Maharashtra Politics : केंद्राप्रमाणे राज्य सरकारही विश्‍वासघातकी

Vijay Waddetiwar on State Government : नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र गेल्या १० वर्षांत सरकारने शेतकऱ्याला दीड पट हमीभाव दिला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी राज्य सरकारवर केली.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon

Mumbai News : केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी विश्‍वासघातकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र गेल्या १० वर्षांत सरकारने शेतकऱ्याला दीड पट हमीभाव दिला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी राज्य सरकारवर केली.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (ता.२७) सुरुवात होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या वतीने सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण विरोधी पक्षाला देण्यात आले होते. मात्र विरोधी पक्षाने पत्रकार परिषदेत सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली.

Vijay Wadettiwar
Indian Politics : नवी सुरुवात, नवे संकल्प

या वेळी विजय वडेट्टीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झाली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. या वेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आदी उपस्थित होते.

Vijay Wadettiwar
Indian Politics : संघाच्या नाराजीने फरक काय पडतो?

विजय वडेट्टीवार म्हणाले, की राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणीटंचाई, वाढता कर्जाचा बोजा, पीकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच वीजबिल माफी करावी, अशी मागणी वारंवार केली. मात्र संवेदना गमावलेल्या सरकारला शेतकऱ्यांशी देणेघेणे नाही.

महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज, महाभ्रष्टाचारी सरकारचा चहा घेणे हा, लोकशाहीचा तसेच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. या लुटारू सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सरकारमधील कमिशनखोरी ३० टक्क्यांच्या पुढे गेली आहे. टेंडरबाज आणि कमिशनखोर म्हणून सरकारमधील प्रत्येकाची ओळख निर्माण झाली आहे. सगळ्या मंत्र्यांकडे दलालांची फौज आहे. या दलालांना मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र कक्ष दिला आहे. या कक्षात बसून तोडपाणी सुरू आहे, अशा शब्दात टीका केली.

‘सोयाबीनचे दर आजही तेच’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड पट करू असे आश्‍वासन दिले होते. मात्र गेल्या १० वर्षांत सरकारने शेतकऱ्याला दीड पट हमीभाव दिला नाही. २०१३ मध्ये सोयाबीनचे जे दर होते तेच दर आजही आहेत. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केले. बियाणे, खते, शेती अवजारे, ट्रॅक्टर आदींवर जीएसटी लावून या सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे आणि त्यांना उद्‍ध्वस्त करण्याचे पाप सरकारने केले.

केंद्र सरकारने गुजरातला कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा निर्यातीला परवानगी दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्र विरोधी केंद्र सरकारच्या विरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवाज का उठवला नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. अंबादास दानवे यांनीही या वेळी सरकारवर हल्ला चढविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com