Pune News : काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसने नागपुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमी येथे आदरांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी ‘संविधान सन्मान संमेलना’ला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत घेऊन भाजपवर जोरदार निशाना साधला. देशातील शेतकऱ्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांना जेलमध्ये टाकले जाते, अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, आ. अभिजीत वंजारी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधी म्हणाले की, सरकारच्या विविध संस्था या संविधानातूनच तयार झाल्या असून निवडणूक आयोगही यातीलच एक आहे. पण भाजपचे लोक संविधानावर हल्ला करत असून ते भारताच्या आवाजावर हल्ला करत आहेत.
यावेळी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकण्यावरून सरकारवर राहुल गांधी यांनी हल्लाबोल करताना, देशातील शेतकऱ्यांवर हे सरकार अन्याय करत आहे. कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांना थेट जेलमध्ये टाकले जाते. पण करोडो रुपये कर्ज घेऊन न फेडणारे परदेशात पळन जातात. अशांना हे उद्योगपती म्हणतात, असा टोला राहुल गांधी लगावला आहे. यावेळी राहूल गांधी यांनी आपल्या भाषणात शिशुमंदिरासाठी एवढा पैसा कुठून येतो असा सवाल उपस्थित करताना, हा पैसा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, नॅशनल हायवे, अदानी व अंबानींचा असल्याचे म्हटले आहे. तर सध्या देश पाच टक्केच लोक चालवत असल्याचेही ते म्हणाले.
देशात ९० टक्के लोकांवर दररोज अन्याय होत असून याविरोधात आपली लढाई आहे. हेच ९० टक्के लोक जेल, मनरेगा या ठिकाणी दिसतात. हा अन्याय दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणनेची मागणी आम्ही करत आहोत. पण या मागणीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची झोप उडाली आहे. ही मागणी केल्याने मोदी माझ्यावर देश तोडण्याची भाषा करतो, असा आरोप करतात. यावर आरएसएसदेखील मंथन करत आहे. आरएसएसने कोणतीही भूमिका घेतली तरीही जातनिहाय जनगणना करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादासुद्धा हटवली जाईल, असा निर्धार राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.