Jackfruit
Jackfruit Agrowon

Jackfruit Research : लांजात उभारणार फणस संशोधन केंद्र

Jackfruit Farming : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने परिषदेच्या बैठकीसमोर मांडलेल्या प्रस्तावात ४० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

Mumbai News : फणसाच्या लागवडीस तसेच प्रक्रियेस भविष्यात असलेला वाव लक्षात घेऊन लांजा (जि. रत्नागिरी) येथे फणस संशोधन केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीत सोमवारी (ता. ११) घेण्यात आला. ४० कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth) तयार केला असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

देश आणि परदेशातील फणस जातींचा अभ्यास करणे, वाणांचा संग्रह, तुलनात्मक अभ्यास, फणसाचे गरे, फणस कुयरीची भाजी, तयार फणसाची भाजी, फणस पल्प व त्यापासून उत्पादने, ताज्या तसेच उकडलेल्या बिया व त्याची पावडर, वर्षभर फणसाचे उत्पादन, फणसाच्या स्वतंत्र जाती तयार करणे, पडीक जमिनीवर लागवड करणे, रोग, किडी, शाखीय व्यवस्थापन यासाठी संशोधन करणे, शेतकऱ्यांना रोपवाटिका, उत्पादन पद्धती तसेच प्रक्रिया पदार्थ यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण राबविणे यासाठी हे संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. लांजा येथील ५० एकर जागेवर हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे.

Jackfruit
Jackfruit : फणसाच्या चारखंडांपासून पेक्टिन निर्मितीवर संशोधन

कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत तब्बल १४३ विषयांवर चर्चा झाली. यामध्ये शिक्षण विभागाचे १५, संशोधन विभागाचे ६, साधनसामग्री विकास विषयाचे १११, प्रशासन शाखेचे चार, वित्त शाखेचा एक आणि सेवा प्रवेश मंडळाच्या सहा विषयांचा समावेश होता. या बैठकीत फणस संशोधन केंद्रासोबतच मुख्यमंत्री संशोधन निधी अंतर्गत अकोला आणि राहुरीच्या एकूण ५० कोटी रुपयांच्या अनुक्रमे आठ आणि १८ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने परिषदेच्या बैठकीसमोर मांडलेल्या प्रस्तावात ४० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. कोकणात फणस मुबलक प्रमाणात मिळत असून हे फळ पौष्टिक, आरोग्यदायी गुणधर्म असलेले फळपीक आहे.

या फळाचे मूल्यवर्धन केल्यास त्याची मूल्यसाखळी निर्माण होऊ शकते. तसेच त्यातून रोजगार निर्मितीही होऊ शकते. यासाठी विद्यापीठाने सविस्तर प्रस्ताव तयार केला असून तो परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला.

Jackfruit
Jackfruit Food Processing : फणसाचे मूल्यवर्धित पदार्थ

या प्रस्तावात फणसाच्या विविध उपयोगासाठी जाती निर्माण करणे, खाण्यासाठी तसेच गरे तळण्यासाठी कापा फणसाच्या जाती विकसित करणे, बरका फणसाच्या जाती विकसित करणे, फणसाच्या लवकर व भरपूर उत्पादन देणाऱ्या जाती निर्माण करणे, लहान आकाराच्या (नारळी) फणसाच्या जाती विकसित करणे, फणसाच्या वैशिष्टपूर्ण गरे असणाऱ्या जाती विकसित करणे, फणसाच्या गरापासून भाजी करण्यासाठी जाती विकसित करणे, वर्षभर उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करणे, अधिक उत्पादनासाठी लागवड पद्धती विकसित करणे आदी उद्देश ठरविण्यात आले आहेत.

तसेच फणसाच्या विविध जातींची दर्जेदार कलमे तयार करण्यासाठी रोपवाटिकाही उभारण्यात येणार आहेत. फणसाचे मूल्यवधित उपपदार्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी पिकलेले गरे, फणसाच्या बिया, पाती, सातल आणि आतील पाव आदींपासून उपपदार्थ बनविण्यावर संशोधन करण्यात येणार आहे.

फणस संशोधन केंद्र....

- महाराष्ट्रात फणस या फळपिकाखाली ३१२ हेक्टर जमीन.

- वर्षभरात अंदाचे १२ हजार टन उत्पादन.

- रायगड, रत्नागिरी, पालघर, कोल्हापूर या जिल्ह्यात उत्पादन.

- संशोधन केंद्रासाठी ५० एकर जमीन.

- संशोधन केंद्रात सहा शिक्षक तर ८ शिक्षकेत्तर कर्मचारी.

- पाच वर्षांसाठी ४० कोटी अनुदानाची गरज.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com