Mango Variety : ‘जुन्नर गोल्ड’ हापूसला, केसरचा स्वाद, राजापुरीचा आकार

Junnar Gold Mango : जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील भरत जाधव यांच्या आंबा बागेत हापूस, केसरचा स्वाद व वजनाने मात्र राजापुरी वाणासारखा आठशे ग्रॅम, अशी वैशिष्ट्ये असलेली दोन झाडे आढळून आली आहेत.
Mango Variety
Mango Variety Agrowon
Published on
Updated on

Junnar News : जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडी येथील भरत जाधव यांच्या आंबा बागेत हापूस, केसरचा स्वाद व वजनाने मात्र राजापुरी वाणासारखा आठशे ग्रॅम, अशी वैशिष्ट्ये असलेली दोन झाडे आढळून आली आहेत. निवड पद्धतीने विकसित झालेल्या या आंबा वाणाचे ‘जुन्नर गोल्ड’ असे नामकरण शेतकरी जाधव यांनी केले आले आहे. तथापि, शेतकरी पीक जाती संरक्षण कायद्यांतर्गत या वाणाचा मालकी अधिकार नोंदणीसाठी कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव मार्फत प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे जाधव यांनी सांगितले.

नुकत्याच संपलेल्या आंबा हंगामात उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी भरत जाधव यांच्या आंबा बागेस भेट दिली होती. या वेळी बागेत जाधव यांनी निवड पद्धतीने विकसित केलेला आंब्याचा नवा वाण पाहावयास मिळाला. त्याचा स्वाद हापूस, केसर व राजापुरी संमिश्र, तर आकार राजापुरीसारखा व फळाचे सरासरी वजन आठशे ते नऊशे ग्रॅम असल्याचे आढळून आले. या आंब्याची दोन झाडे सध्या बागेत आहेत.

Mango Variety
Mango Production : आधुनिक तंत्रज्ञानातून आंबा उत्पादन वाढ शक्य

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाधव यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना बागेतील या आंब्याच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विषयतज्ज्ञ भरत टेमकर व पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांना बागेतील या झाडांची प्रत्यक्ष पाहणी केली.

Mango Variety
Mango Farming : वयाच्या ७८ व्या वर्षीही युवकाच्या उत्साहाने शेती

त्यानंतर जाधव यांच्या नावाने केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथील ‘प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटी अँड फार्मर्स राइट्‍स ॲथॉरिटी’कडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिली. त्यानुसार संबंधित झाडाची फळे व पाने यांचे नमुने घेऊन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच नाशिक येथील प्रयोगशाळेतही संबंधित नमुने परीक्षणासाठी पाठविण्यात आले होते. या बाबतचा सविस्तर अहवाल प्राप्त झाला आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी फळ‌धारणा होते. वजन सरासरी ८००, ९०० ग्रॅम व काही फळांचे एक किलोपर्यंत भरले आहे.

फळाचा रंग बाहेरून पिवळा व आतून केसरी आहे. चव हापूस, केशर व राजापूरी संमिश्र असून अन्य वैशिष्ट्येही अहवालात नमूद केली आहेत. जाधव यांनी गेल्या २२ वर्षांपासून आपल्या दोन हेक्टर जिरायती जमिनीत आंबा झाडांची लागवड केली आहे. त्यात आंब्याच्या विविध जातीची जोपासना केली आहे. यात हापूस केसर, राजापुरी, बदामी, लंगडा आदी वाणांची चारशेहून अधिक झाडे आहेत. याचबरोबर सीताफळ व डाळिंब फळबाग देखिल जोपासली आहे. आंबा उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करत असल्याने स्वाद चांगला आहे.

संपर्क : भरत जाधव, ९०९६२९३३८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com