

Dharashiv News : शेतशिवारातील नदी नाल्यांतील पावसानंतरचे वाहून जाणारे पाणी अडवून ते सिंचनासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याची योजना शेतीसाठी वरदान ठरली होती. मात्र, या योजनेत बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध होत नसल्याने बंधारे हे प्राचीन अवशेष होऊन बसले आहेत.
जिल्ह्यातील ९२० पैकी अनेक बंधाऱ्यांची स्थिती नदीपात्रातील भुजगावण्यासारखी झाली असून या बंधाऱ्यांचे तब्बल साडेअकरा हजार गेट गायब असल्याने बंधाऱ्यात पाणी अडणे कठीण होऊन बसले आहे. यामुळे बंधाऱ्यांच्या माध्यमातून सिंचनाचा उद्देश सफल होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
गायब असलेले दरवाजे, दुरुस्तीसाठी निधीचा अभाव, लाभार्थीसह ग्रामपंचायतींचीही उदासिननेत बंधाऱ्यांतील पाणी न अडता जात असल्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यात एकूण ९२० बंधारे आहेत.
गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यातील विविध नद्या, ओढे, नाल्यांवर मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे उभारण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे त्याची देखभाल आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या अखेरला बंधाऱ्यांना दरवाजे बसविणे आणि मे अखेरला ते काढण्याची अट होती. शिवाय दरवर्षी बंधाऱ्यांना दरवाजे बसविणे व ते काढण्याची जबाबदारी लाभार्थी शेतकऱ्यांवर होती. सुरवातीचे काही वर्षे शेतकऱ्यांनी ही कामे केली. परंतु कालांतराने यासाठी खर्च कोणी करायचा म्हणून शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
परिणामी बंधाऱ्यालगत काढून ठेवलेले हजारो दरवाजेही गायब होत गेले. काही ठिकाणच्या बंधाऱ्यांना अद्यापही काही लाभार्थी शेतकरी दरवाजे बसवून पाणी अडवितात. परंतु ही संख्या तुलनेत कमी आहे. या सर्व बंधाऱ्यांना दरवर्षी पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात दरवाजे बसविल्यास ८५ हजार २८ सहस्त्र घनमीटर पाणी साठवण होऊ शकते. या बंधाऱ्यांमुळे जिल्ह्यातील २८ हजार १८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते.
शिवाय बंधाऱ्यांतील पाणी जमिनीत मुरून त्याचा परिसरातील विहिरी व कूपनलिकांतील पाणीपातळीत वाढ होण्यासही मदत होते. गेल्या काही वर्षांत बंधाऱ्यांना दरवाजे बसविण्याकडे दुर्लक्ष होत गेले. त्यातच काढून ठेवलेले अनेक ठिकाणे दरवाजे गायब झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविणे शक्य होत नसल्याची सध्याची स्थिती आहे.
सध्या अशा बंधाऱ्यांना दरवाजे बसविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे आहे. यासाठी काही प्रमाणात निधीही ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असतो. परंतु मोजक्याच ग्रामपंचायतींकडून दरवाजे बसवण्यासाठी पुढाकार घेतला जात असला तरी अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीची या कामांसाठी कमालीची उदासीनता आहे.
साडेअकरा हजार गेट गायब
जिल्ह्यात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची एकूण संख्या ९२० आहे. त्यासाठी ३८ हजार ८६१ दरवाजे (गेट) लागतात. सध्या २७ हजार ३३६ दरवाजे उपलब्ध आहेत. तर ११ हजार ५२५ दरवाजे गायब आहेत. या बंधाऱ्यांच्या गेटसाठी १३ कोटी ८९ लाख ८० हजार रुपयांची निधीची आवश्यकता आहे. पुरेशा दरवाजाअभावी १३ हजार ४४० सहस्त्र घनमीटर पाणीसाठवण क्षमता कमी झालेली आहे.
शिवाय पुरेशा दरवाजाअभावी नऊ हजार ७५० हेक्टर सिंचन क्षमताही कमी झालेली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मोजक्याच बंधाऱ्यांची दुरुस्ती होऊ शकते. गेल्या वर्षी ४४९ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना दरवाजे बसवून पाणी अडविण्यात आले होते. त्यात तीन हजार ८४० सहस्त्र घनमीटर पाणीसाठा झाला होता.
त्याचा एक हजार २३५ हेक्टरला सिंचनासाठी फायदा झाला. या सर्व बंधाऱ्यांची दुरुस्ती करून दरवर्षी पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात बंधाऱ्यांना दरवाजे बसविल्यास ८५ हजार सहस्त्र घनमीटर पाणीसाठा जिल्ह्यात वाढू शकतो. परंतु त्यासाठी आवश्यक तितका निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.