Village Development : देऊळगाव दुधाटे गावात लोकसहभागातून विविध विकासकामे

Success Story of Deulgaon Dudhate Village : परभणी जिल्ह्यातील देऊळगाव दुधाटे (ता.पूर्णा) येथे लोकसहभागातून विविध विकास कामे यशस्वी पार पडली आहेत. त्यातून शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केले आहेत.
Deulgaon Development
Deulgaon DevelopmentAgrowon

Deulgaon Village Agriculture Development : परभणी शहरापासून ३५ किलोमीटरवर देऊळगाव दुधाटे (ता. पूर्णा) गोदावरी नदीकाठी वसलेले साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. जमीन खोल काळी, सुपीक आहे. काही वर्षापूर्वी जिरायती क्षेत्राचे प्रमाण अधिक होते.

कपाशी, तूर, मूग, उडीद आदी पिके घेतली जायची. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र आहे. परंतु कालव्याच्या शेवटच्या टोकाला असल्यामुळे योग्य दाबाने पाणी मिळत नव्हते. कमी पावसाच्या वर्षांमध्ये धरण भरत नव्हते. पावसाचे असमान वितरण असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागे.

बंधाऱ्याचा फायदा

अलीकडील वर्षांत गोदावरी नदीवर डिग्रस (ता.पालम) येथे उच्च पातळी बंधारा उभारण्यात आला. त्याच्या ‘बॅक वॉटर’ मुळे देऊळगाव शिवारातील विहिरींची पाणी पातळी वाढली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करणे शक्य झाले. ऊस हे गावचे प्रमुख नगदी पीक झाले असून त्याचे सरासरी क्षेत्र १५० हेक्टरपर्यंत पोचले आहे.

पूर्व हंगामी उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सोयाबीन, कपाशी, हळद, ज्वारी, गहू अशी पिके आहेत. कडधान्यांखालील सरासरी क्षेत्र ७७४ हेक्टर आहे. आंबा, सीताफळ, मोसंबी, पेरू आदी फळपिकाची लागवड झाली आहे. गावचे भौगोलिक क्षेत्र १३१४ हेक्टर असून लागवडीयोग्य क्षेत्र १२३६.७१ हेक्टर आहे.

Deulgaon Development
Village Development : ग्रामविकासासाठी महत्त्वाच्या नोंदी

उत्पन्नाचे उभारले पर्यायी स्रोत

केवळ पिकांवर अवलंबून राहणे सततच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना शक्य राहिलेले नाही. त्यामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांनी पूरक व्यवसायांद्वारे उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण केले. सध्या सहा शेतकरी रेशीम शेती करतात.

काहींचे बंदिस्त शेळीपालन आहे. काहींना परसबागेतील कोंबडीपालनाव्दारे अंडी व पक्षी विक्रीतून उत्पन्न मिळत आहे. दुग्धव्यवसायाचा विस्तार झाला असून प्रति दिन सातशे लिटरपर्यंत दूध संकलन होते. एक ते दोन डेअरी उद्योगांची संकलन केंद्रे गावात आहेत.

शाळेचा कायापालट

गोदावरी नदीकाठी निजाम राजवटीत १९२६ मध्ये स्थापन झालेली प्राथमिक शाळा आहे. सातवी इयत्तेपर्यंत असलेली ही शाळा परभणी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आहे. शाळेची जुनी इमारत मोडकळीस आली होती. शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकारातून पाच लाख रुपये लोकवर्गणी व शिक्षकांकडून ७२ हजार रुपये अशी रक्कम जमा झाली.

त्यातून वर्ग खोल्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी झाली. वृक्षलागवड झाली. वर्गखोल्यांना गड किल्ल्यांची नावे देण्यात आली. सुसज्ज प्रयोगशाळा, वाचनालय,संगणक कक्ष, मैदान, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची तसेच माध्यान्ह भोजन व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे माहेरघर असे शाळेचे ब्रीद वाक्य आहे.

शाळेतून नवोदय विद्यालय प्रवेशासाठी ८ तर शिष्यवृत्तीसाठी १० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. दरवर्षी विविध रोपे विद्यार्थी स्वतः तयार करतात. वृक्षलागवडीमुळे गाव व शाळा परिसर हिरवाईने नटला आहे. दत्तनगर येथे वस्तीशाळा, एक खासगी शिक्षण संस्था व पाच अंगणवाड्या गावात आहेत.

Deulgaon Development
Village Development : पाणी, आरोग्य स्वच्छतेत संभापूरचा आदर्श

निसर्गरम्य स्मशानभूमी

ग्रामस्थांनी श्रमदान व यथाशक्ती मदत करून गोदाकाठच्या स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ, सुंदर केला आहे. स्मृती उद्यानात विविध वृक्षांची लागवड, रंगरंगोटी, आसन व्यवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून स्मशानभूमी सुशोभीकरण अंतर्गत रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक्स बसविले आहेत.

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन

‘जलजीवन मिशन’ अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी दिली जाणार आहे. सध्या दोन ‘आरओ फिल्टर’ प्रकल्पाद्वारे पिण्यासाठी शुध्द पाणीपुरवठा केला जातो. सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी बंदिस्त नाले, नदीकाठी शोषखड्डे तयार केले आहेत. सुमारे ८० टक्के कुटुंबांकडे स्वच्छतागृहे आहेत.

एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. घनकचरा व्यवस्थापनही केले जाते. गावकऱ्यांना पक्की घरे मिळाली आहेत. शंभरावर सिंचन विहिरी, शेतरस्ते, पाणंद रस्त्याची कामे झाली आहेत. लोकाभिमुख उपक्रमातून ग्रामविकास साधल्याची दखल घेत उत्कृष्ट सरंपच म्हणून ललिताबाई कांबळे यांचा गौरव पंचायत समितीतर्फे करण्यात आला आहे.

गावात लोकसहभाग व शासकीय योजनांच्या माध्यमातून विकासकामांना चालना मिळाली. मनरेगा अंतर्गत सिंचन विहीरी, फळबाग लागवडीची कामे झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागले आहे.
ललिताबाई उत्तमराव कांबळे, सरपंच, देऊळगाव दुधाटे
गावातील शेतकरी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करीत आहेत. अलीकडील वर्षांत गावात ट्रॅक्टर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. यांत्रिकीकरणातून मजूरसमस्येवर मार्ग निघाला आहे.
दिगंबर दुधाटे, उपसरपंच ९८८१६८६५६०
तीन भावांची मिळून आमची १० एकर जमीन आहे. सात वर्षांपासून रेशीम शेती करतो. त्यातून दर महिन्याला शाश्वत उत्पन्न मिळत आहे. बंदिस्त शेळीपालनातूनही आर्थिक आधार शोधला आहे.
मोतीराम दुधाटे ९६५७३१६६८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com