
Nashik News : आपल्याकडे जमीन आहे, मात्र मातीला अन्न किती हवे आहे याकडे कुणी पाहत नाही. माती हेच खत आहे. आहार हेच औषध असले पाहिजे. जगात असे एकही खत निर्माण होऊ शकले नाही की, जे पिकाला १७ अन्नद्रव्य देऊ शकेल. मात्र मातीत सर्व अन्नद्रव्य समाविष्ट आहेत. मात्र आता बदल झाले आहेत. त्यामुळे अन्नद्रव्य व रासायनिक खतांचा वापर कमी करायचा असेल तर जमिनीला सशक्त समृद्ध करा, तिचे पोषण करा, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले.
ॲग्रिसर्च उद्योग समूहाच्या वतीने मंगळवारी (ता. ५) जागतिक मृदा दिनानिमित्त ‘माती व पाणी : जीवनाचे स्रोत’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. कौसर्डीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ होते.
व्यासपीठावर राष्ट्रीय फलोत्पादन कृषी संशोधन व विकास प्रतिष्ठानचे माजी अतिरीक्त संचालक डॉ. सतीश भोंडे, सेंद्रिय शेती तज्ज्ञ मनोहर शेटे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक शेतकरी सदाशिव शेटे, अनंत मोरे, ॲग्रिसर्च उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कोठावदे उपस्थित होते.
डॉ. कौसर्डीकर म्हणाले, की शेती व्यवसायामध्ये माती हेच मुख्य भांडवल आहे. एक इंच मातीचा थर नैसर्गिकरीत्या तयार होण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे मातीचा हा जिवंत थर जपण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. माणसाच्या शरीरात ज्याप्रमाणे हिमोग्लोबिन काम करते. त्याप्रमाणे सेंद्रिय कर्ब हे जमिनीचे हिमोग्लोबिन आहे तर जमिनीचा सामू म्हणजे जमिनीची नाडी असल्याचे नमूद केले.
डॉ. सतीश भोंडे यांनी जागतिक मृदा दिनाचे महत्त्व विशद करत आगामी काळात सुपीकतेचे धोरण विषद केले. तर ‘माती वाचवा’ ही शपथ मृदा शास्त्रज्ञ डॉ. ओमप्रकाश हिरे यांनी दिली. या वेळी कृषी विज्ञान केंद्र नाशिकचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ हेमराज राजपूत, पी. एन. खांदवे, अरुण मुळाणे, ‘पूर्वा केमटेक’चे संजय पवार, ‘आनंद अग्रो केअर’चे घनश्याम हेमाडे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी शिलानाथ पवार, दिलीप देवरे, नंदकिशोर आहेर, नानासाहेब पाटील, प्रा. तुषार उगले उपस्थित होते.
निबंध स्पर्धेचे विजेते :
जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्नील भाऊसाहेब पवार (कृषी महाविद्यालय, मालेगाव, जि. नाशिक), द्वितीय विवेकानंद गोरक्षनाथ मलिक (कृषी महाविद्यालय बाभुळगाव, ता. येवला) तर तृतीय क्रमांक निकिता बैसाने (कृषी महाविद्यालय, मालेगाव) हिला मिळाला.
जमीन आरोग्य व्यवस्थापन ही चळवळ व्हावी
वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता आगामी काळात अन्नधान्य निर्मितीवर मर्यादा येणार आहेत. एकीकडे हवामान बदलाचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. त्यामुळे जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी जमीन आरोग्य व्यवस्थापन ही चळवळ म्हणून पुढे आली पाहिजे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. शाश्वत व्यवस्थापन इथून पुढे आपल्याला करावे लागणार आहे, असे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.