Beekeeping : मधमाश्यांकडून शिकूया काही ‘मॅनेजमेंट टिप्स’

Honey Bee : मधमाशीच्या जीवनशैलीचा बारकाईने विचार केला तर तिच्यामध्ये अनेक कार्यकौशल्य दिसून येतात. या सर्वांचे व्यवस्थापन कशा प्रकारे होते याचा जवळून अभ्यास केला तर मधमाशी म्हणजे खरोखरच एक ‘मॅनेजमेंट गुरू’ आहे.
Honey Bee
Honey BeeAgrowon
Published on
Updated on

Beekeeping Business : मधमाशी तिचे कुटुंब वाढविण्यासाठी मध आणि परागकण हे खाद्य म्हणून गोळा करते आणि हे काम करत असताना पिकामध्ये परागीभवन होते हे इथपर्यंत ठीक आहे. परंतु मधमाशीच्या जीवनशैलीचा अत्यंत बारकाईने विचार केला, तर आपल्याला तिच्यामध्ये अनेक कार्यकौशल्य दिसून येतात.

मधमाशीच्या एका वसाहतीमध्ये ३० ते ५० हजार कामकरी माश्या, २०० ते ३०० नर माश्या आणि एकच राणीमाशी एकत्र राहून सर्वांच्या कामाचे विभाजन- नियोजन आणि प्रत्यक्ष कार्यकृती कशी होत असेल, ही अचंबित करणारी बाब आहे.

राणीमाशीचे आयुष्य दोन-तीन वर्षांचे असते. आयुष्यभर दररोज १००० ते १५०० फलित अंडे घालणे... म्हणजे विचार करा किती नियोजन करावे लागत असेल तिला तिच्या वसाहतीमधील मधमाश्या वाढविण्याचे. कामकरी मधमाशी ४० ते ५० दिवस जगते.

म्हणजे जेवढ्या मधमाश्या मरतात तेवढ्या मधमाश्या परत तयार करण्याचे काम आणि तेही नियोजन कशावरून, तर त्यांना खाण्यासाठी मध- परागकण आहेत की नाही त्यानुसार अंडी घालणे आणि नवीन कामकरी माश्या तयार करणे.

अर्थात, अंडी घालण्याचे काम राणीमाशी करत असली तरी अंडी किती आणि कधी घालावयाची हे कामकरी माश्या ठरवितात. म्हणजेच वरवर राणीमाशी वसाहतीमधील प्रमुख वाटत असली, तरी वसाहतीमध्ये ज्या बाबी होतात त्या सर्व ठरविल्या जातात कामकरी माश्यांद्वारे. अर्थात, तेथेही त्यांच्यामध्ये पूर्णपणे लोकशाही आणि बहुमताला मान्यता दिली जाते.

Honey Bee
Bee Conservation : शाश्‍वत पीक उत्पादकतेसाठी मधमाश्‍यांचे संवर्धन गरजेचे

कामकरी माश्या जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत आपल्या कामामध्ये वेळोवेळी बदल करत असतात. हा बदल मुख्यतः त्यांच्या शरीरामध्ये झालेला बदल, त्यांचा शरीरातील तयार झालेल्या ग्रंथी आणि कामाचा अनुभव यानुसार ते काम बदलत असतात. कामकरी माशी जन्माला आल्यानंतर पहिले दोन दिवस घर स्वच्छ ठेवण्याचे, तसेच वसाहतीमध्ये तापमान नियंत्रित करण्याचे काम करते.

नंतर तीन दिवस ती जुन्या अळ्यांना खाऊ घालण्याचे काम करते. ६ ते ११ दिवसांच्या कामकरी माश्या नवीन अळ्यांना खाद्य खाऊ घालण्याचे काम करतात. १२ दिवसांच्या कामकरी माश्यांमध्ये मेणग्रंथी तयार होत असल्यामुळे त्या घरातील कप्पे तयार करण्याचे काम तसेच घर दुरुस्त करणे आणि घरामध्ये बाहेरून आणलेले अन्न साठविण्याचे काम मधमाशी १८ दिवसांपर्यंत करते.

त्यानंतरचे चार दिवस म्हणजेच १८ ते २१ दिवसांपर्यंत मधमाशी आपल्या वसाहतीचे संरक्षण म्हणजेच ‘गार्ड बी’चे काम करते. तसेच गरजेनुसार जुन्या मधमाश्यांसोबत मध- परागकण गोळा करण्याचे काम करते. मधमाशी २१ दिवसांपासून ते अखेरच्या श्‍वासापर्यंत अन्न गोळा करण्याचे काम करते.

मधमाश्यांच्या कामाचे विभाजन त्यांच्या वयानुसार, तसेच त्यांच्या शरीरात वेळोवेळी तयार झालेल्या विविध ग्रंथींनुसार केलेले असले, तरीही गरजेनुसार त्या इतरही कामकरी मधमाश्यांना काम करू लागतात. मधमाश्या रात्रंदिवस म्हणजेच २४ तास काहीतरी कामात असतात.

दिवसा मधमाश्या आपल्याला फुलांवर दिसत असल्या तरीही रात्रीच्या वेळी त्यांचे काम वसाहतीमध्ये सुरू असते. मधमाश्यांच्या कामामध्ये सुसूत्रता येण्यासाठी त्यांच्याकडे संदेश देण्याच्या अनेक पद्धती आहेत. एकतर त्यांच्यामध्ये एकजूटपणा राहतो तो म्हणजे राणीमाश्‍यांद्वारे सोडला जात असलेल्या गंधामुळे - ज्याला क्वीन फेरोमोन असेही संबोधले जाते.

राणीमाशीच्या एका विशिष्ट वासामुळे वसाहतीमधील मधमाश्यांचे कार्य सुरू राहते. राणीमाशीचा वास कमी झाला तरी कामकरी माश्यांना समजते, की आता तिचे वय जास्त झाले आहे, ती आता जास्त अंडी देऊ शकणार नाही आणि त्यामुळे वसाहत वाढीसाठी तिचा फार उपयोग नाही. म्हणून नवीन राणीमाशी तयार करावी लागेल.

मधमाश्यांद्वारे अनेक प्रकारचे गंध सोडले जातात. जसे की शत्रूवर हल्ला करणे, खाद्यपदार्थ शोधणे आणि त्याचा मार्ग दाखविणे, राणीमाशीची काळजी घेणे, नवीन राणीमाशी तयार करणे, वसाहतीमध्ये उठाव करणे आणि नवीन जागा शोधून तेथे वसाहत स्थिर करणे यांसारख्या गंधामुळे मधमाश्यांच्या कामामध्ये सुसूत्रता येते.

Honey Bee
Save The Bee : मधमाश्या वाचवा अन् वाढवाही

मधमाश्यांना मध, पराग आणि पाणी हे मुख्य खाद्य शोधणे आणि ते गोळा करून त्यांच्या वसाहतीमध्ये घेऊन येण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. या कामाच्या वेळेत बचत व्हावी म्हणून मधमाशी विविध प्रकारचे नृत्य करून इतर कामकरी माश्यांना माहिती देतात. अर्थात, हे काम त्यांच्या वसाहतीमधील ‘स्काउट बी’ म्हणजेच सर्वेक्षण करणाऱ्‍या मधमाश्या करतात.

स्काउट बी मुख्यतः दोन प्रकारचे नृत्य करतात. गोल नृत्य करतात; त्यातून त्या कामकरी माश्यांना संदेश देतात, की चांगल्या प्रकारचे खाद्य १०० मीटरपेक्षा कमी अंतरावर आहे. परंतु ज्या वेळी खाद्य त्यापेक्षा जास्त अंतरावर असते, त्या वेळी मात्र त्या इंग्रजी आठ आकाराचे नृत्य करतात, ज्याला ‘वॅगल डान्स’ असे म्हटले जाते.

यातून त्या खाद्यपदार्थाची दिशा, अंतर आणि कशा प्रकारचे खाद्य आहे याची सविस्तर माहिती या नृत्यातून देतात. मधमाशीला आपण सर्वांत चांगला ‘सोशल इन्सेक्ट’ म्हणजेच ‘सामाजिक कीटक’ म्हणतो, त्यांची एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र राहून चांगले कार्य करण्यासाठी संदेश प्रणाली फारच विचार करण्यासारखी आहे.

मधमाश्यांच्या कार्यात सातत्य असते. म्हणजे एकदा का एका भागातील विशिष्ट फुलावरून खाद्य गोळा करायचे ठरले तर तेच करणार. बदल करताना त्यांच्या वसाहतीमध्ये सामूहिक निर्णय घ्यावा लागते. कामाच्या गुणवत्तेलाही फार महत्त्व देतात. त्यांनी तयार केलेल्या मधाच्या गुणवत्तेला कोणीही चॅलेंज करू शकत नाही.

कामाचा कितीही ताण येऊ दे, मधमाश्या गुणवत्तेमध्ये बदल करत नाहीत. वर्षभर फुलोरा उपलब्ध होत नाही, हंगामानुसार उपलब्ध होतो याचा विचार करून ते त्यांच्या वसाहतीमधील मधमाश्यांची संख्या ठरवितात तसेच खाद्याचा साठा करून ठेवतात. नर माश्यांचे काम झाल्यावर त्यांना घराच्या बाहेर काढून दिले जाते. कारण त्या खाद्य गोळा करू शकत नाही.

राणीमाशीची कार्यक्षमता कमी झाल्यावर नवीन राणीमाशी तयार करून जुन्या राणीमाशीला घराबाहेर काढले जाते. फुलांचा हंगाम सुरू होण्याआधीच मधमाश्या त्यांच्या वसाहतीमधील कामकरी माश्यांची संख्या वाढवितात; जेणेकरून जास्तीत जास्त खाद्यसाठा गोळा करता येईल.

एक किलो मध तयार करायला मधमाशीला चार लाख किलोमीटर प्रवास करावा लागतो. म्हणजेच पृथ्वीला दोन प्रदक्षिणा मारण्याएवढे अंतर. यासाठी ती २० ते २५ कि.मी. प्रतितास या वेगाने प्रवास करते आणि एक कोटी फुलांतून मकरंद गोळा करून त्यापासून एक किलो मध तयार करते.

म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणात ती परागीभवनाचेही काम करते. एवढीशी मधमाशी पण केवढे तिचे काम आणि तेही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने. खरंच, मधमाशी - जिला मॅनेजमेंट गुरू म्हटले जाते, शिकूया का आपण मॅनेजमेंटच्या काही टिप्स मधमाशीकडून!

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com