
राहुल वडघुले
Ginger Crop Disease Management : आले हे महत्त्वाचे मसाल्याचे पीक आहे. आले पिकात बुरशीजन्य, जिवाणूजन्य, विषाणूजन्य रोगांचा तसेच सूत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. यामध्ये विशेषतः पानावरील ठिपके, कंदसड इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. कं
द सड ही वेगवेगळ्या कारणांनी दिसून येते. मुख्यतः जिवाणू, बुरशी आणि सूत्रकृमी यांचा समावेश असतो. आजच्या लेखात पानावरील ठिपके या रोगाविषयी माहिती घेऊया.
रोगाची माहिती
रोगाचे नाव ः पानावरील ठिपका रोग
शास्त्रीय नाव ः फायलोस्टिकटा झिंगीबेरी (Phyllosticta zingiberi)
रोगाचे कारण ः बुरशीच्या प्रादुर्भाव.
यजमान पिके ः फायलोस्टीकटा झिंगीबेरी ही बुरशी फक्त आले पिकामध्ये रोग निर्माण करते. परंतु फायलोस्टीकटा जीनसच्या इतर प्रजाती लिंबू, केळी, द्राक्ष या पिकांवर रोग निर्माण करतात.
नुकसान ः पानातील हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा येते. त्यामुळे पिकाचे सुमारे १३ ते ६६ टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
लागण होण्यास लागणारा अवधी ः पाच ते सहा महिन्यांनी, २ आठवड्याच्या पानांवर हा रोग प्रथम दिसून येतो. नंतर तो जुन्या पानांवर पण पसरतो.
पोषक वातावरण
रोगाच्या वाढीसाठी १० ते ३२ अंश सेल्सिअस तापमान व ८८ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आर्द्रता आवश्यक असते. तापमान ३५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आणि ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर रोगाची वाढ होत नाही.
रोग कसा निर्माण होतो
रोगाचा प्रसार बियाणे आणि जमिनीतून होतो. मागील वर्षीच्या पीक अवशेष किंवा इतर सेंद्रिय पदार्थ किंवा जमिनीमध्ये ही बुरशी पिकनीडीयाच्या स्वरूपात किंवा तंतुंच्या रूपात जिवंत राहते. तंतू आणि पिकनीडीया सुमारे १४ महिने जिवंत राहू शकतात. तसेच बीजाणू जमिनीखाली ६ महिने जिवंत राहतात.
पोषक वातावरण आणि यजमान उपलब्ध झाल्यानंतर पिकनीडीया मधील बीजाणूचे अंकुरण (Germination) होते. बिजाणूंपासून निघणारी जर्म ट्यूब पर्णरंध्राच्या मार्फत पानामध्ये प्रवेश करतात. आणि रोग निर्माण करतात.
याला ‘प्राथमिक लागण’ (Primary Infection) म्हणतात. त्यानंतर बुरशी पुन्हा पिक्निडियामध्ये बीजाणू तयार करते. हे बीजाणूनंतर पाणी, हवा या मार्फत दुसऱ्या झाडांवर जाऊन रोग निर्माण करतात. याला ‘दुय्यम लागण’ म्हणतात. सावलीत असलेल्या झाडांवर रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झालेला दिसून येतो.
नियंत्रणाचे उपाय
जमिनीची खोल नांगरट करावी.
लागवडीसाठी रोगविरहित बेणे वापरावे.
लागवडीपूर्वी बेण्यास शिफारशीप्रमाणे रासायनिक किंवा जैविक बेणेप्रक्रिया अवश्य करावी.
जैविक बुरशीनाशके जसे की ट्रायकोडर्मा व्हिरीडी यांचा पीक लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात फवारणी किंवा धुरळणीच्या स्वरूपात वापर करावा.
शेणखतामध्ये या जैविक बुरशीचा वापर करावा.
शेडनेटचा वापर करणे फायदेशीर ठरते.
पिकाचे सातत्याने निरिक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास, त्वरित उपाययोजना कराव्यात.
लक्षणे
सुरुवातीला नवीन पानांवर लहान लंब गोलाकार ठिपके दिसतात. नंतर ठिपक्यांचा आकार मोठा होतो. ठिपक्यांच्या आतील भाग अतिशय पातळ आणि रंगहीन होतो. आतील पानाचा भाग गळून आतमध्ये छिद्र पडते.
ठिपक्यांची कडा सुरुवातीला भगव्या रंगाची, तर नंतर गर्द तपकिरी रंगाची दिसते. त्या बाजूचा भाग पिवळा झालेला दिसतो.
आतील रंगहीन भाग जवळून पाहिल्यावर त्यावर बुरशीचे काळ्या रंगाचे पिकनीडीया (pycnidia) तयार झालेल्या दिसतात. यामध्ये बीजाणू असतात.
या ठिपक्यांवर पांढरी बुरशी वाढलेली दिसते. एक किंवा अनेक ठिपके एकमेकांमध्ये मिसळतात आणि पानाचा मोठा भाग ठिपक्यांनी ग्रस्त होऊन नंतर पिवळा पडतो. नंतर तो वाळून जातो.
सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते?
सूक्ष्मदर्शिकेखाली या रोगाचे पिक्निडिया आणि बीजाणू स्पष्टपणे पाहू शकतो. पिक्निडिया हे गोलाकार व काळ्या रंगाचे असतात. बीजाणू आकाराने लंब गोलाकार ते आयताकार, एकपेशीय व रंगहीन असतात. बीजाणूच्या दोन्ही टोकांकडे एक लहान आकाराचा ठिपका दिसतो. त्याला Big guttulate असे म्हणतात.
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी. मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.