
Jagdeep Dhankhar Resigns: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणास्तव आपल्या पदाचा काल (ता.२१) तत्काळ राजीनामा दिला, ज्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय खळबळ उडाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांनी हा निर्णय घटनेच्या अनुच्छेद ६७(अ) नुसार घेतल्याचे स्पष्ट केले.
२०२२ पासून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या धनखड यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला, विशेषतः विरोधी पक्षांशी त्यांचे वारंवार खटके उडाले. भारताच्या इतिहासात कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे ते फक्त दुसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. “तब्येतीची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार मी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा देत आहे. हा निर्णय घटना दुरुस्तीतील अनुच्छेद ६७(अ) नुसार घेत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
धनखड यांनी २०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. आपल्या राजीनाम्यानंतर दिलेल्या निवेदनात त्यांनी भारताच्या विकासाचा भाग होण्याचा अभिमान व्यक्त केला. “या ऐतिहासिक बदलाच्या काळात देशाच्या प्रगतीसाठी काम करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती,” असे त्यांनी म्हटले.
राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना धनखड यांचा अनेक वेळा विरोधकांशी वाद झाला. एकदा तर त्यांच्या विरोधात विरोधी पक्षांनी हटवण्याची सूचना दिली होती, मात्र ती नाकारण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात संसदीय प्रक्रियेबाबत अनेक वाद निर्माण झाले.
धनखड हे भारताच्या इतिहासातील फक्त दुसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत, ज्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला. यापूर्वी १९६९ मध्ये व्ही. व्ही. गिरी यांनी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी सादर करण्यासाठी राजीनामा दिला होता.
धनखड यांचा राजकारणातील प्रवासही लक्षवेधी राहिला आहे. १९८९ मध्ये झुंझुनू (राजस्थान) मतदारसंघातून त्यांनी संसदेत पदार्पण केलं. चंद्रशेखर सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून काम केलं होतं. २०१९ मध्ये त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही लक्षवेधी भूमिका बजावली होती.
२०२२ मध्ये एनडीएने त्यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार घोषित केलं आणि त्यांनी ५२८ मतांनी विजय मिळवला. त्यांची प्रतिस्पर्धी मार्गारेट अल्वा यांना फक्त १८२ मते मिळाली होती.धनखड यांच्या राजीनाम्यानं राजकारणात नवा रंग भरला असून, त्यांच्या जागी कोण विराजमान होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.