Paddy Farming : कुरयाटी भात शेती : जलसंधारणाचे मॉडेल

Article by Dr. Dilip Nagvekar : कोकणातील भात शेती विविध ठिकाणी केली जाते. त्यानुसार त्याला मळ्यातील भात शेती, डोंगर उतारावरील कुरयाट शेती आणि डोंगर माथ्यावरील खरी शेती अशा नावाने ओळखले जाते.
Paddy Farm
Paddy FarmAgrowon

A Model of Water Conservation : कोकणातील महत्त्वाची तृणधान्य पिके म्हणजे भात, नाचणी आणि वरी. फळबागांचा विचार करता आंबा, काजू, फणस, कोकम ही महत्त्वाची पिके आहेत. बारमाही पाण्याची सोय असल्यास नारळ, सुपारी, चिकू, केळी इत्यादी पिके घेतली जातात. पावसाळ्यानंतर ओलितावर येणारी कडधान्ये (पावटा, कडवा, कुळीथ इत्यादी) आणि पाण्याची सोय असल्यास भाजीपाला या सर्व पिकांची लागवड कोकणात पारंपरिक पद्धतीने केली जाते.

भात हे महत्त्वाचे पीक. पावसाळ्यानंतर पाण्याचा उत्तम स्रोत असल्यास भात पीक (वायंगणी) घेतले जाते. कोकणातील भात शेती विविध ठिकाणी केली जाते. त्यानुसार त्याला मळ्यातील भात शेती, डोंगर उतारावरील कुरयाट शेती आणि डोंगर माथ्यावरील खरी शेती अशा नावाने ओळखले जाते. नदीकिनाऱ्यावरील सपाट जागेत खोल खाचरातून शेती केली जाते. त्यामध्ये अति पाणथळ आणि कमी पायथळ अशा दोन प्रकारांत भातशेती केली जाते.

भात खाचरातून जलसंधारण

कुरयाट शेतीसाठी डोंगर उतरावर टप्प्याटप्प्याने खाचरे तयार केली जातात. अनेक वर्षांपासून ही खाचरे तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी डोंगर उतारावर ३ फूट ते १० फूट उंचीचे दगडी बांध घालून कुरयाटांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची दरवर्षी थोडीशी डागडुजी करून ती सांभाळली जात होती. या कुरयाटातील छोट्या खाचरात मोठे दगड होतेच, त्याचबरोबर मातीबरोबर छोट्या दगडांचा समावेश आहे. यामध्ये नांगर फिरविणेदेखील कसरतीचे काम असते. आता नांगर जाऊन यंत्रे आली आहेत. तसेच यामध्ये कमीत कमी चार ते पाच वेळा नांगरणी करून (उकल, बेर, चिखल आणि पेरणी) पाऊस पडत असताना पाणी साठविले जात असे.

डोंगर माथ्यावरील कातळातील खोलगट जागेत माती साठवून त्यामध्ये छोटे बांध घालून खाचरे निर्माण केलेली आहेत. या ठिकाणी मातीचा गाळ अनेक वर्षे जमा केलेला असून, काही ठिकाणी त्याची खोली जेमतेच ३ ते ४ इंच आहे. या ठिकाणी पावसाचा अंदाज घेऊन धूळवापरावर पेरणी केली जाते. भात हे असे एकमेव पीक आहे जे साठवून ठेवलेल्या पाण्यात चांगल्या प्रकारे येते आणि काही दिवसांचा पाण्याचा ताण सहन करू शकते.

Paddy Farm
Paddy Harvesting : डोक्यावरील भाताचे भारे उतरले

भात शेतीमधील समस्या आणि उपाय

भात शेतीमधील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यामध्ये मनुष्यबळ हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मजुरीचे वाढते दर, यांत्रिकीकरणाची आवश्यकता, नदीकिनारी गावामध्ये दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे होणारे भात शेतीचे नुकसान, रोजगार हमी अंतर्गत फळबागा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल, कृषी विद्यापीठ आणि इतर संस्थांनी निर्माण केलेल्या सुधारित आणि संकरित जातींमुळे प्रति हेक्टरी उत्पन्नात झालेली वाढ आणि त्यामुळे अधिक क्षेत्रात लागवड न करता थोड्या क्षेत्रामधून अधिक उत्पन्न घेण्याची मानसिकता आहे.

भात शेतीवर आधारित पीक पद्धती बंद झाली आहे. भातानंतर जमिनीतील उर्वरित ओलाव्यावर घेण्यात येणारी कडधान्य (पावटा, कडवा, कुळीथ) ही पिके होत होती. या पिकांच्या फेरपालटामुळे जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होत होते. यांत्रिकीकरणामुळे कमी होत असलेले पशुधन त्यामुळे शेणखतांचा अपुरा पुरवठा, बाजारात सहज उपलब्ध होणारे दूध आणि त्याचे पदार्थ त्यामुळे पशुधन न सांभाळण्याकडे होणारा कल आणि अनेक कारणे एकमेकांत गुंतली आहेत. त्याचबरोबर वन्यप्राण्यांचा (वानर, माकड, डुक्कर, रानरेडे, रानगवे इ.) वाढता उपद्रव हे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे.

Paddy Farm
Paddy Harvesting : भात कापणीसाठी मजूरटंचाईच्या झळा

या भातशेतीतील समस्या आहेत. हे जरी खरे असले तरी त्यावर उपाययोजना सुरू आहेत. पारंपरिक जातीची उत्पादकता कमी (२० ते २५ क्विंटल/ हेक्टर) आहे. सुधारित आणि संकरित जातीमध्ये जास्त (४५ ते ६५ क्विंटल/ हेक्टर) आहे. पारंपरिक जातीमध्ये पोषणमूल्य अधिक आहे. त्यासाठी संशोधनातून अधिक पोषणमूल्य असलेल्या जाती (उदा. रत्नागिरी-७, सुवासिक भात जाती) फायदेशीर ठरणार आहेत. सध्या भात खरेदी शासनामार्फत सुरू आहे. पीकविमा अल्प हप्त्यामध्ये उपलब्ध आहे.

परंतु यात सर्वांत महत्त्वाचे वानर, माकड आणि इतर वन्य प्राणी यांचा त्रास प्रकर्षाने जाणवतो. यामुळे भविष्यात भात शेतीच्या समस्या जाणून त्यावर योग्य त्या उपाययोजना करून भात शेती खालील क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. ज्यामुळे भातशेती हे जलसंधारणाचे उत्तम साधन पटवून घेऊन ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या घोषवाक्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल असे वाटते. त्याचबरोबर पाण्याचे स्रोत पुन्हा जीवित होतील. तसेच जीवित असलेले अधिक जोरदार होतील.

- डॉ. दिलीप नागवेकर, ९४२११३७७६९

(माजी कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)

भात शेतीतून जलसंधारण

कोकणात पडणारा पाऊस मोठ्या प्रमाणात डोंगरमार्गे उतरून नदीनाल्यांमधून समुद्राला मिळतो. पाण्याची उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेऊन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा प्रचार केला जातो. परंतु हे पाणी आडविणे आणि जिरविणे हे कार्य गेली अनेक वर्षे कोकणात कुरयाट आणि इतर प्रकारच्या भात शेतीच्या माध्यमातून केले जात आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येते. रत्नागिरी परिसरातील गावागावांतून डोंगराच्या उतारांवर शेतकऱ्यांनी निर्माण केलेली कुरयाटी भात शेती हे जलसंधारणाचे उत्तम उदाहरण आहे.

डोंगर उतारावर मनुष्यबळाचा वापर करून जुन्या जाणत्या शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने बांधबंदिस्ती करून कुरयाट शेती निर्माण केली होती. ज्यामध्ये पाऊस पडल्यानंतर मशागत करून जून ते सप्टेंबर या कालावधीत भातशेतीबरोबर पाणी अडवून जिरविले जात होते. या शेतीतील चिखलणी इतकी चांगली केली जात असे, की जेणेकरून ते पाणी पावसाने दडी मारली तरी ७ ते १५ दिवस शेतात राहत होते. सतत हे पाणी चार महिने जमिनीवर योग्यप्रकारे जिरविले जात होते. त्याचे दृश्य परिणाम पावसाळ्यानंतर दिसून येत असत. जिरविलेले पाणी विहीर, इतर जलस्रोतांपर्यंत हळूहळू पोहोचविले जात होते. त्यामुळे ते वर्षभर मिळत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com