Save The Bee : मधमाश्या वाचवा अन् वाढवाही

Honey Bee Update : राज्याची वसाहती संगोपन क्षमता २० लाख असताना आपल्याकडे केवळ सात ते आठ हजारच वसाहती उपलब्ध आहेत. अशावेळी नियोजन पद्धतीने वसाहती वाढविण्याचे काम हाती घ्यावे लागेल.
Bee Conservation
Bee ConservationAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : आतापर्यंत आपण सोयाबीन, हरभऱ्याच्या वाढलेल्या गंज्या तसेच कडब्याच्या सुड्या पेटवून देण्याच्या प्रकाराबाबत आपण वाचले, ऐकले होते. शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे हे प्रकार आता यापुढे गेले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील मधमाशीपालन करणाऱ्या पांडुरंग मगर या युवकाच्या फॉर्ममध्ये मधमाश्यांच्या १२५ पेट्यांमध्ये अज्ञान व्यक्तीने कीटकनाशक टाकल्याने अडीच कोटी मधमाशांचा मृत्यू झाला आहे.

शेतकऱ्यांच्या सुड्या पेटवून देणारे अथवा मधमाश्या मारणारे हे विकृत मनोवृत्तीचे लोक खरे तर शेतकरी नसतातच. कारण कोणताही खरा शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचे असे नुकसान करणार नाही.

बुलडाणा जिल्ह्यात पारंपरिक पिकांबरोबर आता अनेक शेतकरी फळे-भाजीपाला घेत आहेत. कांदा बीजोत्पादनाचे प्लॉट पण या जिल्ह्यात अनेक शेतकरी करीत आहेत. परंतु मागील चार-पाच वर्षांपासून कांदा बीजोत्पादनाचे प्लॉट फुलोऱ्यात असताना सुद्धा त्यांच्याकडे मधमाश्या फिरकत नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकरी करीत आहेत.

मुळात मधमाश्या संगोपन हे अजूनही राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या गळी उतरलेले नाही. त्यात काही मध गोळा करणारे व्यावसायिक मधाच्या पोळ्यावर धूर सोडून पोळ्याला आग लावून मधमाश्या नष्ट करीत आहेत. कीडनाशकांच्या अनियंत्रित फवारण्यांना सुद्धा अनेक मधमाश्या नष्ट होत आहेत. राज्यात जंगलात वृक्षतोड सुरूच आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष राहिलेली नाहीत. या सर्वांच्या परिणाम स्वरूप मधमाश्यांचे प्रमाण राज्यात प्रचंड घटून परागसिंचनाच्या अभावी शेतीपिकांचे उत्पादन कमी होत आहे. अशावेळी एका शेतकऱ्याने संगोपन केलेल्या अडीच कोटी मधमाश्या कोणी जाणीवपूर्वक नष्ट करीत असेल, तर अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना शोधून त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे.

Bee Conservation
Beekeeping : महिला शेतकऱ्यांचा मधमाशी पालनासाठी राज्यांतर्गत अभ्यास दौरा

‘ज्या वेळी मधमाशी या जगातून संपेल त्यानंतर अवघ्या चार वर्षांनंतर मनुष्य जातीचे अस्तित्वच संपुष्टात येईल’ असा इशारा अल्बर्ट आइनस्टाइन यांनी आधीच दिला आहे. ‘एफएओ’च्या एका अहवालानुसार जगात मधमाश्यांचा नाश होत राहिला, तर १० वर्षांत अन्नधान्य उत्पादन एक तृतीअंशाने घटेल आणि याचा मोठा फटका भारताला बसणार आहे.

यावरून मधमाश्यांचे महत्त्व आपल्या लक्षात यायला हवे. भारतात घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या पिकांमध्ये संपूर्ण परागीभवन करण्यासाठी किमान ७० लाख मधमाश्यांच्या वसाहतींची गरज असल्याचा भारतीय कृषी संशोधन संस्थेचा अहवाल सांगतो. भारताची दोन कोटी मधमाश्यांच्या वसाहती पाळण्याची क्षमता आहे.

परंतु देशात केवळ २५-३० लाख मधमाश्यांच्या वसाहती पाळल्या जातात. आजही आपल्याकडे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इस्राईल, चीन अशा प्रगत देशांच्या तुलनेत फारच कमी मधमाश्यांच्या वसाहती आहेत. असे असताना हे देश मधमाश्या वाचविणे, वसाहती वाढविणे यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत तर आपल्याकडे अनेक कारणांनी मधमाश्या, त्यांच्या वसाहती नष्ट होत आहेत.

राज्याची वसाहती संगोपन क्षमता २० लाख असताना आपल्याकडे केवळ सात ते आठ हजारच वसाहती उपलब्ध आहेत. अशावेळी नियोजन पद्धतीने वसाहती वाढविण्याचे काम हाती घ्यावे लागेल. मध आणि त्या आनुषंगिक इतर उत्पादनांबरोबर पिकांच्या परागीभवनासाठी मधमाश्यापालन ही संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजवावी

लागेल. याकरिता गाव, तालुका, जिल्हास्तरावर मधमाश्यांचे शेतीत महत्त्व, त्यांचे संगोपन, प्रजनन, वसाहती वाढविणे याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना द्यावे लागेल. पीक उत्पादनवाढीत मधमाश्यांचे महत्त्व शेतकऱ्यांना पटल्यावर भाडेतत्त्वावर मधमाश्या वसाहती देण्याचा नवा व्यवसाय राज्याच्या ग्रामीण भागात उभा राहू शकतो.

मधमाश्यांना उत्पादनवाढीची निविष्ठा म्हणून राजमान्यता मिळाली आहे. परंतु याबाबत माहितीचा अभावाने त्या नष्ट केल्या जात आहेत तसेच ही निविष्ठा उपलब्ध होत नसल्याने वापरही वाढताना दिसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com