आणि लुप्त होणाऱ्या पशुधन जातींचे संवर्धन होण्यास मदत होते.

वैशिष्ट्यपूर्ण पशुधन हे केवळ प्रादेशिक अस्मिता नसून एखाद्या पशुपालक समूहाची सामाजिक-सांस्कृतिक ओळख असते. पशुधन आणि पशुपालक यांच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक आर्थिक तरतुदी, सेवा आणि गरजांचे नेमके चित्र स्पष्ट होते.

पशुधन हा प्रमुख किंवा दुय्यम व्यवसाय असणाऱ्यांचा तपशील पशुगणनेत संकलित होत असल्याने पशुधन क्षेत्रावर उपजीविका करणाऱ्या घटकांची माहिती उपलब्ध होते. यातून पशुपालकांचे सामाजिक तथा आर्थिक चित्र स्पष्ट होते.

पशुगणनेच्या नोंदीवरून कृषी, रोजगार, प्राणिज प्रथिने, अन्नसुरक्षा, पशुधन व्यापार वगैरे बाबींचे तपशीलवार नियोजन करणे सोयीचे ठरते. पशुधनाच्या आकडेवारीवरून त्यांच्या संख्येत होणारे चढ-उतार नियोजनकर्त्यास पशुधन संवर्धनाचे उपाययोजना सुचविण्यास मदत करतात.

यंदाच्या पशुगणनेत भटक्या पशुपालकांची माहिती गोळा करण्यात येणार असल्याने या दुर्लक्षित घटकाच्या समस्या लक्षात येऊन त्याच्या प्रगतीसाठी करावयाच्या नेमक्या प्रयत्नांची दिशा मिळणार आहे.

शास्त्रोक्त माहितीच्या आधारे, नैसर्गिक समतोल राखत उपलब्ध पशुधन संसाधनांचा विनियोग कसा करावा यांसह चारा-पाण्याचे नियोजन, चराई क्षेत्र संरक्षण, पशुवैद्यकीय सेवा क्षेत्राचा विकास, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब इत्यादी याबाबत शासकीय स्तरावर धोरण निश्चिती, प्राधान्यक्रम आणि आर्थिक तरतुदी ठरविणे सुलभ होते.

विविध पशुधनाच्या प्रादेशिक विभिन्नतेतून पशुधनाचे असलेले अर्थव्यवस्थेतील योगदान, पशुजन्य साथीचे रोग नियंत्रण, जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण, नवनवीन तंत्रज्ञान यांचे नियोजन ठरण्यात पशुगणनेची भरीव मदत होते. तसेच नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतकार्य, नियोजन करण्यास पशुगणना उपयुक्त ठरते.

-डॉ. प्रवीण बनकर,

९९६०९८६४२९

(सहयोगी प्राध्यापक, पशू आनुवंशिकी व पैदासशास्त्र विभाग, स्ना.प.प.संस्था, अकोला)

...अशी होणार पशुगणना

२१ व्या पशुगणनेला २५ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रारंभ. ही गणना २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू असणार.

मोबाइल ॲपद्वारे होणार संपूर्ण पशुगणना.

पशुगणनेसाठी ७ हजार ४७२ प्रगणक आणि १ हजार ४२४ पर्यवेक्षकांची उपलब्धता.

ग्रामीण भागात तीन हजार कुटुंबांमागे एक प्रगणक आणि ५ प्रगणकांमागे एका पर्यवेक्षकांची नियुक्ती.

विविध पशुधनासह भटकी कुत्री, भटक्या गायी, भटका पशुपालक समुदाय याचबरोबरीने गोशाळा, पांजरपोळमधील पशुधनाच्या माहितीचे संकलन.

दुर्गम भागात मोबाइल नेटवर्क नसले, तरी ॲपमध्ये माहिती सादर केल्यानंतर प्रगणक नेटवर्कमध्ये आल्यानंतर आपोआप माहिती सर्व्हरवर अपलोड होणार. यातून तांत्रिक अडचणीवर मात.

पशुगणनेसंदर्भात माहितीसाठी पशुपालकांनी स्थानिक पशुवैद्यकाशी संपर्क साधावा. https://dahd.maharashtra.gov.in

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com