
Almatti Dam Kolhapur Sangli Flood : अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्यासाठी राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी (ता.१४) सांगितले. दरम्यान यावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा आणखी धोका वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यावर जिल्ह्यातील काही संघटनांनी आवाज उठवला आहे.
तर शेतकऱ्यांची झोप उडेल
डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काही संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे म्हणाले की, "अलमट्टी धरणाचा सांगली, कोल्हापूरसह शिरोळ तालुक्यात वारंवार येणाऱ्या महापुराचा थेट संबध अनेक अहवालातून तज्ज्ञांनी समोर आणला आहे. असे असताना पुन्हा कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची भाषा करते हे महापुराला तोंड देणाऱ्या शेतकरी आणि ग्रामस्थांची झोप उडवणारे आहे. अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरचा अभ्यास शासन पातळीवर सुरु आहे. तो अहवाल घेऊन महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात जाऊन उंची वाढवण्यास कायदेशीर प्रतिबंध केला पाहिजे" असे धनाजी चुडमुंग म्हणाले.
ऊसपट्ट्याला धक्का पोहोचण्याची भिती
कर्नाटक सरकार जर अलमट्टी धरणाच्या उंचीवरून आग्रही असेल तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मिळून जवळपास २०० गावांना मोठा फटका बसणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर बाधित गावे ऊस पट्टा क्षेत्र म्हणून ओळखली जातात. अलमट्टीची उंची वाढल्यास हा धोका आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
२००५, २०१९, २०२१ आणि २०२४ या वर्षांमध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना अलमट्टीच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे फटका बसला आहे. सांगली शहराच्या प्रमुख भागात कृष्णा नदीचे पाणी येते तर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील ४३ गावांना कृष्णेच्या पाण्याचा विळखा बसतो.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार काय म्हणाले
पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोमाई सरकारच्या काळात अलमट्टी धरणग्रस्ताना जमिनींचा मोबदला दिला जाणार आहे. कृष्णा अप्पर बॅक प्रकल्पाबाबत म्हणजेच अलमट्टी धरणाच्या फुगवट्याबद्दल केंद्र सरकार अधिपत्रित सूचना जारी करत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही वेगळा निर्णय घेणार नसल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.
पण सरकार अलमट्टी धरणातील पाण्याच्या पातळीची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याच्या बाबतीत सर्वप्रकारे प्रयत्नशील आहे. असे ही शिवकुमार यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.