Latur News : जिल्ह्यात खरिपाचे कर्ज वाटप ६७ टक्क्यांच्या पुढे गेले असून उद्दिष्टाहून अधिक म्हणजे १०७ टक्के वाटप करून जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक उद्दिष्टानुसार कर्ज वाटपामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असली तरी अग्रणी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने यंदा कर्ज वाटपामध्ये मोठे योगदान देत ३३५ कोटींचे वाटप करत ६४ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. पीक कर्जाचे नूतनीकरण व वाटप अजून सुरूच असून वाटपात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
यंदा जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामात मिळून यंदा तीन हजार कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात खरिपासाठी दोन हजार चारशे तर रब्बी हंगामात सहाशे कोटीचे कर्ज वाटप करण्याचे नियोजन आहे. या वर्षी पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून पिके चांगली असल्याने शेतकरी आनंदात आहे.
यामुळे बँकांमध्ये पीककर्ज वाटपाचा उत्साह असून कर्जाची मागणी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले जात नाही. काही बँकांचा अपवाद सोडला तर बहुतांश बँकांनी यंदा शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे वेळेवर नूतनीकरण करून त्यांना तातडीने नवीन पीक कर्जाचे वाटप केले आहे. यातूनच जूनमध्येच ५० टक्के पीक कर्जाचे वाटप साध्य झाले होते.
दर वर्षी जिल्हा बँकेकडून उद्दिष्टापेक्षा जास्त कर्ज वाटप करण्यात येते. बँकेकडून वाटप होणाऱ्या कर्जामुळेच जिल्ह्याची कर्ज वाटपाची टक्केवारी वाढते व काही बँकानी उद्दिष्टापेक्षा कमी व काही बँकांनी काहीच कर्ज वाटप केले नाही तरी त्यांचे गंगेत घोडे वाहून जाते.
यंदाही जिल्हा बँकेने ८५३ कोटींचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत एक लाख २८ हजार ८७४ शेतकऱ्यांना ९१६ कोटी ३४ लाखांचे कर्जवाटप केले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे वाटप १०७ टक्के असून बँकेकडून आणखी वाटप सुरू असल्याने यंदाही उद्दिष्टाच्या किती तरी पटीने जास्त वाटप होण्याची शक्यता आहे.
लीड बँकेची यंदा आघाडीच
अग्रणी (लीड) बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने यंदा पीककर्ज वाटपात चांगलीच आघाडी घेतली असून ५२३ कोटी वाटपाचे उद्दिष्ट असताना तीन लाख २२ हजार शेतकऱ्यांना ३३५ कोटी २१ लाखांचे (६४ टक्के) वाटप केले आहे. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २५६ कोटीचे उद्दिष्ट असताना २४७ कोटीचे वाटप करून ९७ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
बँक ऑफ बडोदाने २२ कोटीचे वाटप करून २८, बँक ऑफ महाराष्ट्राने ५३ कोटीचे वाटप करून ३४ तर इंडियन ओव्हरसीज बँकेने पाच कोटी ९१ लाखांचे वाटप करून ४३ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. कॅनरा, डेव्हलपमेंट क्रेडीट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, इंडस्लंड बँक, कोटक महिंद्रा बँक, एयू व इक्विटाज बँकेने अद्याप पीक कर्जाचे खाते उघडले नाही. तर उर्वरित अॅक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, यूको बँक या सर्व बँकाचे कर्ज वाटप दोन ते १९ टक्क्यांदरम्यान आहे.
खरिपातील कर्ज वाटप
उद्दिष्ट - दोन हजार ४०० कोटी
आतापर्यंत वाटप - एक हजार ६१६ कोटी
लाभार्थी शेतकरी - एक लाख ९२ हजार २३१
उद्दिष्टाच्या तुलनेत वाटप - ६७ टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.