Mumbai News : देशात गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्री कामापेक्षा शोबाजी करत असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. २६० अनव्ये प्रस्तावावर बोलताना सरकारने केलेल्या विविध घोषणांवर दानवे यांनी निशाणा साधला.
देशात एकूण ३५ लाख ६१ हजार ३७९ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. हा दर १०.२ % इतका असून महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आहे. देशात स्त्री अत्याचाराचे ४ लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले असून ४५ हजार गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत. अॅसिड हल्ले, सायबर गुन्ह्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. एकीकडे सरकारने लाडकी बहीण योजना आणली मात्र प्रत्यक्षात महिलांचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप दानवे यांनी केला.
मुख्यमंत्र्यांची शोबाजी
दानवे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा बुलडोझर फक्त काही भागात चालतो ते कामापेक्षा शोबाजी करत असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे सरकार मोठमोठ्या घोषणा सर्वसामान्यांसाठी नव्हे कंत्राटदारांच्या हितासाठी करत असल्याची टीकाही दानवे यांनी केली आहे.
सरकार राज्याच्या विकासासाठी काम करत नसून स्वार्थ आणि भ्रष्टाचारासाठी काम करत असल्याचे दिसते. गृह विभाग हे विशिष्ट अधिकारी, कंत्राटदार यांच्यासाठी काम करते का की प्रस्ताव समोर ठेवून काम करते, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. या विभागातील अधिकारी जनतेच्या पैशाचा अपव्यय करतात आणि राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम करतात अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.
मोपलवारांना मुदतवाढ का?
समृद्धी महामार्गाच्या कामात राधेश्याम मोपलवार या अधिकाऱ्याला मुदतवाढ का दिली गेली? मूठभर लोकांच्या समृद्धीसाठी अलिबाग, सिंधुदुर्ग कॉरीडोअरचे काम हाती घेतले गेले. या रस्ताच्या विकासाच्या नावाखाली भूसंपादन करून चढ्या दराने जमिनी विकायचा व्यवसाय सुरु झाला आहे.
कॅगने संजय मुखर्जी यांच्यावर ठपका ठेवला असताना सिडको, एमएमआरडीए सारख्या ठिकाणी त्यांची नेमणूक का केली. हे अधिकारी सरकारी जावई असल्यासारखे वागत असून त्यांना मराठवाडयात पोस्टिंग का देत नाही, असा सवाल दानवेंनी सभागृहात उपस्थित केला. सरकारच्या विकासाच्या घोषणा या फक्त मुंबई, पुणे शहरापर्यंत मर्यादित असून ग्रामीण भागाचाही विकासाच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे दानवे म्हणाले.
घोसाळकर हत्येचा तपास संथगतीने
नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात संथगतीने सुरू असलेला तपास,ग्रामीण भागात अवैधपणे सुरू असलेली गर्भलिंग चाचणी व गर्भपाताच्या घटना, शिरुर रांजणगाव येथे ३५० रोहित्रांची झालेली चोरी, पोलीस विभागात सुरू असलेले ई चलनमधील गैरव्यवहार ,राज्याचे मद्य धोरण, बांधकाम विभागातील कोट्यवधी रुपयांच्या निविदा, विविध औद्योगिक वसाहतीत झालेले स्फोट, ऊर्जा विभागातील सबसिडीच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार, क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांची भ्रष्ट कारकीर्द प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृह विभागावर ताशेरे ओढले.
सरकारने अर्थसंकल्पात अल्पसंख्याक विभागाला कोणत्याही सुविधा दिल्या नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.राज्य सरकारचे माहिती व जनसंपर्क विभाग प्रसिद्धीसाठी माणस नेमणार आहे. मात्र तिथे ब्रिजेश सिंग हे आयपीएस अधिकारी उच्च पदावर आहे. पोलिसांनी पोलीस खात्यात काम करावं. तेथे काम करण्यासाठी माहिती व प्रसारण खात्याचे लोक नाही का असा सवाल दानवे यांनी सरकारला विचारला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.