
Buldana News : सिंदखेडराजा तालुक्यातील गावागावात कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामपू्र्व लागवड मार्गदर्शन सत्र आयोजित केले जात आहेत. त्या अनुषंगाने बाळसमुद्र येथे खरीप हंगाम लागवड पूर्व शिबिर पार पडले.
तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक संतोष चेके यांनी आयोजित केलेल्या या खरीप हंगामपूर्व लागवड नियोजन सभेला बाळसमुद्र सरपंच शरद मेरत, माजी सरपंच आनंदराव मेरत, उपसरपंच विनोद वायाळ, सेंद्रीय शेती करणारे प्रगतिशील शेतकरी अविनाश हरकळ, प्रयोगशील शेतकरी माणिकराव मेरत, बालाजी नाझरकर, पांडुरंग मेरत, कैलाश गावडे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यामध्ये भौगोलिक क्षेत्र ७२,०७८ हेक्टर असून त्यापैकी शेंदूर्जन व साखरखेर्डा या दोन मंडळांचे मिळून भौगोलिक क्षेत्र १७,४२५ हेक्टर आहे. यापैकी १५,९१७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. या पेरणीयोग्य क्षेत्रापैकी या दोन्ही ही मंडळात सर्वात जास्त म्हणजे सुमारे १०,५७४ हे क्षेत्रात सोयाबीन पेरले जाणार आहे.
त्याखालोखाल सुमारे १८९० हेक्टर क्षेत्रात तूर व १५९५ हेक्टर क्षेत्रात नगदी पीक कापून लागवड केली जाणार आहे. उरलेल्या क्षेत्रात ज्वारी, बाजरी, मका आदी तृणधान्ये, उडीद-मूग आदी कडधान्ये, भुईमूग, तीळ, सूर्यफूल आदी तेलबियांची पेरणी व काही शेतकरी भाजीपाला लागवड करणार आहेत.
परिसरात सोयाबीनचे क्षेत्र जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने व दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने संतोष चेके यांनी शेतकऱ्यांना प्रामुख्याने सोयाबीन पिकाची अष्टसूत्री सविस्तरपणे विशद केली.
बियाणे उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया कशी करावी याविषयी सविस्तर माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, जैविक शेती, शेतकरी गट व या गटांच्या माध्यमातून करता येणारे व्यवसाय या संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.