Land Compensation : जमीन गेली, धड नोकरीही नाही

Land Acquisition : जमीन मिळविण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने एक नवी शक्कल लढवायचे ठरवले. जो शेतकरी कारखान्याला जमीन देईल त्याला बाजारभावाच्या २० टक्के रक्कम द्यायची आणि त्याच्या घरातील एका माणसाला नोकरी द्यायची असा फॉर्म्यूला संचालक मंडळाने ठरविला.
Land Acquisition
Land AcquisitionAgrowon
Published on
Updated on

Land Dispute : संतोष नावाच्या एका शेतकऱ्याची एका सहकारी साखर कारखान्याच्या शेजारी बारा एकर जमीन होती. ही जमीन पूर्णपणे माळरान होती. कुसळाशिवाय या जमिनीत गेल्या कित्येक वर्षांत काहीही उगवलेले नव्हते. साखर कारखान्यांनी भाग भांडवल गोळा करून काही सरकारी जमीन मिळवून साखर कारखाना चाळीस एकरांवर उभारला होता. सुरुवातीच्या काळात मशिनरी आणि बांधकामाचा खर्च विचारात घेता गरज नसलेली जमीन घ्यायची नाही, असे कारखान्याच्या नेतृत्वाने ठरविले होते.

काही महिन्यांनी कारखाना सुरू झाला आणि चांगला चालला देखील. पाच सहा वर्षांनंतर वीज निर्मिती आणि डिस्टिलरी टाकण्यासाठी कारखान्याला जागा कमी पडू लागली. तोपर्यंत आजूबाजूच्या जमिनीचे बाजारभाव वाढू लागले होते. जेवढ्या रकमेत पूर्वी जमीन मिळाली होती त्या दरात आता जमीन मिळणार नाही, हे कारखान्याच्या चेअरमनलासुद्धा लक्षात आले होते.

Land Acquisition
Land Dispute : गावकऱ्यांचा डाव

जमीन मिळविण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने एक नवी शक्कल लढवायचे ठरवले. जो शेतकरी कारखान्याला जमीन देईल त्याला बाजारभावाच्या २० टक्के रक्कम द्यायची आणि त्याच्या घरातील एका माणसाला नोकरी द्यायची असा फॉर्म्यूला संचालक मंडळाने ठरविला. चार-पाच शेतकऱ्यांनी माळरान जमीन आहे म्हणून जमिनीचे एकरी दोन लाख रुपये घेण्यापेक्षा मुलाला नोकरी लावली तर घराच्या जवळ ३० ते ३५ वर्षांची त्याची सोय होऊन जाईल असा विचार केला.

पहिल्यांदा तीन शेतकऱ्यांनी कारखान्याला जमीन बक्षीसपत्राने देऊन टाकली. संतोषच्या मनात सुद्धा आता पदवीच्या पहिल्या वर्षाला असलेल्या मुलाच्या भवितव्याविषयी विचार आला. नाहीतरी हल्ली पुढारी नोकरी लावण्यासाठीच पाच ते दहा लाख रुपये घेतात. त्याऐवजी आपली एक एकर जमीन दिली तर मुलाचे पण भवितव्य निश्‍चित होईल असा त्याने विचार केला. मित्रांचा काही विचार घेऊन आणि चेअरमनशी चर्चा करून त्याने त्या जमिनीचे बक्षीसपत्र त्या कारखान्याला करून दिले.

कारखाना सुरू होताना संतोषच्या मुलाला नोकरीत घेतले जाईल, असे चेअरमनने आश्‍वासन दिले. फेब्रुवारी महिन्यात हे बक्षीसपत्र करण्यात आले. प्रत्यक्षात कारखाना मात्र नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला. तोपर्यंत मुलगा शिकत असल्यामुळे संतोषला सुद्धा नोकरीसंबंधी एवढी चिंता नव्हती. कारखाना सुरू होताना आता ठरल्याप्रमाणे कारखान्यात नोकरी द्यावी अशी मागणी घेऊन संतोष आणि त्याचा मुलगा दत्ता चेअरमनला भेटले. त्या वेळी चेअरमनने तू आता मध्येच कॉलेज सोडून आणि डिग्रीचे शिक्षण सोडून कारखान्यात येणार का, अशी विचारणा केली. तसेच संतोषला सुद्धा मुलाचे तू का नुकसान करतो, त्याला आधी शिकू दे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर निदान कारकून म्हणून त्याला घेता येईल, असे सांगितले.

आता संतोषच्या मनात संभ्रम निर्माण झाला. शिवाय त्याचा मुलगा दत्ता याला पण मनातून शिकायची इच्छा होती. आता फक्त त्याला नोकरीत घेतल्याचे आदेश द्या आणि डिग्री पूर्ण झाल्यावर तो कारखान्यात नोकरीला येईल असे जेव्हा दोघांनी चेअरमनला सांगितले तेव्हा चेअरमनने कारखान्याच्या एमडीना बोलावले. चेअरमनदेखत एमडी यांनी आज आदेश आणि दीड वर्षानंतर नोकरी असे करता येणार नाही.

कायद्यानुसार नोकरीत आहे पण शून्य पगार घेतो असे आम्हाला खोटे व कागदोपत्री दाखवता येणार नाही असे सांगितले. शिवाय दत्ता पदवीधरसुद्धा नसल्यामुळे त्याला फक्त चीटबॉय सारखी उसाच्या फडातली नोकरी देता येईल. चार महिने कॉलेज पण बुडेल आणि कारखाना बंद झाल्यावर नोकरीतूनही कमी केले जाईल अशी जाणीव पहिल्यांदा दत्ताला झाली.

Land Acquisition
Land Dispute : जमीन संपादनाबाबत कायदा काय सांगतो

आता संतोषच्या डोक्यात मुंग्या यायला सुरुवात झाली होती. मुलाचे शिक्षण अर्धवट सोडून आणि स्वतःची जमीन देऊन आपले नुकसान झाले असा विचार त्याच्या मनात यायला लागला होता. शेवटी राहिलेले शिक्षण पूर्ण करून मग कारखान्याकडून नोकरी घ्यावी असा दोघांनी विचार केला. प्रत्यक्षात जेव्हा डिग्री पूर्ण झाली त्यावेळी मे महिन्यामध्ये कारखाना बंद होता. त्यावर्षी सहा महिने घरी राहिल्यावर संतोष आणि दत्ता यांनी चेअरमनकडे २० ते २५ हेलपाटे मारून नोकरी देण्याची विनंती केली.

प्रत्येक हेलपाटा मारताना आपण याच जमिनीवर कोणताही व्यवसाय उभारला असता, तर आपल्याला दुसऱ्याच्या दारात हेलपाटे मारायला लागले नसते असे दत्ताने वडिलांना सुनावले. प्रत्यक्षात कारखाना सुरू झाल्यावर आता कारकुनाच्या जागा रिकाम्या नसल्यामुळे फक्त दर महिना बारा हजार पगारावर चीटबॉयची नोकरी स्वीकारण्यापलीकडे दत्ताच्या हातात काहीही राहिले नव्हते. कारखान्याची निवडणूक झाल्यावर चेअरमनचे पॅनेल पडल्यामुळे वरच्या पदावर जाण्याचे मनसुबे सुद्धा संपुष्टात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com