Rain Update : जाणून घेऊया पावसाची भाषा...

Monsoon Update : पावसाळा आला की पूर्वी रोहिणी, मृग, हस्त, वैशाख वणवा, आषाढ धार हे आणि असे शब्द कानी पडायला लागत. या प्रत्येक शब्दाला त्यांचे संदर्भही होते. मात्र हे शब्द हळूहळू जुन्या पिढीसोबत इतिहास जमा होत चालले आहेत. आता आपला शेतकरी पाऊस, मॉन्सून, हवामान अंदाज, किती इंच पडला अशा भाषेत बोलू लागला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

सतीश खाडे

Weather Update : कोट्यवधी भारतीयांचे जगणे आणि देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने जोडली गेली आहे ती मोसमी वाऱ्यासोबत येणाऱ्या पावसाशी. त्यालाच इंग्रजीमध्ये मॉन्सून असे म्हणतात. हा शब्द मौसम या अरेबिक शब्दाचा अपभ्रंश असून, त्याचा मूळ अर्थ ऋतू किंवा सीझन.

हवामानशाळांची वाटचाल

मोसमी पावसाचा अभ्यास सतराव्या शतकात सुरू झाला. त्या वेळचे रॉयल सोसायटीचे अध्यक्ष (अन् धूमकेतूचा शोध लावणारे) एडमंड हॅले यांनी मोसमी पावसाचा नकाशा सर्वप्रथम प्रसिद्ध केला. ज्या काळात संसाधने फारच कमी किंवा अजिबातच नव्हती, अशा काळात केलेले काम हे अद्वितीय व अद्‍भुत मानायला हवे.

पृथ्वी भोवतीच्या वातावरणातील ‘क्लायमेट’ ही सर्वांत महान व सर्वाधिक गुंतागुंतीची प्रणाली आहे. गेली साडेतीनशे वर्षे संशोधन होऊनही त्यातील अनेक रहस्यांचा अजून उलगडा झालेला नाही. मौसमी पावसाबद्दल दरवर्षी नवीन माहिती पुढे येतच आहे.

इ.स. १८४० मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी भारतातलीच नव्हे, तर आशियातील पहिली वेधशाळा त्रिवेंद्रम येथे उभी केली. महाराजांना विज्ञान तंत्रज्ञानाचे विशेषतः पश्‍चिमी देशातील विज्ञानाचे खूप आकर्षण होते. त्यांनी उभी केलेली ही वेधशाळा पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावरच आहे. याच वेध शाळेतून इ.स.१८५२ ते १८६९ दरम्यानच्या निरीक्षणातून नोंद करण्यात आली की मृग नक्षत्रावर सात जूनला भारतात पाऊस येतो.

ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८७५ मध्ये भारतीय हवामान खाते स्थापन केले. एच. एफ. ब्लॅंक फोर्ड यांची हवामान खात्याचे भारताचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती केली. काही दशकांपर्यंत देशभरामध्ये ठिकठिकाणी तापमान, पाऊस व हवामानासंबंधी नोंदी घेऊन त्या हवामान शाळांना पाठवल्या जात.

त्यांचा दस्तऐवज तयार होई. पुढे एका शतकानंतर म्हणजे १९८० पासून उपग्रह, रडार, इंटरनेट, संगणक अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. त्यातून हवामान संशोधनाला वेग आला. भारतासह अनेक देशांमध्ये त्यासाठी सुपर कॉम्प्युटरचा वापर केला जात आहे.

Rain Update
Rain Update : निसर्गाकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

हवामानात होत असलेला बदल बघता त्यानुसार शेती पद्धती व तंत्रज्ञानामध्ये बदल करण्यासंदर्भात विचार सुरू झाला. आज जगभराच्या हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी २०० पेक्षा अधिक उपग्रह अवकाशात फेऱ्या मारत आहेत.

समुद्रावर १००० पेक्षा अधिक तरंगती हवामान निरीक्षण गृहे आहेत. आज जगभरात स्वयंचलित व मानवचलित वेधशाळांची संख्या दहा हजारांहून अधिक आहे. हे सर्व एकमेकांशी जोडले गेले असून, जागतिक आणि स्थानिक हवामानाचा संबंध जोडून अंदाज वर्तविले जात आहेत.

जगातील वाऱ्यांचे प्रवाह, चक्रीवादळाचे संभाव्य मार्ग आणि त्यांच्या तीव्रतेचे पूर्वानुमान अधिक अचूकतेने केले जाऊ शकते. त्यातून सावधगिरी बाळगता आल्याने जीवितहानी वाचविणे शक्य होत आहे.

मॉन्सूनचे आगमन :

-मॉन्सून दरवर्षी साधारण २० मे रोजी अंदमानला जोर धरतो.

-दहा मेच्या आधी पडलेला पाऊस मौसमी पावसात धरला जात नाही.

-केरळमधील त्रिवेंद्रमसहित पाच ठिकाणच्या पाऊसमान मोजण्याच्या केंद्रामध्ये सतत दोन दिवस कमीत कमी एक मि.मी. पाऊस पडला की त्याच्या दुसऱ्या दिवशी मोसमी पावसाचे आगमन झाले असे जाहीर करतात.

-मॉन्सून आगमनाची वर्दी दरवर्षी त्रिवेंद्रमच्या भारतातल्या पहिल्या वेधशाळेतून दिली जाते.

भारतातला मोसमी पाऊस कसा येतो?

मोसमी पावसाचे ढग भारतात दोन मार्गांनी येतात एक अरबी समुद्रावरचा आणि दुसरा बंगालच्या उपसागरातला. अरबी समुद्रावरचा मॉन्सून पश्‍चिम घाटाला अडतो आणि त्या ढगांतील जवळ जवळ सगळे बाष्प पावसाच्या रूपाने इथेच कोसळते. पुढे हे ढग पश्‍चिम घाटाच्या पलीकडे ओलांडून जातात, त्या वेळी त्यात अत्यल्प बाष्प असते.

बंगालच्या उपसागरातील शाखा ही अगदी त्याच वेळी कार्यरत होते आणि चेरापुंजीला पाऊस सुरू होतो. नंतर बंगालच्या उपसागराची शाखा हिमालयाला आदळून परत फिरते आणि पश्‍चिमेकडे वळते. पुढे हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात आणि गंगेच्या खोऱ्यात पाऊस सुरू होतो.

या वेळी गंगेच्या खोऱ्यातील पाऊस नेमका अरबी समुद्राच्या वाऱ्यापासून की बंगालच्या उपसागराच्या वाऱ्याचा, हे सांगणे अवघड होते. मोसमी पाऊस ही जागतिक प्रणाली आहे. सर्वच राष्ट्रांना मोसमी पावसाच्या अभ्यासात रस आहे, यासाठी वर्ल्ड मटेरिओलॉजिकल ऑर्गनायझेशन कार्यरत असून, त्यात १०८ देश सदस्य आहेत.

मोसमी वाऱ्यावर म्हणजेच आपल्या देशातील पावसावर कशाकशाचा प्रभाव पडतो, ते पाहू. तिबेटच्या पठाराचे तापणे, दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे, सहारा वाळवंटावरून वाहणारे वारे, सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि ब्ययनो आर्यस (अर्जेंटिना) अशा जगाच्या दोन टोकांच्या भागातील हवेचा दाब, अंटार्क्टिका खंडावरील हवामान, पॅसिफिक महासागरावरील तपमान व हवेचा दाब अशा अनेक बाबींचा प्रभाव पडतो. खरेतर ही यादी वर्षागणिक वाढतच आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस दहिवड (जि. नगर) व म्हसवड (जि. सातारा) येथे पडतो अशा नोंदी आहेत. तर सर्वांत जास्त पाऊस आंबोलीला (७०७० मि.मी.) पडतो. नगर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर हे कायम अवर्षणग्रस्त जिल्हे मानले जातात. धरणे आणि कालव्यांमुळे या जिल्ह्यांमध्ये बागायती क्षेत्र भरपूर असले तरीही पावसाच्या व्याख्येनुसार हा भाग अवर्षणग्रस्त आहे.

१) अवर्षण म्हणजे एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ सातत्याने सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अजिबात पाऊस न होणे. भारतीय वातावरण विज्ञान विभागाच्या व्याख्येनुसार सामान्य पर्जन्याच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त तूट असेल तर तीव्र अवर्षण आणि २५ ते ५० टक्के तूट असेल तर मध्यम अवर्षण आहे असे म्हणतात. जलसिंचन आयोगानुसार भारतात वार्षिक सरासरी पर्जन्य जर ७५ सेंटिमीटरपेक्षा कमी असेल तर तो प्रदेश अवर्षण प्रवण असतो.

२) एखाद्या भागात २४ तासांत ६४.५ ते ११४.५ मिलिमीटर पाऊस झाल्यास त्याला अतिवृष्टी असे संबोधले जाते.

Rain Update
Nagar Rain Damage : नगर जिल्ह्यात वादळाने मोठे नुकसान

गारपीट का आणि कशी होते?

गारपीट बहुतेक वेळा उन्हाळ्यातच होते. समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहत येतात आणि येताना बाष्प घेऊन येतात. त्यातून ढग तयार होतात. उन्हाळ्यात जमिनीलगतची तापलेली हवा या ढगांना वरवर ढकलत नेते. अधिक वर गेल्यामुळे तेथील गारव्यामुळे ढगातले थेंब थंड होत गोठून त्यांच्या गारा बनायला सुरुवात होते.

जमिनीपासून ९ ते १२ किलोमीटरच्या उंचीनंतर वाऱ्यांचे प्रवाह व घुसळण त्यापेक्षा खाली असलेल्या वाऱ्याच्या घुसळणीपेक्षा वेगळीच सुरू असते. हे गोठलेले थेंब (गारा) खालच्या आणि वरच्या दोन्ही वाऱ्यांच्या प्रवाहात पोहोचून ते खालच्या व वरच्या दोन्ही प्रवाहांत वाऱ्याबरोबरच घुसळले जातात.

त्या वेळी तिथले बाष्पाचे थर त्यांच्यावर सतत चढत राहतात. थंड हवेमुळे ते थरही गोठून त्यांचे पापुद्रे गोठलेल्या थेंबावर चढत जातात. त्यामुळे सुरुवातीला छोट्या असलेल्या गारा एकापेक्षा अधिक पापुद्र्यांनी बनलेल्या दिसतात. गारा आकाराने व वजनाने मोठ्या होत जातात. मग खालच्या हवेच्या दाबापेक्षा त्यांचे वजन जास्त झाले, की त्या जमिनीवर कोसळतात.

वरच्या थंड हवेतून जमिनीवर येण्यापूर्वी त्या गरम हवेतून प्रवास करताना काही प्रमाणात त्या वितळतातही. त्यामुळे जमिनीवर येताना पाणी व गारा एकत्र पडताना दिसतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com