
Latur News : मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राज्यात राबविली जात आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेच्या अंमलबजावणीत लातूर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे.
सात महिन्यांत जिल्ह्यात ३६ सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी पूर्ण झाली असून, त्याद्वारे सुमारे १७३ मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. जिल्हा प्रशासन आणि महावितरणच्या सांघिक प्रयत्नांमुळे या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे सांगत महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे व महावितरणच्या अधिकाऱ्यांचे बुधवारी (ता. २३) कौतुक केले.
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील अधिकाऱ्यांच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत श्री. चंद्र यांनी महावितरणच्या अनेक योजनांवर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवणे, संचालक सचिन तालेवार, राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांच्यासह विभागातील सर्व अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत मार्च २०२६ पर्यंत राज्यात एकूण १६ हजार मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प पूर्ण करून शेतीसाठी पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित विजेचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेनुसार महावितरणच्या वीज उपकेंद्राच्या पाच किलोमीटर परिघातील जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. यातून निर्मित होणारी वीज उपकेंद्रांतील फीडरद्वारे परिसरातील कृषी पंपांना दिवसा पुरवली जाते. ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य बदलांचा वेध घेऊन सौरऊर्जेला चालना देणारी ही योजना शासनाने अंमलात आणली आहे.
जिल्ह्यात जास्तीत जास्त सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महावितरणच्या जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने प्रयत्न केले. जिल्हाधिकारी ठाकूर यांनी प्रकल्पांसाठी शासकीय जमिनी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया गतिमान केली.
त्यामुळे डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत ३६ प्रकल्प पूर्ण झाले असून,१७३ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. यामुळे परिसरातील पन्नास हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल चंद्र यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.
सदोष, नादुरुस्त मीटर बदला
मराठवाड्यात वीज वितरण यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा देण्याच्या सेवेत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा श्री. चंद्र यांनी बैठकीत देत अचूक बिलासाठी नादुरुस्त व सदोष व वीजमीटर तातडीने बदलावेत व प्रत्येक महिन्याला वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. वीज पुरवठा खंडित झाल्यास प्रथम पर्यायी स्वरूपात तसेच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून खंडित विजेचा कालावधी कमीत कमी राहील याची दक्षता घ्यावी,असे त्यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.