Buldana News : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात असलेल्या कृषी विक्रेत्यांना बियाणे, खते, कीटकनाशक विक्रीचे परवाने दिलेले आहेत. मात्र, यापैकी काही जणांनी मनमानी पद्धतीचा कारभार सुरू केलेला असल्याची बाब समोर आली.
कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये ही अनियमितता समोर आल्याने जिल्ह्यात आतापर्यंत या हंगामात ११८ परवाने रद्द तर २०७ जणांना विक्री बंद आणि १० जणांचे परवाने निलंबितचे आदेश काढण्यात आले आहेत.
यात कुणाचा बियाणे विक्रीचा, कुणाचा खत विक्रीच्या परवान्याचा समावेश असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली. शेतकऱ्यांना हंगामासाठी दर्जेदार बी-बियाणे, खते, कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी विक्रेत्यांना परवाने देण्यात आले. हंगाम सुरू होताच या दुकानांवर शेतकऱ्यांची गर्दीही झाली.
या काळात नियमांना बगल देणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. जिल्ह्यातील ११८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तसेच २०७ जणांना विक्री बंदचेही आदेश मिळाले आहेत. जिल्ह्यात एकूण १६८२ कृषी केंद्रांना परवाने मिळालेले आहेत. या केंद्रांची तालुकानिहाय कृषी विभागाने तपासणी केली. या तपासणीमध्ये काही केंद्रामध्ये अनियमितता दिसून आली होती. काही विक्रेत्यांनी गुणनियंत्रक पथकास तपासणीसाठी साधे सहकार्यही केले नाही.
कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आल्याने कृषी विभागाने याप्रकरणी कारवाई केली. अहवाल सादर न करणे, साठा रजिष्टर अपडेट न करणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या पावतीवर सही न करणे, विक्री परवाना दर्शनीय जागेवर न लावणे, या कारणांसाठी २०७ जणांना विक्रीबंद करण्याचे आदेश दिले. तर गुण नियंत्रण निरीक्षकांच्या तपासणी वेळी कृषी सेवा केंद्र बंद करून तपासणीस सहकार्य न करणे,
मासिक प्रगती अहवाल न देणे, कृषी सेवा केंद्राच्या कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराची नोंद नसणे, परवाना नूतनीकरण न करणे, अशा त्रुट्या आढळलेले ११८ परवाने रद्द करण्यात आले. तर काहींचे परवाने निलंबित करण्यात आले. यात वरवट बकाल, बिबी, मलकापूर, खामगाव, उंद्री, मेहकर, धामणगावबढे, किनगावराजा आदी ठिकाणच्या विक्रेत्यांचे १० परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.