
Parbhani News : परभणी जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड-सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीमबाबीअंतर्गत सोयाबीन, कपाशी, तूर पिकांच्या संभाव्य विमा भरपाई रकमेच्या २५ टक्के मर्यादेत अग्रिम (आगाऊ) विमा रकमेपोटी विमा कंपनीने शेतकऱ्यांना ३३५ कोटी ९० लाख रुपये दावा मंजूर केला होता.
परंतु पडताळणी केल्यानंतर २५ ठिकाणचे १२ हजार ६४४ बोगस विमा अर्ज रद्द केल्याने देय अग्रिम विमा रक्कम ३९ कोटी १ लाख ६४ हजार ३३७ रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता ६ लाख ६६ हजार ८६० शेतकऱ्यांना २९६ कोटी ८८ लाख ३५ हजार ६६३ रुपये एवढा अग्रिम विमा मिळणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
राज्य शासनाच्या हिश्शाचा विमा हप्ता वितरणाबाबतचा शासन निर्णय काढल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम विमा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. परंतु स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलेमिटीज) आणि काढणी पश्चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टिंग) या बाबी अंतर्गत मंजूर विमा दावे कधी अदा करणार याबाबत स्पष्टता नाही.
२०२४ च्या खरिपात विविध जोखीमबाबीअंतर्गत ७ लाख २४ हजार ५१० शेतकऱ्यांना ४२६ कोटी ५५ लाख २२ हजार १९७ रुपये पीकविमा मंजूर आहे. त्यात पर्जन्यमानातील असाधारण तफावत, नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थितीमुळे २५ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित क्षेत्र या प्रातिनिधिक सूचका आधारे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी काढलेल्या अधिसूचनेनंतर १ महिन्याच्या आत परंतु राज्य व केंद्र शासनाचा प्रथम विमा हप्ता प्राप्त झाल्यानंतर या तरतुदीनुसार सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांकरिता सर्व विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ टक्के अग्रिम विमा रक्कम जमा करण्याचे आदेश आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले.
त्यानुसार विमा कंपनीने ३३५ कोटी ९० लाख रुपये विमा मंजूर केला. राज्य शासनाने २१६ कोटी रुपये प्रथम विमा हप्ता जमा केल्यानंतरही विमा कंपनीने उर्वरित ९९ कोटी रुपये विमा हप्ता प्रलंबित असल्याचे कारण सांगत शेतकऱ्यांना अग्रिम विमा देण्यास पाच महिन्याचा विलंब लावला आहे.
आठ तालुक्यांतील १२ हजार अर्ज रद्द
दरम्यानच्या काळात परभणी, जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ८ तालुक्यांतील २५ ठिकाणच्या पेरणी योग्य नसलेल्या २९ हजार ४७७.७० हेक्टरवर विमा संरक्षण घेतलेले १२ हजार ६४४ अर्ज विमा कंपनीने रद्द केले.
त्यामुळे देय अग्रिम रक्कम ३९ कोटीवर रुपयांनी कमी झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गंत ४८ हजार ३५२ शेतकऱ्यांना १०१ कोटी ८९ लाख ७३ हजार १४५ रुपये तर काढणी पश्चात नुकसान अंतर्गत ९ हजार २९८ शेतकऱ्यांना २७ कोटी ७७ लाख १३ हजार ३८९ रुपये विमा मंजूर आहे, असे सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.