Millet : भरडधान्यांचे वाढते महत्त्व जाणून घ्या

संयुक्त राष्ट्रांनी साल २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ संयुक्त राष्ट्रांनी साजरे करण्याचे ठरवले आहे. पोषकधान्य गटात मुख्यत्वे समावेश आहे तो भरडधान्य अर्थात मिलेटचा. अंतरराष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषणामध्ये भरडधान्यांचा असणारा सहभाग याकडे लक्ष वेधणे, भरडधान्य उत्पादनांची शाश्‍वत वाढ करणे व विविध स्तरांवर (प्रादेशिक-जागतिक) भरडधान्यांची मागणी वाढविण्यासाठी प्रचार-प्रसार करणे या उद्देशाने हे वर्ष साजरे केले जाणार आहे.
Millet
MilletAgrowon

संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ (International Millet Year) म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. यामध्ये भारताचा मोठा सहभाग आहे. भरडधान्य उत्पादनात (Millet Production) भारताचा वाटा आशिया खंडात ८० टक्के तर एकूण जागतिक उत्पादनात (Global Millet Production) २० टक्के आहे. यानिमित्ताने भरडधान्य म्हणजे काय, त्याचे विविध पैलू आणि भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नवीन संधी याचा ऊहापोह आपण करणार आहोत.

Millet
Pearl millet: बाजरीच्या धनशक्ती वाणासाठी बोरलॉग पुरस्कार

भरडधान्य व त्याचे प्रकार

निसर्गशेतीसाठी उत्तम पीक असलेले, कमी पाण्याची आवश्यकता असणारे मिलेट हे निसर्गस्नेही पिके आहेत. पृथ्वीच्या व माणसांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेणारी ही जादुई धान्य समजून घेणे खूप रोचक आहे. गहू व तांदूळ सोडून इतर जे धान्य नियमित आपल्या आहारात वापरले जाते त्याला आपण भरडधान्य असे म्हणू शकतो. ज्वारी, बाजरी, नाचणी ही भरडधान्य आपण जसेच्या तसे पीठ करून खाऊ शकतो तर वरई, राळा, बर्टी, कोदो, डेंगळी ही इतर भरडधान्य त्यावरील असलेली साल बाजूला केल्यावर खाण्यायोग्य होतात. जसे तांदळाला साळ असते तशीच या बारीक धान्यांना साळ आवरण असते. पूर्वी उखळात कांडून किंवा मातीच्या जात्यावर भरडून हे आवरण काढले जाई. आता ते काम मशिनद्वारे केले जाते. अशा साल काढलेल्या भरडधान्यांचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात वापर केला जातो.

एकूण ११ प्रकारचे भरडधान्य आतापर्यंत या गटात समाविष्ट आहेत. सध्या त्यातील ९ भारतीय मिलेटची नावे व प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

१.ज्वारी (Sorghum) ः ज्वारी हे सर्वदूर घेतले जाणारे पीक आहे. विशेषतः कोरडवाहू भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महराष्ट्रातील सोलापूर, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तर पश्‍चिम महाराष्ट्रातील डोंगर भागात देखील याचे उत्पादन कमी-अधिक प्रमाणात होते. यात सफेद, पिवळी, लाल अशा विविध रंगछटा असणारी ज्वारी पाहावयास मिळते.

२. बाजरी (Pearl milllet) ः कोरडवाहू जमिनीत अगदी कमी पाण्यावर येणारे बाजरीचे पीक पूर्वीपासून घेतले जात होते. काळ्या मातीत याची गोडी काही वेगळीच असते. यात देखील हिरवा, लाल, तपकिरी असे मुख्य रंग व त्यांच्या छटा दिसतात.

३. नाचणी (Finger millet) ः नाचणीला आधीपासूनच सुपरफूड म्हणून मान्यता मिळालेली आहे. पूर्वी सर्व भागांत होणारी नाचणी आता फक्त आदिवासी डोंगरभाग व कोकणात केली जाते. यात सफेद व लाल-केशरी व मरून-लाल अशा रंगत येते.

४. वरई (Little millet) ः आजही आदिवासी व कोकण भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. डोंगर शेतीतील हे मुख्य नगदी पीक आहे. यात कमी दिवसांच्या ते जास्त दिवसांच्या अशा विविध जाती आहेत.

५. वरी (Proso millet) ः महाराष्ट्रातील काही भागांत वरईसारखेच दिसणारे हे धान्य पिकवले जाते. दिसायला हे अगदी वरईसारखेच असले, तरी त्याचे गुणधर्म व पोषकमूल्य भिन्न आहेत.

६. राळा/ भादली / कांग (Foxtail millet) ः पूर्वी सर्व भागात राळा पिकवला जाई. राळ्याचा भात खाण्यासाठी चविष्ट लागतो. खानदेशात तर पितरांना राळ्याचीच खीर करण्याची परंपरा होती. यात देखील विविध रंग असतात.

७. कोदो/ कोद्रा/ हरिक (kodo millet) ः एकावर एक असे सात थर असणारे हे धान्य. याचे वैशिष्ट्य म्हणजे आवरण काढले नाही तर हे अनेक वर्ष ठेवता येते. याची शेती बऱ्याच प्रमाणात गडचिरोली, धुळे आणि कोकणात केली जाते.

८. बर्टी (Barnyard millet ) ः सर्वांत कमी दिवसांत पक्व होणारे हे धान्य. हे देखील अनेक रंगांत उपलब्ध असते. कोरडवाहू व अतिपाऊस असणाऱ्या भागात देखील हे उत्तम येते. खाण्यासाठी चविष्ट व पौष्टिक असे हे धान्य आहे.

९. ब्राऊनटोप मिलेट (Browntop millet) ः मूळचे भारतीय असलेले हे मिलेट धान्य सध्यातरी फक्त दक्षिण भारतात घेतले जात आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे धान्य खाल्ल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही. भरपूर ऊर्जा यातून मिळते.

Millet
Pearl millet: बाजरीच्या धनशक्ती वाणासाठी बोरलॉग पुरस्कार

मिलेट महत्त्वाचे का?

ही सर्व धान्ये कमी ते जास्त पावसाच्या प्रदेशात, हलक्या ते कमी प्रतीच्या जमिनीत येतात. मिलेट हे वापरात असलेल्या गहू, तांदूळ या नियमित धान्यासाठी एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे. भात आणि गहू ही धान्य पिके आपल्याला अन्नसुरक्षा देतात. परंतु मिलेट हे धान्य देशाला अन्नसुरक्षेबरोबरच (food security) पोषणसुरक्षा (Nutrition Security), आरोग्य सुरक्षा (health security), शेतकऱ्यांच्या उपजीविकेची सुरक्षा (Livelihood security), जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा (Fodder security), पर्यावरण संतुलन आणि संवर्धनाची सुरक्षा (Ecological security) पुरवते.

अन्न सुरक्षा

केवळ भात आणि गहू या दोनच धान्य पिकांवर अन्नासाठी अवलंबून राहण्यापेक्षा, बदलत्या तापमानात तग धरू शकणारे मिलेट हे नक्कीच भारताची भूक भागवू शकेल.

पोषण सुरक्षा

जागतिक ‘फूड रेटिंग सिस्टीम’मध्ये मिलेटला ‘उत्तम’ असे मूल्यांकन देण्यात आले आहे. शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषकतत्त्वे व सूक्षम पोषण तत्त्वे यांचे प्रमाण भरडधान्यात योग्य आहे. यामध्ये असणारे कॉपर, फॉस्फरस, मॅंगेनीज, मॅग्नेशिअम हे सूक्ष्म अन्नघटकही महत्त्वाचे आहेत. याशिवाय कर्बोदके आणि ऊर्जा यांचे प्रमाण जास्त आहे. आज आपल्याकडे रक्तक्षय असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यासाठीही नाचणीसारखे मिलेट धान्य सर्वोत्तम आहार आहे.

आरोग्य सुरक्षा

मिलेट हे ग्लुटेन फ्री आहे. तसेच या पिकाच्या वाढीसाठी विशेष रासायनिक खते द्यावी लागत नाही. आरोग्यासाठी ते उत्तम अन्न आहे. विशेषतः हृदयविकार दूर ठेवते, कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करते. तसेच मधुमेह असणाऱ्यांसाठी मिलेट खाणे हे अतिशय उपयुक्त ठरते. तसेच अनेक आजारांमध्ये पचनशक्ती कमी झालेली असताना देखील याचे सेवन उपयुक्त ठरू शकते.

जनावरांच्या चाऱ्याची सुरक्षा

या धान्यांच्या काडाचा/ कडब्याचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो. ज्यात मोठ्या प्रमाणात सेल्युलोज व इतर पदार्थ असतात. हा चारा जनावरे आवडीने खातात. त्यामुळे काही भागांत तर जनावरांच्या चाऱ्यासाठीही ही पिके घेतली जातात.

उपजीविकेची सुरक्षा

ज्या भागात शेतीला पाण्याची सोय नाही अशा कोरडवाहू, हलक्या जमिनीत मिलेट या पिकांचे चांगले उत्पन्न मिळते. याला पाणी कमी लागते, खते लागत नाहीत. तसेच शेतकऱ्याला हे पीक हमखास उत्पन्न मिळवून देते. हे पीक कोणत्याही हवामानात येते. या पिकासोबत शेतकरी कडधान्य, तेलबिया, भाजीपाला अशीही पिके घेतात, जे त्यांना उपजीविकेची शाश्‍वती मिळवून देतात.

पर्यावरणीय सुरक्षा

ज्या शेतात मिलेट घेतले जाते तेथे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो. इतर पीकविविधता जपली जाते. काही पक्ष्यांचे हे आवडते खाद्य आहे. तसेच ज्या शेतात मिलेट घेतले जाते, तेथे अनेक रानभाज्या व इतर वनस्पतींची वाढ होते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

मिलेट संवर्धनासाठी ग्राहकांची भूमिका महत्त्वाची

बदलती शेती, शहरीकरण आणि बदलती जीवनशैली यामुळे लोकांच्या खानपानाच्या सवयीही बऱ्याच प्रमाणात बदलल्या आहेत. वेळेअभावी बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याकडे कल वाढतच चालला आहे. साहजिकच बाजारात जे उपलब्ध असेल ते खाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय राहत नाही. परंतु सर्वांत झटपट उपलब्ध असणारे मिलेट व त्यापासून बनवलेले अनेक पौष्टिक पदार्थ आपल्याला आरोग्यायी चविष्ट पर्याय आहेत. जोपर्यंत मिलेट आपल्या जेवणाच्या ताटात आले तरच ते शेतात उगवले जाईल. यासाठी मिलेट कसे खायचे, कोठे उपलब्ध होतील असे अनेक प्रश्‍न आपल्याला पडले असतील. त्याबद्दल पुढे लिहीनच.

शेतकऱ्यांचा होणारा फायदा

ज्वारी, बाजरी हे भरडधान्य कोरडवाहू भागात उत्तम येते. त्यामुळे जेथे शेती फक्त पावसावर अवलंबून आहे व कमी पाऊस पडतो तेथे हे पीक उत्तम येते. शिवाय ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी ही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते म्हणून बाजारपेठदेखील उपलब्ध आहे. ज्वारी, बाजरी सोडून इतर भरडधान्य हे आदिवासी भागातच पिकवले जाते. वाढत्या प्रचार-प्रसारामुळे त्यांना बाजारात मागणी वाढत जाणार आहे. शिवाय या शेतकऱ्यांना त्यामुळे या सर्व धान्यांना योग्य भावदेखील उपलब्ध होत आहे. डोंगर भागातील शेतकऱ्यांनी जतन केलेल्या या धन्यांना मिलेट वर्ष २०२३ मुले जागतिक व्यासपीठावर मान्यता मिळत आहे. एकंदरच मिलेट पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना यातून निर्यातीच्या संधी देखील वाढू शकतात.

----------

ranvanvala@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com