Financial Management : बचतीला प्रारंभ करूयात...

Future Financial Plan : भविष्यातील गरजा भागविण्यासाठी आलेल्या उत्पन्नातून पैशाची तरतूद, त्यासाठी ठराविक रकमेची बचत करणे आणि त्यानंतर राहिलेली रक्कम खर्च करणे ही सवय लावून घ्यायला हवी.
Financial Situation
Financial SituationAgrowon

कांचन परुळेकर

Planning of Finance Management : खर्चापेक्षा आमचे उत्पन्न कमी असल्याने हातउसने घेऊन, कर्ज काढूनच आम्हाला आयुष्य जगावे लागते, मग बचत कशी करणार, ही आपली समस्या दूर करण्यासाठी बचतीची सवय महत्त्वाची आहे. बचतीची सवय लाऊन घेण्यासाठी आपल्याला काही बाबी नीट समजून घ्याव्या लागतील. प्रथम उत्पन्न आणि खर्च याचा विचार करूयात.

विविध मार्गांनी आपल्याला मिळणारा पैसा म्हणजे उत्पन्न आणि वेगवेगळ्या कारणासाठी खर्च होणारा पैसा म्हणजे खर्च. उत्पन्न खर्च यावर आपले लक्ष असणे आवश्यक आहे. पण नियोजन करताना कोणकोणत्या मार्गाने हाती पैसा येणार, म्हणजे आवक आणि कोणकोणत्या मार्गाने तो खर्च होणार याचा गंभीरपणे विचार करणे महत्त्वाचे ठरते. या सर्व बाबी प्रत्येकाने लिहून काढाव्यात.

यापैकी कर्ज आणि हातउसने जमा रकमेत समाविष्ट केले असले तरी ते खरे उत्पन्न नव्हे. तो आपल्यावरील बोजा आहे. ते पैसे आपल्याला परत करावे लागणार याचे भान ठेवावे. खर्चाच्या बाबीत गुंतवणूक दाखविली आहे. तो खरा खर्च नव्हे. ती भविष्याची तरतूद आहे.

आपण हा आराखडा तयार केला, की आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा आपल्याला अंदाज येईल. म्हणजे आपण कोठे आहोत हे समजेल. त्यानंतर आपल्या आर्थिक गरजा नक्की कराव्यात. आपल्याला एक वर्षात (कमी कालावधी), १ ते ५ वर्षांत (मध्यम कालावधी), आणि पाच वर्षांनंतर म्हणजे दीर्घकाळात काय मिळवायचे आहे ते ठरवावे.

आवक बाबी (जमा रक्कम)

पगार किंवा मजुरी

बोनस

ओव्हरटाइम

धंद्यातील नफा

घरभाडे

बचतीवरील व्याज

भेटवस्तू रक्कम

मालमत्ता विक्री रक्कम

रद्दी, भंगार, जुन्या वस्तू विक्री रक्कम

कर्ज रक्कम

हात उसने

Financial Situation
Water Crisis : पिण्यासाठी जल प्रकल्पांतील ११.५८ दलघमी पाणी राखीव

खर्च बाबी

दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी

चैनीच्या वस्तू खरेदी

कर्जफेड

घरखरेदी

लग्न खर्च, मुलांचे शिक्षण

लाइट, पाणी बिले, विमा हप्ता

मोबाइल रिचार्ज

व्यवसायासाठी मशिन खरेदी

हॉटेलिंग

सोने खरेदी

व्याज भरणे

करमणूक

यात्रा, प्रवास

व्यसने

गुंतवणूक

आर्थिक नियोजनाचे उदाहरण...

प्रत्येक वस्तूच्या किमती अन् ती वस्तू केव्हा खरेदी करायची याचा अंदाज घ्यावा. एका वर्षात १०,००० रुपयांचे कर्ज फेडायचे आहे आणि आठ हजारांची सायकल घ्यायची आहे, दोन वर्षांत ४०,००० रुपयांची म्हैस घ्यायची आहे. पाच वर्षांत घर बांधणीला चार लाख रुपये हवे आहेत. हे मोठे आकडे ऊर दडपून टाकतात आणि आपल्या अपुऱ्या आवकेत हे कसे जमणार असे वाटायला लागते.

बचतीचा म्हणजे आवकेतून बाजूला काढून ठेवण्याच्या रकमेचा आकडा जेव्हा छोटा दिसू लागतो त्यावेळी आपली वाटचाल आत्मविश्‍वासाने, धडाडीने होते. म्हणून या सर्व गोष्टी साध्य करायच्या तर टप्प्याटप्प्याने किंवा एका पाठोपाठ एक याप्रमाणे आपल्याला दैनंदिन बचत किती करावी लागणार हा आकडा निश्चित करावा अन पहा बचतीकडे तुमचा कल कसा वाढत जातो. तो आकडा गाठण्यासाठी आपोआपच उत्पन्न वाढीचे मार्ग, खर्चाला लगाम घालण्याचे मार्ग भराभर सुचू लागतात. वाईट कारणासाठी होणारा खर्च आटोक्यात येऊ लागतो. सहाव्या महिन्यात १०,००० चे कर्ज फेडायचे आहे. गणित करूयात.

आपला दररोज, आठवडा, महिन्याचा खर्च, उत्पन्न, बचत लिहून ठेवावी. बचत बँकेत किंवा पोस्टात ठेवावी. विचार करून खर्च करावा. आपल्या बचतीकडे सतत बारीक लक्ष असू द्यावे. बचत योजनेप्रमाणे होत नसेल तर पुन्हा एकदा खर्चाची बाजू तपासावी. कोणता खर्च कमी करता येईल, म्हणजे बचत वाढेल याचा अंदाज घेऊन कृती करावी. उदा. दिवसभरात आपण चार वेळा चहा पीत असू, तर तो दोनवर आणला तर एका घरगुती चहाचा खर्च पाच रुपये धरला, तर दररोजचे १० रुपये वाचतील.

घरात सतत टी.व्ही. सुरू असेल तर तो कमी वेळ लावला तर वीजबिल वाचेल. हॉटेलिंगसाठी होणारा खर्च, करमणुकीसाठीचा खर्च, सणसमारंभ खरेदी, कपडे खरेदी अशा खर्चात कपात करून अपेक्षित बचतीचा आकडा आपल्याला निश्‍चित गाठता येतो.बचत केलेला पैसा बँक किंवा पोस्टात वाढीव परतावा, जादा व्याज मिळेल अशा योजनेत गुंतवावा. फसव्या योजनेत पैसे गुंतवू नका. आपले उत्पन्न वाढविण्याचा सतत प्रयत्न करावा.

Financial Situation
Crop Damage Compensation : गेल्या खरिपातील नुकसानीची मदत द्या

आर्थिक नियोजनाचे टप्पे

आपल्या कमी कालावधी, मध्यम कालावधी व दीर्घ कालावधी गरजा निश्‍चित करूयात.

बचतीला प्रारंभ करूयात.

जुने कर्ज प्रथम फेडूयात.

उत्पन्नवाढीच्या बाबींमध्ये पैसे गुंतवणूक करूयात. सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करा.

कुटुंबाच्या उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम आकस्मिक खर्चासाठी खाते उघडून त्यात जमा करा.

विमा कवच प्राप्त करण्यासाठी विमा उतरवूया.

छोट्या गरजांसाठी जर त्या उत्पन्न देणाऱ्या असतील तर त्यासाठी बँककडून कर्ज घेऊयात. मात्र कर्ज फेडीच्या हप्त्यासाठी दैनंदिन बचत करूयात.

खर्च करण्यापूर्वी विचार करा. कारण खर्चाच्या बाबीवर सतत केलेला खर्च आपल्यासाठी उत्पन्न वा मालमत्ता निर्माण करत नाहीत, याचे भान ठेवा.

टाळता येणारे खर्च टाळूयात.

जादा उत्पन्न मिळविण्याचे चांगले मार्ग शोधून काढण्याचे प्रयत्न करूयात.

मला किती पैसे लागणार १०,००० रूपये

पैसे केव्हा लागणार सहाव्या महिन्यात

किती दिवस हाती आहेत ६ x ३०= १८० दिवस

दर दिवशी मला किती पैसे वाचवायला हवेत (बचत) १०,००० ÷ १८० = ५५ रुपये

बचत बँकेत रक्कम दररोज ५५ रुपये

या पद्धतीने वर नमूद केलेल्या गरजांसाठी आपल्याला दररोज किती बचत करावी लागेल

याचे कोष्टक बनवावे. बचतीची सवय करावी. टप्याटप्याने एक एक ध्येय समोर ठेवून पुर्ण करावे.

गरज आवश्यक रक्कम रुपये कधी दिवस आवश्यक रोजची बचत

सायकल खरेदी ८,००० चार महिने ३० x ४=१२० ८,००० ÷ १२०=६७ रु.

शेती अवजारे ४,००० सहा महिने ३० x ६=१८० ४,००० ÷ १८०=२२ रु.

म्हैस खरेदी ४०,००० दीड वर्ष ३६५ x १.५=५४७ ४०,००० ÷ ५४७=७४ रु.

दुकानासाठी भांडवल २०,००० दोन वर्षे ३६५x२=७३० २०,००० ÷ ७३०=२७ रु.

घर खरेदी ४,००,००० पंधरा वर्षे ३६५x१५=५,४७५ ४,००,००० ÷ ५,४७५=७४ रु.

मुलाचे उच्च शिक्षण १,००,००० सात वर्षे ३६५x७=२,५५५ १,००,००० ÷ २,५५५=३९ रु.

मुलीचे लग्न १,५०,००० पाच वर्षे ३६५x५=१,८२५ १,५०,००० ÷ १,८२५=८२ रु.

म्हातारपणाची तरतूद ३,००,००० २५ वर्षे ३६५x२५=९,१२५ ३,००,००० ÷ ९,१२५=३३ रु.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com