Gender Equality : समानतेचं बीज अंगणी वाढू दे!

समानतेचा विचार हा प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी अवतरत असतो. या विचाराला वर्तनातून अधिष्ठान दिले, की मग त्याचे बीज रुजू लागते, अंकुरू लागते.
Gender Equality
Gender EqualityAgrowon

डॉ. कैलास दौंड, ९८५०६०८६११

समानतेचा विचार (Equality) हा प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी अवतरत असतो. या विचाराला वर्तनातून अधिष्ठान दिले, की मग त्याचे बीज रुजू लागते, अंकुरू लागते. सामाजिक समानतेच्या (Social Equality) विचारात एकापेक्षा अधिक व्यक्तींचा विचार केलेला असतो.

जी समानता प्रत्येकाला हवीशी वाटते ती दुसऱ्याला लाभावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच असे नाही. त्यामुळे असमानता आणि भेदभावाचा उगम होतो. हे समानतेचे बीज प्रत्येकाच्या अंगणात रुजणे यासारखी सुंदर गोष्ट नाही.

Gender Equality
Indian Agriculture : विहीर

एकाच घरात वाढणाऱ्या मुलगी आणि मुलगा यात फरक करून समानतेच्या तत्त्वाला सोईस्कररीत्या बाजूला टाकलेलेही कधी कधी पाहायला मिळते. विसाव्या शतकाच्या अखेरीस गर्भजल निदान करण्याचे व स्त्री भ्रूणाची वाट लावण्याचे काम काही कुटुंबातून झाले.

त्याचे सामाजिक दुष्परिणाम आजघडीला अनुभवावयास मिळत असल्याचे आपण पाहतो आहोत. काही दिवसांपूर्वी सोलापूर येथे विवाहइच्छुक उपवर तरुणांचा वधू मिळत नसल्याने निघालेला मोर्चा यावर प्रकाश टाकायला पुरेसा आहे. हा सामाजिक प्रश्‍न काही एकाएकी निर्माण झालेला नाही.

तर मुलगा - मुलगी किंवा स्त्री -पुरुष असमानतेला मोठाच वारसा असल्याचे दिसते. यासंदर्भात त्या त्या काळातील पुरुषांनी यावर किती विचार

केला होता हे माहिती नाही. मात्र घराघरांतील स्त्रियांना समाज समजून घेण्याचे उत्तम भान असते. त्यांचे निरीक्षण आणि आकलन एकदम यथार्थ असे.

याचे प्रतिबिंब पारंपरिक स्रीगीतात उमटलेले पाहावयास मिळते. मुलींनाही शिक्षण, आरोग्य, आहार-विहार, संधी या विषयी समानता असली पाहिजे ही एक नैसर्गिक भावना आहे.

स्वतःला परिपूर्ण समानता मिळत नसतांनाही स्त्रियांनी सांस्कृतिक हक्काचा मात्र उपभोग घेतला. त्यामुळे सांस्कृतिक जतन आणि संवर्धन झाले.

विविध सण, उत्सवातून त्यातील गीतांमधून, जात्यावरील ओव्यांमधून, भलरी मधून त्या व्यक्त होत राहिल्या. त्यासाठी त्यांनी रामायण, महाभारतादी महाकाव्यातील कथांचा आधार घेतला.

Gender Equality
Indian Agriculture : आभाळ मायेची सय

स्वतःचा काहीही दोष नसताना केवळ पती वनवासाला चालले म्हणून त्यांच्या सोबत वनवासाला जाणारी, अनेक संकटे झेलणारी सीतामाई स्त्रियांना खूप जवळची वाटते. त्याचे मूळ एक स्त्री म्हणून वाट्याला येणाऱ्या जगण्या भोगण्यामध्ये आहे. सीतामाईच्या जन्माविषयीची लोकगीतातील एक ओवी तिच्या सहानुभूतीचा हळवा कोपरा जागा करते.

आकाशी पाळणा खाली धरती माउली

नांगराच्या ताशी सीता जनकाला गं घावली.

अशा सीतामाईचे त्या काळाच्या प्रथेप्रमाणे बालवयातच स्वयंवर होते. आजही बालविवाह पूर्णपणे थांबलेले नाहीत. अशिक्षित, कष्टकरी लोकांत हे प्रमाण मोठे आहे. अधूनमधून असे विवाह थांबवल्याच्या बातम्याही येत असतात. बालविवाहाचेही एका गीतात प्रतिबिंब पडले आहे.

अशी सीताबाई म्हणं मला कशाची माउली

पाच वर्षाचीच केली रामाच्या गं हावाली.

आई हे सर्जनाचे आणि वात्सल्याचे प्रतीक! मातृसुख सर्वांना लाभावे अशी सकल समाजाची इच्छा असते. आपल्या लेकराच्या वाट्याला दुःखमय प्रसंग येऊ नयेत असे तिला सदैव वाटत असते. अशी आई नसलेल्या लेकी किंवा लेक पाहिल्यावर भावनाप्रधान स्त्री मनाला सीतामाईची आठवण होते.

कुणीतरी मायेचे प्रत्येकाला लाभावे, इतकेच कशाला, आपणही सहवासातील प्रत्येकाला माया देण्याचा प्रयत्न करावा हा साधा माणूसभाव. त्यामुळेच सीतामाईच्या वनवासासंदर्भातील अनेक गाणी लोकमानसात प्रचलित होती.

त्यातून साहजिकच आपल्या व्यक्तिगत जीवनात येणाऱ्या प्रसंगांना, दुःखांना सामोरे जाण्याचे बळ मिळे, मानसिक शक्तीचे संवर्धन होई.

सीतेला वनवास, तुमची आमची काय कथा देवमाणसाच्या घरी तेव्हा कली शिरला होता. संकटे येतात आणि त्याला तोंड दिले की ती जातातही. दरम्यानच्या काळात जपायचे असते ते नैतिक मूल्यात्मक भान. चांगुलपणा नैतिकता कधीही सोडायची नसते.

रावणाची मंदोदरी रावणाला शिकवी ग्यान

सीता घालावी नेऊन त्यात नाही लहानपण.

आजही स्त्रियांचा आपल्या अपत्यांवर, घरातल्यांवर मूल्य संस्कार रुजविण्यात मोठा वाटा आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे तिला कुटुंबाला आर्थिक हातभारही लावणे

क्रमप्राप्त झाले आहे. मात्र तिच्या वाट्याला शोषणरहित, अन्यायरहित, निर्भय जगणे येते का? ते यावे यासाठी आपण सर्वच

समाजघटक देणे लागतो. दीड दशकापूर्वी एका कवितेच्या शेवटी मी पुढील ओळी लिहिल्या होत्या.

सीता भुईची पोरगी रोज भुईतच जाते

साऱ्या साऱ्या जैन्हामदी, कोण तिचा वाली होते.

समानतेचं बीज अंगणी वाढावे यासाठी आपण सारे यत्न करूयात. समानतेचं बीज अंगणी वाढू देत! अशी प्रार्थनाही करूया.

(लेखक ग्रामीण कवी व कादंबरीकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com