Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभेत 'गोकुळ'ची भूमिका काय? अध्यक्ष अरूण डोंगळेंना मुख्यमंत्र्यांचा थेट फोन

Chairman Arun Dongale : गोकुळचे कारभारी एकमेकांच्या विरोधात आहेत तर संचालकही आपल्या सोयीनुसार फिरत असल्याचे चित्र आहे.
Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaagrowon

Lok sabha 2024 Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे हळूहळू वातावरण तापू लागले आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातून जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याने निवडणुकीला चांगलाच रंग चढू लागला आहे. दरम्यान जिल्ह्यातील महत्वाच्या असलेल्या गोकुळ दूध संघातील नेत्यांची आणि संचालकांची कोणाच्या बाजूने ताकद लागणार याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान गोकुळचे कारभारी एकमेकांच्या विरोधात आहेत तर संचालकही आपल्या सोयीनुसार फिरत असल्याचे चित्र आहे.

मागच्या दोन दिवसांपूर्वी 'गोकुळ'च्या संचालकांची ताकद महायुतीच्या मागे लावा, अशी साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना घातली असली तरी प्रत्यक्षात संघाचे १२ संचालक थेट महाविकास आघाडीच्या प्रचारात आहेत. त्यातही नऊ संचालक काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासोबत आहेत. उर्वरित नऊपैकी तिघांची भूमिका अस्पष्ट, तर प्रत्यक्ष महायुतीच्या प्रचारात सहाच संचालक कार्यरत आहेत.

दरम्यान, संचालक डॉ. चेतन नरके हे स्वतः कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी अर्ज भरला तर ते उमेदवार ठरतील; पण रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.

'गोकुळ'च्या साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, चंद्रदीप नरके आदींनी मिळून माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीसमोर मोठे आव्हान उभे केले होते. यात आमदार सतेज पाटील यांनी आघाडी घेतली होती. सर्व महाडिक विरोधकांना एकत्र करून त्यांनी ही निवडणूक लढवली. त्यात २१ पैकी १७ जागा जिंकून संघावरील सुमारे ३० वर्षांची महाडिक यांची सत्ता खालसा केली.

या निवडणुकीत खासदार प्रा. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र व भगिनी आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी सौ. सुश्मिता यांचा पराभव झाला.

'गोकुळ'च्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक होत आहे. 'गोकुळ'चे नेतृत्व करणारे नेतेही महाविकास व महायुतीत विखुरले आहेत. अशा परिस्थितीत संघाच्या संचालकांसमोरही मोठा प्रश्न पडला आहे. अशातच बुधवार (ता. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून संचालकांची ताकद महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यामागे लावण्यास सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता संघाच्या २१ संचालकांपैकी १६ संचालक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात, तर उर्वरित पाच संचालक हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहेत. यापैकी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह १२ संचालक थेट महाविकास आघाडीच्या प्रचारात आहेत.

Kolhapur Lok Sabha
Gokul Milk : गोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री

महायुतीच्या प्रचारातील संचालक

अध्यक्ष अरुण डोंगळे, अजित नरके, नविद मुश्रीफ, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे (सर्व कोल्हापूर), सौ. शौमिका महाडिक (हातकणंगले)

भूमिका न घेतलेले संचालक

प्रा. किसन चौगले, एस. आर. पाटील, डॉ. चेतन नरके (स्वतः उमेदवार शक्य)

महाविकास'च्या प्रचारातील संचालक

माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले, अंबरिशसिंह घाटगे, बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, श्रीमती अंजना रेडेकर (सर्व कोल्हापूर लोकसभा)

कर्णसिंह गायकवाड माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर अमरसिंह पाटील (सर्व हातकणंगले लोकसभा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com