
Palghar News : तालुक्यात आरोग्य, रोजगार आणि शिक्षणाची मोठी वानवा आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे; मात्र बेमोसमी पडणारा पाऊस, वातावरणातील बदल, रोगाचा प्रादुर्भाव अशा निरनिराळ्या कारणाने शेतकरी दरवर्षी बेजार होतो. अशातच अतिवृष्टीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने येथील शेतकरी मदतीची प्रतीक्षा करत आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात जूनमध्ये जव्हार तालुक्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांची माती झाली आणि सुपीक जमीन खरडून गेली. अचानक कोसळलेल्या या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता कोलमडून पडला.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बाधितांचे अश्रू पुसले. तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले. सरकार दरबारी मदत निधीचे प्रस्ताव गेले. मात्र पाच महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या पदरात दिडकी जमा झाली नाही. त्यामुळे अतिवृष्टिग्रस्त शेतकरी हतबल झाला आहे.
जव्हार तालुक्यात ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी झाली. एकच हाहाकार उडाल्याने शासकीय पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार तालुक्यात जिरायत, बागायत आणि फळबाग क्षेत्रांचे फळबाग क्षेत्रांचे मोठे नुकसान जाहीर झाले.
या पिकांच्या नुकसानीपोटी जिरायती पिकासाठी हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायतीकरिता हेक्टरी २७ हजार रुपये, तर फळबागेसाठी ३६ हजार रुपये हेक्टर याप्रमाणे एकूण १३९ कोटी ११ लाख ७५ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.
यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय उपायुक्तांकडे पाठविण्यात आला. विधानसभा निवडणूक आटोपून मंत्रिमंडळाची स्थापना झाली. परंतु, महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीचा दिलेला शब्द अजून पाळला नाही.
खात्यावर अनुदान जमा होणार!
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या याद्यांवरील आक्षेपानंतर त्या सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करून पाठविण्यात येतील. त्यानंतर सरकारकडून सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होईल, अशी माहिती तहसील कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.