Fruit Farming : ‘केव्हीके’ किर्लोसची आदर्श सेंद्रिय आवळा बाग

KVK Kirlos : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राने सेंद्रिय- नैसर्गिक शेतीद्वारे दोन एकर आवळा व त्यात विविध आंतरपीक पद्धतीची आदर्श बाग विकसित केली आहे.
Fruit Farming
Fruit Farming Agrowon
Published on
Updated on

एकनाथ पवार

Amla Farming : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राने सेंद्रिय- नैसर्गिक शेतीद्वारे दोन एकर आवळा व त्यात विविध आंतरपीक पद्धतीची आदर्श बाग विकसित केली आहे. आवळ्याचा पुरवठा केंद्राच्याच शेतकरी कंपनीला होत आहे. सेंद्रिय प्रयोग व व्यवस्थापनाद्वारे जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब व त्यातून पीक उत्पादकता वाढ करण्यात केंद्राला यश आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात किर्लोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) कार्यरत आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत संस्थेचे अध्यक्ष आहेत. सन
१९९७ मध्ये केव्हीकेचे कार्य सुरू झाले. त्यानंतर आजगायत केंद्र विविध गावांमध्ये शेती, पूरक व्यवसाय वृद्धीसाठी सातत्याने कार्य करीत आहे.

नैसर्गिक पद्धतीने आवळा बागेचा विकास

संस्थेची एकूण ६३ एकर जमीन आहे. त्यात आंबा, काजू, चिकू, कोकम यासह विविध फळपिकांची लागवड आहे. केव्हीकेने आपल्या ५० एकर प्रक्षेत्रावर कोकणातील विविध धान्य व फळपिकांची लागवड केली आहे. बाळकृष्ण गावडे केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख असून विवेक सावंत-भोसले हे
प्रक्षेत्र व्यवस्थापक आहेत. पन्नास एकरांपैकी दोन एकरांत १४५ वर्षांपासून आदर्श आवळा बाग विकसित केली आहे. यामध्ये कृष्णा आनंद २, चकय्या, कांचन, नरेंद्र ७, ६ व १० अशा जातींची विविधता ठेवली आहे. सुरुवातीला सुमारे दहा वर्षे रासायनिक शेती पद्धतीचा वापर केला जायचा. मात्र सन २०१७ नंतर सेंद्रिय नैसर्गिक शेती पद्धतीने व्यवस्थापन सुरू करण्यात आले. रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर पूर्ण थांबवण्यात आला. या पद्धतीसाठी लागणारी सर्व यंत्रणा प्रक्षेत्रावर उभी करण्यात आली.

Fruit Farming
Fruit Crop Nursery : कण्हेरीतील फळरोपवाटिका देशात सुंदर, आदर्श

आवळा बाग- व्यवस्थापनातील बाबी

गोपालन युनिट सुरू करण्यात आले. सध्या चार देशी गायींचे पालन केले जाते. शेण व गोमूत्राद्वारे सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक द्रवरूप व घन जिवामृताची निर्मिती करण्यात येते. त्यासाठी दोनशे लिटरचे ड्रम तयार करण्यात आले आहेत. दर महिन्याला प्रति एकर ४०० लिटर जिवामृत तर एकरी २०० किलो घन जिवामृत असा वापर केला जातो. कीड प्रतिबंधक म्हणून दशपर्णी अर्क बनविला जातो. बांधावर हिरवळीचे खत गिरिपुष्पाची लागवड करण्यात आली. आवळा बागेत उपलब्ध असलेले गवत, पालापाचोळा व पिकांचे अवशेष यांचा आच्छादनासाठी वापर केला जातो. बागेत शेवग्याची झाडेही लावली आहेत. त्याचा पालाही बागेला मिळतो. शिवाय शेंगांचे उत्पादन मिळते.

Fruit Farming
Integrated Farming : एकात्मिक शेतीचे आदर्श मॉडेल

आंतरपिके

आवळा बागेत खरीप व रब्बी हंगामात विविध आंतरपिके घेण्यात येतात. यात कोकणातील मुख्य तसेच तेलवर्गीय, कडधान्ये अशी विविध पिके असतात. यात भात, भुईमूग, हळद, कुळीथ, मूग, नाचणी,
कलिंगड, काकडी, लाल माठ, मुळा, मोहरी आदी पिके असतात. दोन वर्षे स्ट्रॉबेरी देखील घेण्याचा प्रयोग केला. उत्पादन मिळाले. मात्र महाबळेश्‍वर भागातील आणि कोकणातील तापमान यातील फरक पाहता अपेक्षित उत्पादनपर्यंत पोहोचता आले नाही. आवळा बागेत रामफळ, जाम, पपई, लिंबू, कोकम, दालचिनी आदींची काही झाडेही लावली आहेत.

आवळ्याचे उत्पादन

आवळ्याला वर्षातून दोनदा बहर येतो. यात पावसाळा हंगामात व मार्च- एप्रिल अशी दोनदा काढणी केली जाते. पूर्वी रासायनिक पद्धतीत एकूण क्षेत्रातून सरासरी १५०० किलोपर्यंत उत्पादन मिळायचे. फळगळ मोठ्या प्रमाणात व्हायची. मागील वर्षी उत्पादन १९०० किलोपर्यंत मिळाले असून, फळगळीचे प्रमाणही खूप घटले आहे. आवळ्याचा आकार मध्यम ते मोठा असून वजन २०, ३० ते ४० ग्रॅमपर्यंत आहे.

बाजारपेठ

नैसर्गिक आवळा असल्याने रंग, चव आणि आकार उत्तम आहे. त्यास स्थानिक प्रक्रिया
उद्योजकांकडून तसेच ग्राहकांकडून मागणी आहे. बाजारपेठेतील आवळ्यापेक्षा २० ते २५ टक्के अधिक दर मिळू लागला आहे. मागील दोन वर्षे सरासरी प्रति किलो ४० रुपये दर हाती येतो आहे.
याच संस्थेने दुर्गसिंधू शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. त्यास आवळा पुरवला जात
आहे. ही कंपनी आवळा सरबत, कॅण्डी, मावा, लोणचे आदी पदार्थ तयार करते आहे.

मातीची सुपीकता जपली

सेंद्रिय शेतीला सुरुवात करण्यापूर्वी माती परीक्षण केले होते. त्यात मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ३२ टक्के, सेंद्रिय कर्ब ०.६ टक्का, तर जमिनीत प्रति चौरस फुटात गांडुळांचे प्रमाण ३ ते ४ आढळून आले होते. सन २०२३ मध्ये म्हणजे सुमारे पाच वर्षांनंतर पुन्हा माती परीक्षण करण्यात आले त्यात मध्ये मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ३८.५ टक्के, सेंद्रिय कर्ब ०.९३ टक्का, तर प्रति चौरस फुटात गांडुळांची संख्या ८ ते १० पर्यत व जमिनीचा भुसभुशीतपणा यात वाढ झाल्याचे आढळले आहे. रब्बी, उन्हाळी हंगामात आंतरपिकांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतरही वाढले.

आनंदी गाव समृद्ध गाव

केव्हीकेतर्फे आनंदी गाव समृद्ध गाव ही योजना राबविली जात आहे. त्यात सुमारे चौदा
गावांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत आरोग्य, उद्योग, संस्कृती, पाणी, शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता, वीज या विषयांवर काम केले जाणार आहे. नैसर्गिक शेती, कृषी सेवा व सल्ला, रोपवाटिका, फुलशेती, प्रकिया व पूरक उद्योग, शोभिवंत मत्स्यपालन, कृषी पर्यटन आदी विविध संकल्पना गावांमध्ये राबविण्यात येणार आहेत.

संपर्क ः

विवेक सावंत-भोसले, ९४०५९७४१३६ (प्रक्षेत्र व्यवस्थापक)
विकास धामापूरकर, ९४२२४३५९१६ (शास्त्रज्ञ, मृदाशास्त्र)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com