Leopard Terror : जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम

Leopard Attack : जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी हवालदिल झाले असून, सलग दोन दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
Leopard Terror
Leopard TerrorAgrowon

Pune News : जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी हवालदिल झाले असून, सलग दोन दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलासह एका महिलेचा समावेश आहे. सततच्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत.

जत्रेसाठी काळवाडी (ता.जुन्नर) या मामाच्या गावी आलेल्या रूद्र फाफाळे (वय ८ ) हा मुलगा बुधवारी (ता.८) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा ठार झाला.

ही घटना ताजी असतानाच पिंपरी पेंढार (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी (ता.१०) सकाळी बाजरी पिकाचे राखण करीत बसलेल्या नानुबाई कडाळे (वय ४५) या महिलेवर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. या दोन घटनांमुळे तालुक्यातील शेतकरी आणि जनता प्रचंड दहशतीखाली असून, वन विभागावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Leopard Terror
Leopard Attack : पन्हाळा तालुक्यात बिबट्याचा वावर, जनावरांवर हल्ले सुरूच

जुन्नर तालुक्यात नरभक्षक बनलेल्या बिबट्यांकडून लोकांचे जीव घेण्याचे सत्र काही थांबण्याचे चिन्ह दिसत नसून शुक्रवारी सकाळी पुन्हा पिंपरी पेंढार या गावात बाजरीची राखण करणाऱ्या महिलेला बिबट्याने ठार केल्याने जनता भयभीत झाली असून, वन खात्यावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी शिरोली (ता.जुन्नर) येथे धनगरवाड्यावर बिबट्याच्या हल्ल्यात आई वडिलांच्या कुशीत झोपलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना पुन्हा वरील दोन घडल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. सर्व बिबटे पकडण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पिंपळवंडीत बिबट्या जेरबंद

पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथील लेंडेस्थळ या ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार दिवसांपूर्वी लेंडेस्थळ येथील अश्विनी हुलवळे (वय २३) ही तरुणी शेतात काम करीत असताना सायंकाळच्या वेळेस बिबट्याने तिच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते.

या घटनेनंतर वनविभागाच्या वतीने या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले होते. यातील एका पिंजऱ्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला. सदर बिबट्या सात ते आठ वर्षांचा नर बिबट आहे. त्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलवले असल्याची माहिती वनपाल संतोष साळुंखे यांनी दिली.

Leopard Terror
Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

बिबट्या पकडण्यासाठी ३० पिंजरे

पिंपळवंडी, काळवाडी, पिंपरी पेंढार या तीन गावांमध्ये बिबट्यांना पकडण्यासाठी ३० पिंजरे लावण्यात आलेले आहेत. अजून पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल. बिबट्यांना पकडण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी याठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. बिबट्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वनविभागाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, असे जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.

आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ः अजित पवार

जुन्नर तालुक्यात बिबट हल्ल्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तसेच पशुधनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांना दिवसा थ्री-फेज लाइट मिळावी व माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे विस्तारीकरण करावे, अशी मागणी माजी आमदार शरद सोनवणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथील भेटीत केली आहे.

सोनवणे यांनी शुक्रवारी (ता.१०) उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली. या वेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सकारात्मक आश्वासन पवार यांनी दिले असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com