Maharashtra Politics : महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला; मुख्यमंत्र्यांची महाविकासवर जोरदार टीका

Mahayuti Election Campaign Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.०५) कोल्हापुरात जाहीर सभा घेतली. महायुतीकडून राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातील जाहीर सभेत फोडला.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsagrowon
Published on
Updated on

Kolhapur Mahayuti Election Campaign : आता आमचं ठरलंय नाही.. आता वारं फिरलंय.... महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी कोल्हापूरकरांचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. येत्या २३ तारखेला छोट्या-मोठ्या लवंगीऐवजी अॅटमबॉम्ब फोडायचे आहेत. जिल्ह्यातील दहाही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता.०५) जाहीर सभेत केले. महायुतीकडून राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापुरातील जाहीर सभेत फोडला.

करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मित्र पक्षाचे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह राज्यातील नेते मंचावर उपस्थित होते. येथील मेरीवेदर मैदानावर रात्री सभा झाली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती दीदी, ड्रोन दीदी अशा योजना राबवल्या. हे डबल इंजिनचे सरकार आहे. आम्ही दिल्लीत जातो, ते राज्यातील अनेक योजनांसाठी निधी आणण्यासाठी जातो. राज्याच्या विकासासाठी पैसे मागतो; पण काहीजण मला मुख्यमंत्री करा, चेहरा बनवा यासाठी जातात. महाविकास आघाडीला जो चेहरा नकोय, तो महाराष्ट्राला कसा चालेल? कोल्हापूरची जनता प्रेमळ आहे.

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पाहिजे तितका निधी दिला जात आहे. कोल्हापूर-सांगलीची महापुरापासून कायमची सुटका केली आहे. याच कोल्हापुरातून इतिहास घडवायचा आहे. दहाच्या दहा उमेदवार विजयी करायचे आहेत. ही संधी दडवायची नाही. ‘यूज ॲण्ड थ्रो’ करणाऱ्यांना बाजूला करायचे आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.’’

विरोधकांकडे बोलायला काही नाही!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधत म्हणाले की, ‘‘ उद्धवजी कोल्हापुरात आले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इंग्रजांवर राग होता म्हणून सुरत लुटल्याचे म्हणाले; पण त्यावेळी इंग्रज होतेच कोठे? तुम्हाला आता औरंगजेबाचे नाव घ्यायची लाज वाटायला लागली. मतांसाठी तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावातील तुम्ही हिंदुहृदयसम्राट काढून टाकले. विरोधकांकडे बोलायला काही नाही. अडीच वर्षांत जे परिवर्तन घडले त्याचे उत्तर ते देऊ शकत नाहीत म्हणून लोकांत भ्रम पसरवित आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार वारंवार उद्योग पळविले, गुजरातला गेले म्हणतात. त्यांना काय झाले हेच कळत नाही. अलीकडे गुजरातला पेपरमध्ये जाहिरात द्यायची गरज नाही.

महाविकास आघाडीचे नेतेच गुजरात कसे पुढे आहे, हे सांगतात. तेच आता गुजरातचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर झाले आहेत. आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या क्रमांकावर कर्नाटक आले. देशात एकूण परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात ५२ टक्के होते आणि इतर राज्यांत ४८ टक्के होते. गुजरातचे प्रमोशन तुम्ही करताय, हा महाराष्ट्र द्रोह नाही काय? आता तुमचा मराठी बाणा कोठे गेला?’’

Maharashtra Politics
Kolhapur Assembly Elections : कोल्हापूर जिल्ह्यात दुरंगी आणि तिरंगी लढतीने धुरळा उडणार, बंडखोरांचे आव्हान

खोट्या प्रचाराला बळी पडू नका

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘गेली पस्तीस वर्षे राजकारणात कार्यरत आहे; मात्र गेल्या अडीच वर्षांत एवढे हिताचे निर्णय झाले नाहीत. समाजातील सर्व घटकांसाठी निर्णय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. कोल्हापूरकरांना या जिल्ह्यासाठी जे मागितले ते देण्याचा प्रयत्न केला. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास, जोतिबा प्राधिकरण, केशवराव भोसले नाट्यगृहाला मदत दिली. पाण्याचा, शेतीचा प्रश्‍न आपण सोडवत आहे. समोरचे लोक वाट्टेल ते आरोप करतात.

लोकसभेला संविधान बदलणार, आरक्षण बदलणार, कायदा बदलणार म्हणून खोटा प्रचार केला. त्यांना थारा देऊ नका. सरकार उद्योग दुसऱ्या राज्यात पाठविते, हा आरोप असाच धादांत खोटा आहे. तुमच्या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक येण्यासाठी जीवाचे रान करीत आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर न्याय देवतेच्या डोळ्यावरील पट्टी सोडण्यात आली आहे. उसावरील प्राप्तिकर कमी केला आहे. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com